किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर...



मॉस्को इथं १९५९ साली भरलेल्या अमेरिकन नॅशनल एक्झिबिशनच्या दरम्यान अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोविएत रशियाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांच्यात जगप्रसिद्ध 'किचन डिबेट' घडले होेते. भांडवलशाही आणि साम्यवादी या परस्पर विरूद्ध विचारसरणींचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमधला हा वाद होता. पण त्यातली गंमतीची गोष्ट अशी की हा वाद घडला या प्रदर्शनातल्या आधुनिक स्वयंपाकघराच्या प्रतिकृतीसमोर. निक्सन यांचा दावा होता की यातली सर्व यंत्रं ही आधुनिक जगाची साक्ष देणारी आणि भरपूर अन्न पुरवठा असलेल्या त्यांच्या देशात अन्न प्रक्रिया सहजतेने करता यावी यासाठी विकसित करण्यात आलेली ही यंत्रं होती. ख्रुश्चेव यांनी 'तोंडात घास घालून तो घशातून खाली ढकलणारे यंत्र तुमच्यापाशी नाही काय?' असे चेष्टेने विचारत चांगल्या जगण्यासाठी इतक्या यंत्रांची गरज नाही असे सांगितले होते. शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो वाद जगभर गाजला आणि शीत युद्धाच्या काळातील एक महत्वाची घटना म्हणून इतिहासात याची नोंद झाली. पण या सगळ्याचा समकालीन कलेशी काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. स्वयंपाकघरासारख्या बिन-महत्वाच्या समजल्या गेलेल्या घरातील जागेतील वस्तू प्राजक्ता पोतनीस ही मुंबईतील कलाकार कलापटलावर आणते. त्यात दडलेले संदर्भ आणि आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, आर्थिक-सामाजिक रचना यातले ताणे-बाणे ती आपल्या कलाकृतीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. एकीकडे घरातल्या साध्या वस्तूंना ती आपल्या कलाकृतीतून मांडते पण त्याचबरोबर, ती त्यांना राजकीय, एेतिहासिक घटनांची रूपकं म्हणून आपल्यासमोर उभी करते. घरगुती वापराच्या वस्तू आणि उपकरणं, त्यांचा आपल्या जगण्यातला वापर, त्यांचं स्थान, बदलती उपभोगवादी जीवनशैली आणि त्याचबरोबर बदलत जाणारी या वस्तूंची रूपं, त्यांचं टाकाऊपण-टिकाऊपण यातून घडत गेलेली काही रेखाचित्रं, छायाचित्रं आणि मांडणी-शिल्पं प्राजक्ता पोतनीस यांच्या प्रोजेक्ट८८ या मुंबईतील कलादालनात गेल्या महिन्यात भरलेल्या एकल प्रदर्शनात पाहायला मिळाली


किचन डिबेट, मॉस्को



व्हेन द विंड ब्लोज, प्रोजेक्ट८८, मुंबई


या सगळ्याची सुरूवात नक्की कशी आणि कुठे झाली? एखादा कलाकार एकल प्रदर्शन करतो तेव्हा नेमकी काय प्रक्रिया घडते? एक पक्की वेळ सांगता येत नसली तरी साधारणपणे त्या प्रक्रियेला कधी सुरूवात झाली ते मागे वळून पाहाता येतच. प्राजक्ताच्या या प्रदर्शनाची एका प्रकारे सुरूवात झाली ती तिच्या दोन वर्षापूर्वीच्या बर्लिन येथील रेसिडन्सीमध्ये. दैनंदिन जगण्यातल्या वस्तू हा पूर्वीपासून तिच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. पण बर्लिनमध्ये असताना कामानिमित्तच्या संशोधनात तिला वर उल्लेखलेल्या 'किचन डिबेट' विषयी माहिती मिळाली. बर्लिनमध्ये राहात असल्यामुळे दैनंदिन वस्तू आणि त्यांचा शीतयुद्धाच्या संदर्भातील अर्थ तिने शोधायला सुरूवात केली. याच अनुषंगाने पुढे विचार प्रक्रिया चालू असताना कोची बिनालेच्या प्रदर्शनातील तिची कलाकृती आकाराला आली. तिच्यासाठी स्वयंपाकघर ही फक्त जेवणा-खाणाची जागा नव्हती तर जुन्या-नव्या मूल्यांच्या घर्षणातून आकाराला येणाऱ्या वाद-संवादाचं, नातेसंबंधांसाठीचं ते अवकाश होतं. एकीकडे, जांभ्या दगडावर स्वयंपाकघरातील जुन्या, वापरात नसलेल्या साधनांचे ठसे कोरलेले होते. तर दुसरीकडे, भिंतीवरच्या प्रक्षेपित केलेल्या प्रतिमा धुलाई यंत्र आणि ग्राइंडरची गरगर एकेक फ्रेमने दाखवित होता. आवर्तनात चालू असलेल्या जुन्या स्लाइड-प्रोजेक्टरचा क्लिक-क्लिक आवाज दैनंदिन जगण्यातला नित्यक्रम, तोचतोचपणा, त्यातलं अडकलेपण अधोरेखित करत होता. तसंच, बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे सार्वत्रिक झालेल्या उपभोगवादी जीवनशैलीकडेही आपलं लक्षं वेधतात. रेफ्रिजरेटरच्या वरच्या कप्प्यात ठेवलेला फ्लॉवरचा मोठा गड्ड्याची प्रतिमा हा अनेक गोष्टींकडे संकेत करते. फ्लॉवरचा गड्डा हा भूगर्भात घेतल्या जाणाऱ्या अणुबॉंबच्या चाचण्यांकडे संकेत करतं. या गड्ड्याच्या आकार-साधर्म्यामुळे अणुबॉंबच्या स्फोटानंतर तयार झालेल्या ढगाच्या आकाराची आठवण होते आणि त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाइड अन्नपदार्थ हे जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्येवरही भाष्य करते.

हे सगळं सविस्तरपणे लिहिण्याचं कारण की सध्याच्या तिच्या 'व्हेन द विंड ब्लोज' या एकल प्रदर्शनात हे सगळे संदर्भ एकत्र येतात, विस्तारत जातात आणि शक्याशक्यतेच्या सीमेवर प्रेक्षकांना उभं करतात. ती आपल्या कलाकृती निर्माण करताना दैनंदिन जीवनातल्या वस्तूंबरोबरच एेतिहासिक दस्तावेजही संदर्भ म्हणून वापरते. कलाकृती या केवळ उत्स्फुर्ततेतून नव्हे तर पुरेसा अभ्यास, संशोधन आणि चिंतन यातून निर्माण होत असतात त्यामुळे प्राजक्ता सारखे समकालीन कलाकार या माध्यम, घाट याबरोबरच या अभ्यासालाही आवश्यक ते महत्व देताना दिसतात. तिची फिकट, वॉटरकलरमधली रेखाचित्रं करड्या रंगछटा दर्शवितात. स्थिर चित्रणावर भर देत प्राजक्ता त्यातूनही टेबल फॅन, तवा, पिळलेला कपडा, खोलीतला रिकामा कोपरा, ट्युबलाईट अशा दैनंदिन जीवनातल्या वस्तूंच्या प्रतिमा रेखाटते. या रेखाटनातून अवकाशात तरंगणाऱ्या या वस्तू-प्रतिमांचे तरल आकृतीबंध आकाराला येतात. अर्थात, हे करताना प्राजक्ता त्या दस्तावेजात अडकून न पडण्याची काळजी ही घेते. या अभ्यासातून पुढे आलेली माहिती ती तिच्या कलाभाषेत अत्यंत संवेदनशीलपणे स्वीकारते, त्यांना सजगपणे एकजीव करत आपल्यासमोर मांडते. 'व्हेन द विंड ब्लोज' हे प्रदर्शनाचं शीर्षक याच नावाच्या ब्रिटीश ग्राफीक नॉवेलवरून घेतलं आहे. ही कथा आहे इंग्लंडच्या शांत गावात राहाणाऱ्या एका जोडप्याची आहे. अणुबॉंबचा हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना तयारीत राहाण्याचे आदेश आहेत. पण प्रत्यक्ष हल्ल्याची घोषणा झाल्यावर मात्र ते दैनंदिन रगाड्यात इतके गुरफटलेले असतात की त्या प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या तत्काळ लक्षातच येत नाही

स्टिल लाइफ | २०१४

 

कॅप्सूल ५०४ | २०१६



'कॅप्सूल' या फोटो-मालिकेत ती अत्यंत साध्या वाटणाऱ्या फ्रीजरचे अंतरंग दाखवते. मुंबईसारख्या किनारपट्टीवरच्या शहरात बालपण घालवताना फ्रीझरमधला बर्फच तेवढा प्रत्यक्षात पाहिलेला. हा लहानसा फ्रीजर तिच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून मात्र एखाद्या भव्य लॅंडस्केपसारखा आपल्यासमोर उभा राहातो. त्यात खोलवर शिरताना अनेक अर्थ हळूहळू उमगत जातात. ही छायाचित्रं असली तरी त्यांची रचना एखाद्या मांडणी-शिल्पाप्रमाणे आहे. त्यात कुकरच्या शिट्टीपासून मिक्सरच्या पात्यांपर्यंत आणि अंड्यापासून लाइटर पर्यंतच्या अनेक वस्तू, बर्फाचे डोंगर, त्यात शिरणारा प्रकाश हे सगळं तिने रचलेलं आहे. फ्रीझरमध्ये साठलेलं बर्फ शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीचं रूपक ठरतं तर त्यातला रचलेल्या बर्फाळ प्रदेशात लाइटर एखाद्या रणगाड्याच्या नळीप्रमाणे तर मिक्सरची पाती लढाऊ विमानाच्या अवशेषांप्रमाणे भासतात. त्यामुळेच नेहेमीच्या वस्तू ठेवलेल्या असूनही ही लॅंडस्केप्स अनोळखी आणि अस्वाभाविक दिसतात. या राजकीय संदर्भाबरोबरच रोजचे आणि वैयक्तिक संदर्भही आपल्याला विसरता येत नाहीत. नामशेष होत जाणारी जुन्या मिक्सरची पाती आणि खटक्यावर सुरू होणाऱ्या शेगड्यांमुळे स्वयंपाकघरातून गायब होत चाललेला लाइटर हे ही संदर्भ या कलाकृतींना आहेतच. हा फ्रीजर हे आपल्या स्मृतीकोशांकरिता रूपक म्हणून इथं येतं. काही स्मृती या अशा गोठवता येतात का? तसं केलं की त्यांचं काय होतं? त्या फ्रीजर मधून त्यांना बाहेर काढलं की काय होईल? इतर अन्नपदार्थांप्रमाणेच त्या कदाचित सडू लागतील आणि नष्ट होतील काय? हे कायमस्वरूपी न टिकणं आणि त्या ऱ्हासाच्या प्रक्रियेची सुरूवात होणं हे ती गॅलरीच्या पांढऱ्या भिंतीवरच्या रंगाच्या निघणाऱ्या पोपड्यांनी दर्शविते. त्या भिंतीवरच्या रंगांच्या थरात कितीतरी आठवणी गाडलेल्या आहेत, भूतकाळातील वेदना-संवेदना त्यात साठलेल्या आहेत. रंगांच्या पापुद्र्यातून आणि भेगाळलेल्या भिंतीतून त्यांच्या पर्यंत आपल्याला पोचता येतं का? की या पापुद्र्यांच्या अंतर्वलनातून निर्माण होणारे घाट हे सर्व आच्छादून टाकतात? असे अनेक विचार हे बघताना मनाला स्पर्शून जातात.

यानिमित्ताने एक महत्वाची गोष्ट घडताना दिसते ती म्हणजे रोजचं जगणं आणि त्यात अंतर्भूत असलेलं पण सहजपणे लक्षात न येणारं असं राजकारण. या राजकारणाचे पडसाद या स्वयंपाकघरात, त्यातल्या वस्तूंमध्ये सहजपणे पडताना दिसतात. अशा राजकीय आणि खासकरून लष्करी प्रक्रियेतून उदयाला आलेली अनेक तंत्र ही नकळत आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतात. मायक्रोवेव्ह किंवा टेफ्लॉनचं आवरण असलेले तवे हे मध्यमवर्गात सर्रास वापरली जाणारी उपकरणं. त्यांचं तंत्रज्ञान मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या रडार यंत्रणा उभारणीच्या आणि उष्मारोधक पदार्थ तयार करण्याच्या प्रयोगातून विकसित झालं, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. ठराविक भूभागातील माणसांना लक्ष्यवेधी पद्धतीनं मारणं यासाठी जे तंत्र वापरलं गेलं तेच तंत्र माणसांच्या जगण्याला आवश्यक असलेलं अन्न शिजवू शकतं ही जाणीवच मुळात अस्वस्थ करणारी आहे. नेमकी हीच अस्वस्थता प्राजक्ता तिच्या कलाकृतीतून टिपते. स्वयंपाकघर हा घरातील अतिशय खाजगी असा कोपरा. पण त्यात सार्वजनिक पटलावरचं राजकारण असं सहजतेनं प्रवेश करतं. आपल्या खाण्याच्या, स्वयंपाकाच्या सवयी, पद्धती यातून घडत जातात आणि याच प्रक्रियेतून आत-बाहेर, खाजगी-सार्वजनिक यातल्या सीमारेषा धूसर बनत जातात.

छायाचित्र सौजन्य: प्राजक्ता पोतनीस आणि प्रोजेक्ट८८, मुंबई
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे | मार्च २०१६