ते टोळांचे ढग नव्हते तर मग कशाचे होते?


मुंबईच्या नॅशनल गॅलरी अॉफ मॉर्डनअार्टच्या तिसऱ्या मजल्यावरच्या घुमटाकार छत असलेल्या दालनात तुम्ही प्रवेश करता. जवळपास २२६ लांब आणि ९ फुट उंचीच्या पांढऱ्याशुभ्र गोलकार भिंतीवर कोळशाने रेखाटलेल्या मानवाकृती आणि लॅंडस्केप्स यांचा पट आपल्यासमोर उलगडत जातो. प्रभाकर पाचपुते गेली काही वर्षं कोळसा खाणी, भू-संपादन, तिथले कामगार, शेतकरी यांचं जगणं या विषयांना धरून कलाकृती निर्माण करत आलाय. त्याच्या 'ते टोळांचे ढग नव्हते' ('नो, इट वॉज नॉट द लोकस्ट क्लाऊड') या एकल प्रदर्शनातल्या या चित्रमालिकेमध्ये हेच मुद्दे एकत्रतपणे आपल्याला पाहायला मिळतात.

मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या प्रभाकरच्या कलाकृती खैैरागढच्या कला महाविद्यालयात शिकत असताना या मुख्यत: त्याच्या अवतीभवतीची माणसं, त्यांची कथन यांच्याशी निगडीत होती. नंतर बडोद्याच्या शिल्पकला विभागातून एम.एफ.. करताना चिलीमध्ये खाणीतल्या स्फोटांच्या दरम्यान झालेला अपघात आणि त्याच दरम्यान चंद्रपूरच्या खाणीत झालेला अपघात हा या विषयावर काम करण्यासाठी सुरुवातीचा बिंदू ठरला. त्याच्या आजोबांपासून घरातले-नात्यातले अनेकजण खाणीत काम करत आले आहेत, काहींच्या जमिनी गेल्या आहेत, त्या बदल्यात त्यांना खाणीत राबावं लागतंय, हा वैयक्तिक अनुभव त्याचं कलाविश्व समृद्ध करायला कारणीभूत ठरला.

भिजलेला पांढरा ढग आणि एक्झिट


डेड सी मॅन आणि टुमाॅरो इज अनादर डे


२०१३ साली कलकत्त्याच्या एक्सपरिमेंटर गॅलरी मध्ये भरलेल्या 'लॅंड इटर्स' या प्रदर्शनात कोळशाच्या खाणी, कामगार, धोकादायक काम, खाणीतले बोगदे, अंधाऱ्या वाटा यांच्या प्रतिमा प्रभाकरच्या रेखाटनांमधून उमटत राहतात. त्या आधी, 'केनरी इन अ कोलमाइन' या त्याच्या क्लार्क हाऊसमध्ये भरवलेल्या पहिल्या एकल प्रदर्शनात त्याने प्रेक्षकांना कोळशाच्या खाणीचा अनुभव दिला. कुलाब्यातल्या जुन्या इमारतीतल्या अंधाऱ्या खोल्यांतल्या भिंतींवर काढलेली रेखाचित्रं प्रेक्षक टॉर्चच्या प्रकाशात पाहाताना खाणीतलं कोंदट वातावरण, खाणकामगारांचं कष्टाचं जीचन, त्यातून केवळ शरीरावरच नव्हे तर मनावर होणारे आघात या सगळ्याचं दर्शन यातून घडत राहातं. तुकड्या तुकड्यात दिसणाऱ्या मानवाकृती एकसंधपणे आपल्या मनात उभ्या राहातात. याउलट, एनजीएमएच्या दालनात आतापर्यंतचे सर्व आकार, आकृतीबंध एकत्र येत त्यांचा एक पॅनोरामा उभा राहातो. अशाप्रकारे, निसर्ग चित्र किंवा लॅंडस्केप या कलाप्रकाराला समकालीन संदर्भात बघताना केवळ नयनरम्य डोंगर-दऱ्या किंवा समुद्रकिनारे अशा प्रकारे मांडणी न करता खरंच आपल्या आत रूतत जाणऱ्या, विचारविश्वावर प्रभाव टाकणाऱ्या, निरंतर बदलत जाणाऱ्या भवतालाचे, सामाजिक-सांस्कृतिक स्थिंत्यंतरांचे पडसाद त्यात दिसतात की नाही हे पाहाणंही महत्वाचं ठरतं. हे टिपणं, त्यावर भाष्य करणं हेच कलाकारांच्या समकालीन असण्याचं द्योतक ठरतं आणि तरंच लॅंडस्केप हा कलाप्रकार आज एक समर्पक आणि सामर्थशाली कलाप्रकार बनू शकतो. तेच नेमकं प्रभाकरच्या रेखाटनात दिसतं.

विदर्भातले खाणकामगार आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव जरी तो टिपत असला तरीपण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता एका प्रकारे वैश्विक बनतं. जर्मनी, वेल्स पासून ब्राझिल, तुर्कस्तान पर्यंतच्या खाणी, तिथले अनुभव, कामाची व्यवस्था, खाणींचा इतिहास याचा अभ्यास करून प्रभाकर ते त्याच्या कलाकृतीतून मांडत आलाय. एकीकडे, या प्रतिमा अनिल बर्वे यांच्या 'अकरा कोटी गॅलन पाणी' मधला झगडा, किशोर कवठे यांच्या 'डगान' मधल्या खाणकामगारांच्या आयुष्यावरच्या कविता किंवा नवजोत अल्ताफ यांच्या सध्याच्या चालू प्रकल्पातल्या छत्तीसगडमधल्या वेदांत-बाल्को मालकीच्या खाणींचं चित्रण यांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभ्या राहातात. तर दुसरीकडे, प्रभाकर या माध्यमांची सरमिसळ करत, त्यांना एकमेकांना पूरक पद्धतीने एनजीएमएच्या प्रदर्शनात आणतो. चंद्रपूरच्या सप्तरंग या खाणकामगार-कवी-शेतकरी यांच्या कलेक्टीवच्या प्रभाकर अनेक वर्षं संपर्कात आहे. त्यातूनच किशोर कवठे आणि मनोज बोबडे यांच्या कवितेतल्या प्रतिमा प्रभाकरच्या कलाभा़षेचा अविभाज्य भाग बनत जातात. १३ दिवस भिंतींवर ही रेखाटनं करण्यासाठी दिलेला वेळ आणि शारीरिक श्रम यातून तयार झालेली ही चित्रमालिका क्युरेटर झाशा कोला म्हणतात त्याप्रमाणे जणू 'श्रमाचं महाकाव्य' बनतं. चित्रमालिकेच्या चक्राकार रचनेत त्या श्रमाची, शोषणाची, त्यातूनही उमटणाऱ्या आशेची कथनं प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. टोळधाड, पिकाला लागलेली कीड किंवा पावसाचं दुर्भिक्ष या नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत असा सार्वत्रिक समज असताना तो खोडून काढत प्रभाकर प्रेक्षकांसमोर सरळसरळ प्रश्न उभा करतो. या भीषण परिस्थिती नेमकी सामाजिक-राजकीय कारणं काय आहेत? ही टोळधाड जर नसेल तर नेमकं यामागचं कारण काय आहे? अशावेळी जमिनी बळकावणाऱ्या कंपन्या, फुटकळ किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारे मालक, कुटुंबातल्या एखाद्याला खाणीत नोकरी देऊन स्थलांतराला भाग पाडणारी धोरणं यासाठी या प्रदर्शनात टोळांचे ढग हे रूपक म्हणून आपल्यासमोर येतं. यात कोळसा हा केवळ रेखाटनांचा विषय न राहता तो प्रभाकरच्या चित्रांचं माध्यमही बनतो. चारकोल या माध्यमाचा त्याने जाणीवपूर्वक केलेला वापर त्यांच्या रेखाटनांना वेगळीच खोली आणि अर्थ प्राप्त करून देतात.

रहीम काका


रेझिस्टन्स


घुमटाकार इमारतीतल्या गोलाकार भिंतींवरची चित्रं आणि मध्यभागी छतावर दिसणारा अॅनिमेशन-पट हे 'पॅनॉप्टिकॉन' रचनेचा आभास निर्माण करतात. 'पॅनॉप्टिकॉन'मध्ये गोलाकार रचनेच्या इमारतीच्या केंद्रस्थानी भोवतालावर पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यरत असते. ती पाळत नेमकी कधी आणि कशी ठेवलीये हे लोकांना कळत नसल्यामुळे सतत शिस्त पाळण्यास त्यांना भाग पाडलं जातं. एवढंच नव्हे तर ते सत्ता राबवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. (मिशेल फुको, डिसिप्लीन अॅंड पनिश, १९७५) पिओत्र द्युमाला या पोलंडच्या कलाकारानी विकसित केलेलं 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'चं तंत्र वापरून हा अॅनिमेशन-पट तयार केला आहे. यात एक चित्र कागदावर किंवा कुठल्याही पृष्ठभागावर काढून ते खोडून टाकायचं आणि पुढची कृती दाखवणारं चित्र पुन्हा काढायचं अशा पद्धतीने चित्रांचे एकमेकांवर थर तयार होतात. ते कॅमेऱ्यातून टिपून त्यांची एकत्रितपणे चित्रमालिका बनवली की त्यातील वस्तू किंवा व्यक्ती यांचे हालचालींचे टप्पे धुसर का होईना पण पाहाणाऱ्याला दिसत राहतात. दुर्बिणीतून दोन डोळे चारही दिशांना रोखून पाहातात, करडी नजर ठेवतात. त्यात मॅनेजर किंवा सर्वेक्षकाचे ते डोळे हे एक पात्रच बनून जातं आणि ते ड्रोनच्या रूपात भिंतीवरच्या चित्रातही दिसत राहातं. 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'च्या कृतीतच अंतर्भूत असलेलं विध्वंसक रूपही एकप्रकारे जमिनीचा आणि निसर्गाचा होणाऱ्या अनियंत्रित विकासाचं आणि पर्यायानं विनाशाचं प्रतीक बनतं.

या चक्राकार चित्रमालिकेत आपल्याला दिसत राहातात ते शेतकरी अन् खाण कामगार, त्यांच्या डोक्यांच्या जागी बसवलेली शेतीची अवजारं, नांगराचे फाळ, फवारणी यंत्र अाणि खाणीतले हेडलाइट. यातल्या प्रतिमा आणि त्यांचे अर्थ शब्दश: आहेतच पण रूपकात्मकही आहेत. सुरुवातीला फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावणारा कीटकांचा भलामोठा ढग आहे. पर्वताच्या सावलीच्या टोकावर एक कललेली बोट आहे जी सरकारी रसद पुरवण्यासाठी आलेली असली तरी ती मदत प्रत्यक्ष किती जणांपर्यंत पोहोचते असा प्रश्न प्रभाकर इथे विचारतो. यानंतर, मध्यभागी खाली वाकलेली एक मानवाकृती, बहुधा कंपनीचा मॅनेजर, जमिनीला पडलेल्या भेगा पाहाताना दिसते. कारावाजिओच्या 'डाऊटींग थॉमस' या चित्राला तो संदर्भ म्हणून वापरतो. थॉमस ज्याप्रमाणे येशूच्या जखमा बोटाने तपासू पाहातोय त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीवर विश्वास न ठेवू शकणारे लोक जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये बोटं खुपसून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात पण ही वास्तवापासूनचं त्यांचं तुटलेपणच दर्शविते. 'भिजलेला पांढरा ढग' या चित्रात तो कापसात पाणी टाकून त्याचं वजन वाढवण्याचा आणि पर्यायाने स्वत:चं नुकसान टाळण्यासाठी धडपडणारा शेतकरी चित्रीत करतो.

ड्रीम अॉफ द मॅनेजर


लॅंड एस्केप

मॅनेजरची प्रतिमा प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये पुनःपुन्हा येत राहाते. ती कागद्याच्या लगद्याच्या शिल्पातूनही दालनाच्या एका भागात उभी असलेली आपल्याला दिसते. हुकुम देण्याच्या आविर्भावात असलेली ही मानवाकृतीच्या डोक्यातून खाणीतलं यंत्र बाहेर येतं आणि त्यातून जमीन सर्वेक्षणाचे तक्ते, नकाशाची भेंडोळी लोंबकाळताना दिसतात. सतत नवीन जमिनीच्या शोधात असलेला हा सर्वेक्षक जणू तिथल्या जमिनी त्याच्या एका आदेशावर नियंत्रित करत असतो. दुसऱ्या बाजूला, काही मानवाकृती भिंत, जमिनीचे तुकडे हालवताहेत, डोक्यावर वाहून नेताहेत. यात केवळ जमिनीचाच नव्हे तर तिथल्या माणसांचाही कायापालट होताना दिसतो. हे सगळं चालू असताना परत एकदा ढग जमू लागतात. यावेळी छतावरच्या अॅनिमेशन-पटातील सर्वेक्षकाचे पाळत ठेवणारे डोळे ड्रोन कॅमेऱ्याप्रमाणे गटा-गटानी घोंघावू लागतात, आपलं वर्चस्व लादू पाहातात. लाल-पांढरे पट्टे असलेले वात-दर्शक येऊ घातलेल्या वादळची जाणीव करून देतात. आणि हे वादळ आल्यानंतरही 'रेझिस्टन्स' या चित्रात माणसं आपल्या जमिनींना धरून ठेवतात. या मानवाकृती पृथ्वीच्या गोलावरील नकाशांची आठवण करून देत या विषयाला पुन्हा जागतिक पातळीवर नेतात. पण त्याचबरोबर, स्थानिक विरोध, संघटना, पुनर्वनीकरणाची प्रक्रिया, शेतकरी-कवी-कामगारांचे गट यांचं प्रतीक बनून आपल्यासमोर येतात. तर, 'डेड सी मॅन' मध्ये बंद झालेल्या खाणी रेतीने न भरल्यामुळे जमिनीच्या खाली तयार झालेली पोकळी, त्यात साठत जाणारं पाणी, त्यामुळे होणारे अपघात, हरवलेली माणसं अन् जनावरं आणि त्या पोकळीच्या पृष्ठभागावर वसलेलं गाव, त्याचं अधांतरी भविष्य यावर भाष्य करते.

शेवटच्या टप्प्यात, मृत खाणींच्या बाबतीतली जगाच्या इतर भागातील धोरणं, त्या जागांचा केला जात असलेला पुनर्वापर हे प्रभाकर अधोरेखित करू पाहातो. खाणीची प्रचंड मोठी जागा ही अनेक ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, स्टेडियम किंवा संग्रहालयात रूपांतरीत केली गेली आहेत. तसंच काही पर्याय आपल्या इथे असू शकतात का, असा एक आशावाद यातून दिसतो पण त्याचबरोबरीनं, चित्रातल्या स्टेडियममधून बाहेर पडणाऱ्या माणसांचा पुन्हा एकदा 'टोळांचा ढग' तयार होताना दिसतो आणि तो जमिनी बळकावण्याच्या दिशेने प्रवास करू लागतो...त्यामुळे हेच चक्र पुढेही चालू राहाणार की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आपण शोधणार, असा सरळ सरळ प्रश्न प्रभाकर प्रेक्षकांसमोर उभा करतो आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो.

छायाचित्र सौजन्य: प्रभाकर पाचपुते आणि झाशा कोला
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जून २०१६