विश अ ड्रीम...


हेमा उपाध्याय हिच्या कामावि़षयी मी पहिल्यांदाच लिहितेय आणि ते लिहिण्याची वेळ अशाप्रकारे येईल असा विचारही कल्पनेतही मनात आला नव्हता. आज सगळ्यात अवघड जातंय ते तिच्या विषयी लिहिताना भूतकाळाचा वापर करावा लागणं... हेमाला मी पहिल्यांदा भेटले होते ते तिच्या वधेरा आर्ट गॅलरी इथं भरलेल्या एकल प्रदर्शनाच्या वेळी. मी दिल्लीत आणि गॅलरीत तेव्हा नवखीच होते पण हेमाच्या वागण्यातली सहजता लक्षात राहिली होती आणि तसाच तिचा उत्साह आणि कामातला चोखपणाही. नंतर मुंबईत आल्यावर मोहिले पारीख सेंटरच्या कामानिमित्त, कार्यक्रमांना तिला अधूनमधून भेटत राहिले...

बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी इथून चित्रकला आणि प्रिंटमेकिंगचं शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर ती मुंबईला आली. सुरूवातीला कुटुंबाला भोगावे लागलेले स्थलांतर, फाळणीच्या काळातील आठवणी यावर भाष्य करत लिंगभाव आणि स्त्री म्हणून असलेली ओळख (आयडेंटिटी) याकडेही ती वळली. अवाढव्य पसरलेल्या महानगरीय पटलावर उमटणारी तिची स्व-प्रतिमा तिच्या बऱ्याच कलाकृतीतून साकार झाली. मुंबईमध्ये ती स्वतः स्थलांतरीत असल्यामुळे ती वैयक्तिक अनुभूती आणि त्या महानगरात आजूबाजूला सतत दृश्यास पडणारे मानवी विस्थापनाचे अनुभव तिचा कला व्यवहार अधिक समृद्ध करत राहिले. यातूनच स्त्री म्हणून जाणवणारे प्रश्न आणि विविध अवकाशात वावरताना येणारे प्रत्यय हे तिच्यासाठी महत्वाचे संदर्भ बनले. त्यामुळेच वैयक्तिक आेळख, स्मृत्याकुलता, विस्थानन आणि लिंगभाव हे सारे मुद्दे तिच्या कलाव्यवहाराचा भाग बनत गेले. हेच अनुभव मांडताना तिच्या स्व-प्रतिमेचे अस्तित्व तिच्या कलाकृतींमध्ये ठळक होत गेलं.




'किलींग साइट' या कलाकृतीत हेच अनुभव अतिशय तरलपणे आपल्या समोर येतात. यात वरच्या बाजूला मुंबईतील कच्ची पक्की घरं, वस्त्या, काही उंच इमारती उलट्या लटकताना दिसतात. या वास्तू खालच्या नक्षीकाम केलेल्या मोंटाजवर छपरासारख्या आडोसा धरतात. खालीच्या नक्षीकाम केलेल्या भागात काळ्या निळ्या रंगाच्या डवरलेल्या फुला-पानांच्या आकारात मधूनच हेमाची छायाचित्रीय प्रतिमा दिसत राहाते. एकीकडे हे निळे-काळे आकार शहरावर दाटून आलेल्या ढगांसारखे भासतात तर दुसरीकडे ते मुंबई शहराबद्दल असलेल्या स्वप्न आणि आकांक्षाही दर्शवतात. वरवर पाहाता अलंकरणात्मक वाटणारी ही चित्रे आपल्याला शहरी विकासामुळे उद्भवणारी सामाजिक-आर्थिक असमानता, त्याचे कलाकार म्हणून हेमाच्या भावविश्वावर होणारे परिणाम यांची जाणीव करून देते. हेमाची चित्रे ही बहुतकरुन आत्मचरित्रात्मक होती. मिश्र माध्यमातून काम करताना ती तिची स्वतःची प्रतिमा, बहुतेक वेळा छायाचित्राच्या रूपात, त्यात समाविष्ट करीत असे. असं करताना ती स्वतःच त्या कलाकृतीची नायिका बनत असे. याचं एक कारण म्हणजे ते तिचं स्वतःचं कथन होतं, तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडीतून तिच्या आकार घेत जाणाऱ्या व्यक्तिमत्वाचं ते कथन होतं. आणि हे करताना ती कायमच नवे मार्ग शोधत राहिली. कथनाचे, आकृतीबंधाचे नवे आकार-उकार यांच्याशी संवेदनशीलपणे झगडत राहिली, खेळत राहिली
 





तसंच ती माध्यमांच्या बाबतीतही प्रयोगशील होती. प्लास्टिक, अॅल्युमिनिअम, अॅसबेसटॉस, तांदूळ, ताडपत्री, वर्तमानपत्रातील कात्रणं असं काय काय ती गरजेप्रमाणं वापरत राहिली. मुंबईतल्या वस्त्या दाखवण्यासाठी ताडपत्री आणि पत्रा, आगपेटीच्या काड्यांनी बनवलेलं झुंबर, शहराचे जादुई नकाशे तयार करण्यासाठी वापरलेली स्वतःची वनाइलवरची तिमिरचित्रं असतील किंवा भव्य भूदृश्य/देखावे बनविण्यासाठी तांदळाचा केलेला वापर असेल! त्याचबरोबर, छायाचित्र, गॉश आणि पोस्टर कलरमधली चित्रं, मांडणी-शिल्प यासारख्या वेगवेगळ्या आकृतीबंधात काम करत राहिली. या प्रयोगांबरोबरच लक्षात राहातं ते तिनं प्रत्येक वेळी तपशीलांना दिलेलं महत्व. याचबरोबर, हेमाने तिच्या कलाकृतीतून आजच्या काळातील आपल्या जाणिवांना भिडणाऱ्या अनेक विषयांना हात घातलेला दिसून येतो. चिंतन उपाध्याय यांच्या सहयोगातून पार पाडलेल्या २००३ च्या 'मेड इन चायना' या मांडणी शिल्पात तिने अनेक चिनी वस्तू गॅलरी केमोल्ड इथे वेगवेगळ्या उंचीवर टांगल्या होत्या. अतिशय वैचित्र्यपूर्ण पण सामान्य अशा या वस्तूंच्या मांडणीतून ते अमाप उपभोगवाद, सपाटीकरण, अस्मितेचे हरपलेपण, क्रयवस्तूंचे आयातीचे बदलते अर्थकारण यावर भाष्य करतात. तर दुसरीकडे, अॉस्ट्रेलियाला २००१ साली भरवलेल्या प्रदर्शनातील तिच्या 'द निम्फ अॅंड द अॅडल्ट' या कलाकृतीत तिने साधारण २००० झुरळांच्या प्रतिकृतींनी गॅलरीतच्या भिंती व्यापून टाकल्या होत्या. हे एकीकडे प्रेक्षकांना आकृष्ट करणारं पण दुसरीकडे किळसवाणेपणाची भावना निर्माण करणारं होतं. अर्थात केवळ तेवढंच नव्हे तर त्या मांडणीमागे ठोस कारणही होतं. दक्षिण आशिया खंडातील अस्थिर राजकीय परिस्थिती, लष्करीदृष्ट्या तणावाचा असलेला हा कालखंड असल्याने ही कलाकृती 'यानंतर पृथ्वीतलावर केवळ झुरळंच उरणार की काय?' असा प्रश्नही विचारते






 


२००७ च्या 'द ग्लास हाऊस' या लंडनमधल्या प्रदर्शनातील 'ड्रीम अ विश, विश अ ड्रीम' हे मांडणी-शिल्प तिचं मुंबई शहराशी असलेलं नातं आणि त्या शहराची तिच्या मनातील प्रतिमा स्पष्टपणे आपल्यासमोर उभी करतं. धारावीतील झोपडपट्टी, पसरलेली वस्ती, विविध आकारंच्या घरांच्या रचना तिने यात लहान-लहान आकारांच्या त्रीमितीय रचनेतून उभी केली होती. मुंबईत गेली दोन-तीन शतकं स्थलांतरित झालेल्यांनी घडवलेल्या शहराची एक झलक हे देतं. एकीकडे ही एकमजली-दुमजली घरं, दुसरीकडे उभ्या असलेल्या गगनचुंभी इमारती, रीअल इस्टेटने व्यापून राहिलेलं सार्वजनिक अवकाश, वास्तवातील जागा आणि अशा अर्थव्यवहारामुळे निर्माण होणारे आभासी अवकाश याच्यातील अतार्किकता, गहनता आणि अदृश्यता, स्वप्नं, असत्यता, प्रेम, आपलेपणा, छुपेपणा आणि हिंसा यावर ही कलाकृती भाष्य करते. हाच विचार आणि शोध पुढे नेत हेमाने २०१४ 'फिश इन अ डेड लॅंडस्केप' हे एकल प्रदर्शन भरवलं. यातही 'मॉडर्नायझेशन' हे एक मोठं मांडणीशिल्पं होतं ज्यात तिने गॅलरीच्या जमिनीवर अॅल्युमिनिअमचे पत्रे, प्लास्टिकचे तुकडे, कारचे सुटे भाग, सापडलेल्या वस्तू यातून शहराची प्रतिकृतीच तयार केली होती. यात लहानमोठ्या आकाराच्या इमारतीत विविध प्रार्थनास्थळं ठाशीवपणे समोर येतात आणि मुंबईसारख्या शहरात असणाऱ्या भासमान आधुनिकतेच्या समजेवर टिपण्णी करतात. लघु आकार तयार करण्यातली हातोटी, त्याबद्दलचं आकर्षण, त्यातून आजूबाजूचे बारकावे पकडण्याचं कौशल्य आणि सूक्ष्मात जाऊन विचार करण्याची वृत्ती हे हेमाच्या यासारख्या कलाकृतीतून आपल्यासमोर येतं. त्याचबरोबर कोलाज आणि लिखित मजकूरही तिच्या कामाचा अविभाज्य भाग बनताना दिसून येतं. याच प्रदर्शनातील तांदळापासून बनवलेली चित्रे, ज्याला ती 'फिल्ड-स्केप्स' असं संबोधते, समुद्राच्या लाटांप्रमाणे निर्माण होणाऱ्या आकारामुळे ही स्पर्शसंवेद्य भासतात. अमूर्त भासणाऱ्या या चित्रांना जवळून निरखले असता त्यातले पोत, घाट आणि लिखित मजकूर स्पष्ट होत जातो. मुंबईच्या बदलत्या भू-दृश्याच्या संदर्भात सौंदर्य आणि ऱ्हास या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून अलग करणं जवळपास अशक्य असल्याची जाणीव त्या दाण्यांवर कोरलेला मजकूर करून देतो. २०१४ च्या कोची मुझिरीस बिनाले मध्ये तिने याच प्रकारची भू-दृश्ये 'सायलेन्स अॅंड इट्स रिफ्लेक्शन्स' हे सहा पॅनेलच्या कलाकृतीमार्फत प्रदर्शित केली होती.

Add caption


खासगी आणि सार्वजनिक अवकाशातले आंतरसंबंध आपल्या कामातून दाखवत असताना तिनं प्रत्यक्ष सार्वजनिक अवकाशात जाऊनही कला हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली होती. खोजच्या कार्यशाळेदरम्यान तिनं 'द स्पेस इन बिट्वीन यू अॅंड मी' या स्थलसापेक्ष मांडणीशिल्पात नांगरलेल्या जमिनीत नाचणीचं बी पेरलं. ते धान्य उगवल्यावर ते तिच्या आईला लिहिलेलं एक पत्र होतं. ते गवत वाढेल तसा तो संदेश नाहिसा होणार त्यामुळे त्या शब्दांचे उरणारे अवशेष, त्यांची अशाश्वतता यातील संबंध हे मांडणीशिल्प दर्शवू पाहात होतं. 'मॉडर्नायझेशन' कलाकृतीच्याच धर्तीवर तिने काळाघोडा फेस्टिवलच्या दरम्यान तिचं मांडणीशिल्प छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं गेल्या वर्षी उभारलं होतं. मोहिले पारीख सेंटर आणि आर्ट अॉक्सिजन यांनी आयोजित केलेल्या जनकला प्रकल्पातही ती सहभागी झाली होती. यात तिनं मुंबईच्या बहुभाषिक रहिवाशांच्या आठवणी ध्वनिमुद्रित करून त्या जुहूच्या किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांना एेकवल्या आणि त्यांच्या या शहराबद्दलच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या जनकला प्रकल्पानिमित्त मी तिच्या जुहूच्या घरीही गेले होते, तेव्हा त्या समुद्र किनारच्या फ्लॅटमधलं तिचं एकाकीपण कुठेतरी जाणवून गेलं होतं. पण वैयक्तिक पातळीवर अतिशय कठीण परिस्थितीतून जात असतानाही तिची कला निर्मिती चालूच होती आणि तिच्याच म्हणण्याप्रमाणे कलानिर्मितीची ही प्रक्रिया तिच्यासाठी विरेचक (कथार्टिक) होती. आणि तीच कला आता आपल्याला तिच्याशी जोडणारा दुवा उरला आहे.


छायाचित्र सौजन्य: गॅलरी केमोल्ड, मुंबई
हा लेख पुरोगामी जनगर्जनाच्या जानेवारी २०१६ च्या अंकात प्रसिद्ध होईल.