सीमरेषा धूसर होताना: शिल्पा गुप्ता यांची मुलाखत (पूर्वार्ध)



शिल्पा गुप्ता ही समकालीन कलेतलं एक महत्त्वाचं नाव. जागतिक पातळीवर तिच्या कलाकृती वाखाणल्या गेल्या आहेत. हवाना, सेऊल, सिडनी, शांघाय, ग्वांग्जु इथल्या बिनाले सारख्या अनेक मोठ्या कलाप्रदर्शनांध्ये शिल्पा सहभागी होत आली आहे. सर्पंटाईन गॅलरी, टेट मॉडर्न, न्यू म्युझियम, मोरी म्युझियम यासारख्या आंतर्राष्ट्रीय संस्थांमध्ये तिच्या कलाकृती प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता यांच्या मिलाफातून तिने राष्ट्रवाद, स्थलांतर, देशांच्या सीमारेषा, यासारखे अनेकविध मुद्दे हाताळले आहेत. तिच्या मुलाखतीतील हे काही अंश.

तू 'जेजे'ला असल्यापासून नवनवीन माध्यमं हाताळायला लागलीस, प्रयोग करत राहिलीस... त्यातूनच तुझी कलाभाषा विकसित होत गेली, त्याबद्दल सांगू शकशील काय?

सुरुवातीपासूनच मला न्याहाळणं, पाहाणं आणि त्याची व्यक्तिसापेक्षता यात रूची होती. आपण वस्तूंकडे, खासकरून कलावस्तूंकडे, कसे पाहातो, त्यांचे अर्थ कसे लावतो, असं काय असतं जे एखाद्या वस्तूला कलाकृती बनवतं किंवा नाही? कॉलेजमध्ये असताना मला कुणीतरी सांगितलं होतं की इंडोनेशिया मधल्या कुठल्यातरी भाषेत 'कले' साठी प्रतिशब्दच नाहीये. त्यासाठी 'जगणं' हाच शब्द ते वापरतात. कलेची नेमकी व्याख्या काय आहे, कलाकृती कशी समजून घ्यायची, तिच्याकडे कसं पाहायचं, तिचे अर्थं कसे समजून घ्यायचे... मी 'जेजे'ला शिकायला लागल्यावर विविध वस्तू वापरून कलाकृती बनवू लागले. ते का करत होते मला तितकंस कळत नव्हतं पण मला वस्तू हाताळण्यात, त्यांना कलाकृतींमध्ये बांधण्यात रस होता. मला चित्रकलेचं-शिल्पकलेचं तंत्र शिकण्यात रस होताच पण त्याचबरोबरीनं साधारण १९९२-९४ च्या आसपास मी 'जेजे'त असताना घुंगरू किंवा जिलेटीन पेपरचे डब्बे या सारख्या वस्तू आणून त्यांच्या रचना करून शिक्षकांना दाखवायचे. एकच चांगली गोष्ट होती ते म्हणजे त्या शिक्षकांनी मला कधी उडवून लावलं नाही, असल्या प्रयोगांना ते प्रोत्साहनच देत राहिले. मग मला एक सिनियरनी सांगितलं की तू ज्या प्रकारचे प्रयोग करतेस तशा प्रकारचं काम कलाकार करत आले आहेत, त्यातूनही माझी कलाभाषा विकसित होत गेली

Untitled (1997)

 

कलावस्तू आणि कलाकाराचं घडणं हे कलाकाराची कलाभाषा तयार करत असतं. तुझ्याबाबतीत ते कसं उलगडत गेलं?

१९९०च्या आसपासच्या काळात अचानकपणे आजूबाजूला बदल घडताना दिसून येत होते...व्हीएचएस, इंटरनेट, बिलबोर्ड्स...या सगळ्याचा परिणाम होत होताच. तेच माझ्या कामात उतरत गेलं कारण तेच माझं वास्तव होतं, त्यातूनच माझ्या कामातल्या प्रतिमा आणि विषयवस्तू ठरत गेल्या. माझं सुरुवातीचं काम लालसा, हाव, इच्छा याभोवती आकाराला आलं. त्यामुळेच सुरुवातीपासूनच माझं काम हे विषयवस्तू, त्यांचे अर्थ या विषयी होतं. त्यामुळे ते केवळ जन-कलेच्या अंगानं नव्हतं तर त्यातून मी कलावस्तू, कलाकार आणि प्रेक्षक यांचातल्या अवकाशाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. कारण कलाकार आणि कलावस्तू यांच्यातलं नातही बऱ्याचदा क्लेशदायक असतं...कलाकार हा सजग संकलक असतो पण त्याचबरोबर तो त्याच्या आंतर्भानाशी बांधील असतो. तेच त्याच्या कलाकृतीत उमटत असतं. पण त्याचबरोबर, ही कलावस्तू कुठेतरी सार्वजनिक अवकाशात मांडली जाते हे वास्तवही विसरता येत नाही. त्यामुळे प्रेक्षकाचं अस्तित्व तर महत्त्वाचं होतंच पण एका पातळीवर कलाकारही प्रेक्षक बनतो या वास्तवाचं भान मला सतत होतं. मी जेजे'ला असताना एक मांडणीशिल्प केलं होतं. त्यात दोन लाकडी चौथऱ्यांवर दुधाच्या बाटल्या ठेवल्या होत्या. एका चौथऱ्यावरच्या बाटल्यांमध्ये पानपसंदच्या गोळ्या होत्या तर दुसरा संच लांबून रिकामाच दिसत होता. जवळ येऊन पाहिलं की त्यातली वाक्यं प्रेक्षकांना वाचता येत, 'हेल्प युअरसेल्फ. प्लीज लाइक मी, आय वॉन्ट यू टू लाइक मी.' यातून कुणाच्या नजरेला (गेझ) कलावस्तूचं अतिसंवेदनशील असणं आणि वस्तूंतलं प्रत्यक्ष अंतर, त्यांचा एका ठिकाणहून दुसरीकडे होत जाणारा प्रवास, त्याबरोबरचं अर्थघटन, त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य पण भेगाळलेल्या स्मृती हे सारं मला समजून घ्यायचं होतं.

जनकला या कलाप्रकाराबद्दल किंवा गॅलरीबाहेर जाऊन काम करणं हेही तू आजमावत आली आहेस, त्याकडे तू कोणत्या दृष्टीकोनातून पाहातेस?

सार्वजनिक अवकाशात एखादी कलाकृती तयार केली किंवा मांडली म्हणून ती जनकला या प्रकारात मोडतेच असं नाही. त्यासाठी कलाकाराचा दृष्टिकोन, त्यांचे संदर्भ, त्यांना अंगिकारलेल्या कार्यपद्धती या सगळ्यातून ते ठरत जातं, असं मला वाटतं. मागे वळून बघताना हे 'पब्लिक' कोण आहे, हेही पाहाणं महत्त्वाचं ठरतं. जेजे'च्या शेवटच्या वर्षाला असताना जंहागीरला प्रदर्शन भरायचं. मी काही स्मृती विकायला ठेवल्या होत्या. लोकं त्यातल्या त्यांना पाहिजे त्या स्मृती विकत घेऊ शकत होते. आमच्या या कलाकृतींसाठी चांगली जागा मिळवण्यासाठी आमच्यात चढओढ असायची. मी तशी जागा पटकावली पण शिक्षकांनी माझं मांडणीशिल्प पाहून मला दारासमोर माझी कलाकृती मांडायची सूचना केली. मी आधी थोडी हिरमुसले पण मग तिथं मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या कामासाठी तोच 'बेस्ट स्पॉट' होता. तिथे लोकांची सतत ये जा होती, त्यामुळे अधिक मोकळेपणा होता, मला अनेक गोष्टी ताडून पाहाता येत होत्या, कलादालनात जाणवणारा हलकासा ताण नव्हता आणि अधिक जिवंतपणा होता. त्याचबरोबर, कलाकृतीला वेगळा अर्थ प्राप्त होत होता. त्यामुळे गॅलरी लकीरे असेल किंवा केमोल्ड असेल, सुरूवातीपासूनच माझा कलाव्यवहार आंतरक्रियात्मक राहिलेला आहे

Shadow 3 (2007)

Memory (2007)
 

'आरपार' हा भारत आणि पाकिस्तानमधल्या कलाकारांच्या सहयोगातून झालेला प्रकल्प होता. त्याची सुरूवात कशी झाली, पुढं तो कसा बहरत गेला? लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?

१९९९ मध्ये दिल्लीला खोजच्या कार्यशाळेत वेगवेगळ्या देशातले कलाकार आले होते. तिथेच माझी हुमाशी मैत्री झाली. टेलिविजनवर तेव्हा कारगीलच युद्ध चालू झालं होतं. आम्ही अखंड गप्पा मारायचो, दंगा करायचो. त्या गप्पांच्या दरम्यान आम्हाला वाटलं की काहीतरी एकत्र करायला हवं. कार्यशाळा संपल्यावरही आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो त्यातूनच 'आरपार १'चा जन्म झाला. मग पुढे आम्ही आरपार २ आणि ३ ही आयोजित केले. पहिल्या भागात दोन्ही देशातले पाच-पाच कलाकार सहभागी झाले होते. हुमा तेव्हा कराचीत राहात होती. आम्ही कलाकारांकडून ए४ आकाराच्या कलाकृती मागवल्या आणि भारतीय कलाकारांच्या कलाकृती पाकिस्तानात पाठवल्या आणि पाकिस्तानी कलाकारांच्या इकडं आणल्या. मी त्यात कलाकार म्हणूनही सहभागी झाले होते. यात सगळ्या रोचक भाग होता तो म्हणजे कलाकारांचा प्रतिसाद. उदाहरणार्थ, बालाने केलेलं काम हे त्याच्या नेहमीच्या शैलीपेक्षा फार वेगळं होतं, इतकं की ते माझंच काम आहे असं बघणाऱ्याला वाटू शकलं असतं. त्यामुळे कलाकारांच्या मनातही एक कल्पित प्रेक्षकवर्ग होता ज्याच्यासाठी त्यांनी या कलाकृती बनवल्या असाव्यात.

या कलाकृती रस्त्याकडेची दुकानं, भिंती, पोस्टाच्या पेट्या, कॅफे यावर आम्ही चिकटवली जेणेकरून येता-जाता ती लोकांच्या नजरेस पडतील. एका कलाकृती उर्दू भाषेतला लिखित मजकूर होता, ते मग मी ज्या भागात लोकांना उर्दू वाचता येईल अशा भागात लावलं. आणि लोकांच्या प्रतिक्रिया म्हणशील तर ते जोखणं अवघड होतं कारण मी एकटीच तेव्हा हे शहरभर चिकटवत होते. नंतर, 'शॅडो ३' च्या वेळेला मी कार्टर रोडवर थांबून लोकांशी बोलायचे, त्यांचं मत समजून घ्यायचे. पण ही तर अगदीच सुरूवात होती. त्यामुळे प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे समजून घेणं अवघडच होतं. सार्वजनिक अवकाशात जेव्हा तुम्ही सर्वसाधारणपणे जाहिराती पाहाता, एकतर कंपन्यांच्या किंवा राजकीय पक्षांच्या. त्यात तुम्हाला काहीतरी विकत घ्या, मत द्या असं आवाहन असतं. या कलाकृतींमध्ये तसं काहीच नव्हतं, त्यामुळे त्या प्रतिमा मनात खोलवर रूजणाऱ्या असल्या तरी असा सरळ सरळ प्रतिसाद येईलच असं काही नाही.

आरपार २ च्या वेळी एका पाकिस्तानी कलाकारानी पाठवलेल्या कलाकृतीवर नकाशा होता आणि हिरव्या रंगात उर्दूत काही मजकूर होता. मी ते लावत काळाघोडापासून बांद्रयाकडे चालले होते. तेव्हा माझ्या मदतनीसाला पोलिसांनी थांबवून 'बाईंना थांबायला सांगा नाहीतर 'पोटा' लावू' अशी धमकीही दिली होती. मुळात तो मजकूर काय आहे हे समजून घ्यायची तसदीही त्यांनी घेतली नाही. खरंतर त्यात कराचीत असलेल्या 'बॉम्बे हाऊस', 'दिल्ली दरबार' या इमारतींचे उल्लेख होते.

त्यावेळी विडिओ आर्टची पण सुरूवात होत होती. त्यामुळे, आरपार ३ मध्ये आम्ही विडिओ एकमेकांना पाठवले, त्यातले काही मी कार्टर रोडवर दाखवले होते, कॉलेजमध्येही स्क्रिनिंग्ज केली. यामध्ये सहभागी बहुतेक कलाकारांसाठी असं रस्त्यावर आपलं काम घेऊन जाण्याचा हा पहिलाच अनुभव होता.

(क्रमशः)

मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: शिल्पा गुप्ता
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जुलै २०१६