सीमरेषा धूसर होताना: शिल्पा गुप्ता यांची मुलाखत (उत्तरार्ध)


माझ्या जनकलेवरच्या प्रकल्पावर काम करताना शिल्पा गुप्ता बरोबर प्रदीर्घ गप्पा मारायची संधी मिळाली. तिची कामाची प्रक्रिया, कामात उमटणारे कळीचे मुद्दे, माध्यमांची तिची जाण आणि हाताळणी, जनकलेबद्दलची तिची मतं तिने या मुलाखतीत उघड केली. त्या मुलाखतीचा हा दुसरा भाग.

तुझ्या नंतरच्या कामात हा धागा सतत दिसत राहतो... तुझ्या कलाव्यवहारातील आंतरक्रिया हा एक भाग झाला पण त्याच बरोबर कलाकृती खासगी कलादालनात न एकवटता ती त्यातून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडत राहिली मग ते 'देअर इज नो बॉर्डर हिअर' मध्ये असेल किंवा 'ब्लेम' मध्ये...

'ब्लेम'चा जन्म आरपारच्या दरम्यानच झाला. २०००च्या सुमारास. ए४ आकारात छापलेल्या पोस्टरवर 'ब्लेम' लिहिलेल्या रक्त भरलेल्या बाटलीच चित्र होतं. त्यानंतर गुजरात दंगली झाल्या. तेव्हा ते काम पुढे नेत मी काचेच्या बाटल्यामध्ये रक्तासारखा द्रवपदार्थ भरुन तो मुंबईच्या लोकलमध्ये विकायला नेला. त्यावर 'ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्याबद्दल मी तुम्हाला दोषी ठरवते - तुमचा धर्म, तुमचे राष्ट्रीयत्व' अशी लेबलं लावली होती. मग माझ्या बांद्रा ते फोर्ट अशा वाऱ्या सुरू झाल्या. मी माझ्या नातेवाईकांपैकी कुणालातरी लोकलमध्ये घेऊन जायचे. त्यांच्यापैकी कुणीतरी बाटलीबद्दल विचारायचे, विकत घ्यायचे, मुख्य म्हणजे काहीतरी संवाद सुरू करून प्रवाशांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी हा खटाटोप करायचे. पण मग लक्षात आलं की हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. मुंबईच्या लोकलमध्ये बायका सहज माझ्याकडे काय आहे ते बघायला मागायच्या आणि मोजून सगळ्या बाटल्या जशाच्या तशा परतही यायच्या. ते पाहून बायका अंतर्मुख व्हायच्या. त्यावरचा लिहिलेला मजकूर अगदीच स्पष्ट-स्वच्छ आहे. आणि तो मजकूर हिंदी, इंग्लिश, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषात होता. काही जण याचं काय करू असंही विचारायचे. मी त्यावेळी गोध्रा किंवा इतर कुठल्याच संदर्भाविषयी बोलायचे नाही पण त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची मत जाणून घ्यायचे.



ब्लेम, २००२-२००४


देअर इज नो बॉर्डर हिअर, २००५-६


'ब्लेम' ही कलाकृती आहे हे मला कुणाला सांगावं लागलं नाही किंवा लोकानीही कधी विचारलं नाही, भारतात आणि भारताबाहेरही. लोक त्याच्याकडे एक वस्तू म्हणूनच पाहात होते. ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं. परदेशातल्या एका म्युझियममधल्या प्रदर्शनाच्यावेळो आम्ही बाहेर त्या बाटल्या वाटत होतो. एक मुलगी ती बाटली घेतल्यावर हमसून रडायला लागली. आमचं शुटिंग करणारा कॅमेरामन ते बंद करून आमच्यात सहभागी होऊन बाटल्यांचं वाटप करू लागला.

त्यानंतर 'नो बॉर्डर' आलं...चिकटपट्ट्यांवरती ही अक्षरं छापलेली होती. ते खासगी-सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी प्रदर्शित केलं गेलंय. अजूनही कुठे कुठे मला त्या चिकटपट्ट्या वापरलेल्या दिसतात; एखाद्या ग्राफिटी कलाकारानी असेल, गोव्यातलं होटेल असेल किंवा गोदरेजने आयोजित केलेल्या प्रदर्शनातला कलाकार असेल.


समकालीन कलेमध्ये Intersubjectivity किंवा आंतरव्यक्तिक असणं हा ही एक महत्त्वाचा पैलु आहे. कलाकृती ही कलाकाराची तर असतेच पण त्याचबरोबर प्रेक्षकही त्या कला निर्मितीमध्ये, अर्थनिर्मितीमध्ये भाग घेत असतात...

माझ्या कामात ते आहेच. पण मी ते वेगळ्या संदर्भात अनुभवलं. मी सुरूवातीला नोकरी करायचे, प्रोजेक्ट्स वर काम करायचे. त्यात वेब डिजाईन करायचे प्रामुख्याने. तर न्यू मिडीया कलाकृतीसाठी मला बोलावलं जायचं. त्यात वेरिएबल्स असतात, तुम्ही ठरवता प्रेक्षकांना कुठून कुठे न्यायचं ते पण माझ्या कामात कथनं असतात आणि प्रेक्षक एका अर्थी त्या कथनाला पूर्णत्व देतात. प्रेक्षक तो प्रवास पूर्ण करतात, त्यांची वाट जरी ते निवडत असले तरी त्याची संहिता मी दिलेली असते. अर्थात हे झालं कंप्युटर किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या कलाकृतीच्याबाबतीत. पण जिथे प्रत्यक्ष कलावस्तू किंवा रोजच्या वापराच्या वस्तू येतात तिथं हे बदलतं. उदाहरण म्हणजे 'नो एक्स्प्लोजिव' लिहिलेल्या पिशव्या असतील किंवा ग्रेव्ह स्टोनची मालिका. गॅलरीबाहेर ते गेल्यावर काय घडतं हे बघणंही तितकच मजेशीर आहे. 'देअर इज नो एक्स्प्लोजिव इन धिस'च्या कापडी पिशव्या ठेवल्या होत्या आणि लोकांना त्या घेऊन बाहेर फिरण्याचं आवाहन केलं. जगभर पसरवला गेलेला दहशतवाद, त्याचं अर्थकारण, त्यातून आलेल्या सतत पाळत ठेवण्याच्या पद्धती, त्याची आपल्या खासगी आयुष्यातली घुसखोरी हे सगळंच यातून मला मांडायचं होतं. पण त्या घेताना लोकांची अस्वस्थता जाणवायची. काही जण लगेच उचलायचे तर काही जणांची बराच वेळ चुळबुळ चालायची. काही जण मोठ्या आकाराच्या बॅगा घ्यायचे, काही अगदी लहान. एकदा ओपनिंगच्या आधी मीच ती बॅग घेऊन फिरले, काही मोक्याच्या ठिकाणी थोडा वेळ लोकांच्या प्रतिक्रिया आजमावत उभी राहिले. लोकांनी मला ईमेलनेही कळवलं की बॅग घेऊन गेल्यावर काय झालं आणि आत्ता ती बॅग कुठे आहे इत्यादि. त्यातल्या काही जणांनी ती लपवून ठेवली होती तर काही जणांनी आपल्या अॉफिसमध्ये सर्वांना दिसेल अशी ठेवली होती. एकानी सांगितलं की पॅरिसमध्ये त्याला पुन्हा पुन्हा सेक्युरिटी चेक मधून जावं लागलं, शेवटी त्यातून काहीच निघालं नाही म्हणल्यावर त्याला सोडलं.

'१२७८ ग्रेव्ह स्टोन्स' यात मी हे संगमरवरी दगड ठेवले होते. काहींवर नंबर टाकले होते, काहींवर नाही. त्या दगडांपर्यंत प्रेक्षक कसे येणार, कुठल्या बाजूने येणार, त्यातं शीर्षक नेमकं कुठे लावलेलं असेल, या सगळ्याचाच बारकाव्यात जाऊन मी विचार करते. यातही आलेले लोक दगड घेऊन जाऊ शकत होते. अट एकच होती की त्यांनी त्या दगडाचे केअरटेकर बनायचे. लोकांच्या अनेक भावना तिथं व्यक्त होताना दिसल्या: लोक संशय व्यक्त करत होते, दुःखी-कष्टी होत होते, उत्तेजित झाले होते. काही जणांना नेमकं काय आहे ते कळत नव्हतं. हे कश्मिरमधल्या अनामिक कबरींविषयी आहे असं मी सांगितल्यावर त्यांच्यात एकदम चलबिचल झाली. त्यातले काही जण ते घरी घेऊन गेले, ती कलाकृती आहे की नाहीये, त्याचं नेमकं काय करायचं, कुठे ठेवायचं असे प्रश्नं त्यांच्यासमोर होते. काहींनी ते 'अशुभ' असल्यामुळे परत आणून दिले, काहींनी घरामागे पुरले, एकाच्या हातून ती शिळा तुटल्यामुळे ते घाबरून गेले, पण अशाप्रकारे ते त्या कलावस्तूचे कथनकार बनले. आणि त्या कलावस्तूचा प्रवास त्यांच्या कथनातून पुढे चालू राहिला

देअर इज नो एक्स्प्लोजिव इन धिस, २००७-८
 

थ्रेट, २००८-९



अशाप्रकारच्या संवादात्मक प्रक्रियेतून तुझी कलाभाषा कशी घडते किंवा बदलते का?

नक्कीच. ती तर सतत घडणारी प्रक्रिया आहे. आधी मी बालाच्या कामाचं उदाहरण दिलं. त्याची आरपार मधली कलाकृती ही जवळपास माझी असल्यासारखीच वाटत होती. त्यात लिखित मजकूर होता. १९९५ पासून मी साधारणपणे मी बहुतेक वेळा लिखित मजकुराचा माझ्या कामात समावेश करत आलेय. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. प्रतिमेला अॅनोटेशन म्हणून, सुरूवात किंवा शेवट म्हणून, कलाकृतीचा-कलाकाराचा विषयीभाव असे अनेक घटक त्यात एकत्र येतात. त्यातून लोकांशी संवाद साधणं सोपं जातं. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातले लोक तर हे पाहातातच पण अधिक व्यापक अशा प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणं मला फार गरजेचं वाटतं. 'शॅडो ३' ला म्हणूनच मी कार्टर रोड वर मांडलं होतं. यात वेळ जातोच, पैसे उभे करा, पत्र लिहा, परवानगी मिळवा, वाटाघाटी करा. मला वाटतं हा कलाकृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्र असलेल्या कलाकृतीत तंत्रज्ञानही महागडं असतं त्यामुळे तो पैलुही लक्षात घ्यावा लागतो. सिडनी बिनालेत मी टच स्क्रीन वापरले होते पण मुंबईतल्या प्रदर्शनाच्या बजेटमध्ये ते बसणारं नव्हत मग मला ती कल्पना रद्द करावी लागली! बऱ्याचदा मी जुने कंप्युटर, भाड्याने आणलेली साधनं वापरते, तंत्रज्ञांच्या मागे लागून स्वस्तातलं आणि सहज वापरता येणारं तंत्र वापरण्यावर भर देते. 'शॅडो' किंवा 'स्पीकिंग वॉल' असेल, ते सहजपणे कुठेही घेऊन जाता येतं. लोकांच्या त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया त्याचमुळे महत्त्वाच्या ठरतात... माझ्या कला व्यवहाराचा मोठा भाग व्यापलाय तो माझं (कला)वस्तूशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यात. १९९५ च्या आसपास मी पोस्टानी ३०० लोकांना माझ्या कलाकृती पाठवल्या. x५ इंचाच्या कागदावर एक रेखाचित्र आणि मागच्या बाजूला लिहिलं होतं, 'प्लीज डिस्पोज आफ्टर यूज'. पण त्यातून जो अनुभव आलाय त्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न उरतोच! त्यामुळे जनकला असं काही एकवचनी गोष्ट नाही. त्याचबरोबर, या प्रक्रियेतील पुनरावृत्ती (उदा. पोस्टाचे स्टॅंप लावण्याची क्रिया आणि पत्रांच्या नंबर टाकलेल्या अनेक प्रती) आणि बहुलता ('सिंगिंग क्लाऊड' मध्ये वापरलेले अनेक आवाज) या दोन गोष्टी माझ्या कलाकृती आकाराला आणत असतात. 'थ्रेट' या कलाकृतीमध्ये थ्रेट हा शब्द लिहिलेले वीटेच्या आकाराचे साबण इन्स्टलेशनमध्ये मांडलेले होते. ते साबण प्रेक्षक घेऊन जाऊ शकतात, वापरू शकतात आणि जसा साबण झिजत जाईल तशी ती 'थ्रेट' कमी होत जाईल, अशी या मागची कल्पना आहे. आत्तापर्यंत साधारण तीस हजार साबण या माध्यमातून जगभर पसरलेत. यात दोन गोष्टी घडतात, एक तर आर्ट गॅलरीत कलाकृती केवळ विक्रीसाठी असाव्यात या समजाला तडा जातो आणि येणारे प्रेक्षक या कलाकृतीचा भाग बनतात, ती कलाकृती त्यांच्या जीवनाचा भाग बनते. काही लोकांनी ते साबण वापरले, काहींनी जपून ठेवले, काहींनी विविध प्रदर्शनात मांडले. असं त्या कलावस्तूचं स्वतःचं असं जग निर्माण होत जातं. तसंच, मी माझ्या कामासाठी डेटा पण गोळा करत असते. उदाहरणार्थ, 'हंड्रेड हॅंड ड्रॉन मॅप्स' हा २००७ पासून चालू असलेला प्रकल्प आहे. यात मी जगभरातल्या विविध देशातल्या लोकांकडून त्यांच्या देशांच्या नकाशाची चित्रं काढायला सांगून ती गोळा केली आहेत. या प्रक्रियेत त्यांचा विषयीभाव लक्षणीय ठरतो; एकाच गोष्टीकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टीकोन यातून स्पष्ट होतात आणि तेच कलाकृती घडवतात.


मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: शिल्पा गुप्ता
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, अॉगस्ट २०१६