जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग ४ )


शहरांचं सद्यकालीन रूपडं, त्यांना समजून-उमजून जनकलेच्या माध्यमातून त्याला सामोरं जाणारे कलाकार, त्यांचे कला प्रकल्प यांचा उहापोह करणारा हा अभ्यास प्रकल्प. कलकत्त्याला असताना लक्षात आलं की इथे महानगरीय जाणिवांतून फारसे कलाप्रकल्प आकाराला आले नाहीयेत. आत्ता कुठे जनकला व्यवहार इथं मुळं धरू लागलाय. कलकत्त्याचा आधुनिक कला इतिहास हा केवळ त्या शहरापुरताही मर्यादित नाही. शांतिनिकेतन आणि  परिसरात केले गेलेले कलेचे प्रयोग, लिखाण, अभ्यास  हे सगळंच त्यात समाविष्ट होतंच. वसाहतकाळात केलेला पौर्वात्यवादाचा विचार, त्यातून आकाराला आलेलं बंगाल स्कूल किंवा १९४३ च्या दुष्काळात आणि तेभागा चळवळीत चित्तोप्रसाद, सोमनाथ होर व झैनुल आबेदिन यासारख्या कलाकारांनी गावोगाव हिंडून काढलेली रेखाचित्रं किंवा स्वातंत्र्योत्तर काळातला 'कलकत्ता प्रोग्रेसिव्स' हा कलाकारांचा समूह असेल, कलेची नव्याने मांडणी आणि विचार करायची परंपरा या भागात चालत आलेली दिसते. त्याचबरोबर, अलिकडच्या काळात शिवकुमार यांनी केलेली 'कंटेक्श्चुअल मॉडर्निजम'ची मांडणीदेखील शांतिनिकेतनच्या कलाकारांनी पाश्चात्य एकप्रवाही आधुनिकतावादाला दिलेल्या आव्हानातून आणि त्यांच्या कलाविषयक तात्विक मांडणीतून आपल्यासमोर येते. पण दिल्ली-मुंबईच्या तुलनेत समकालीन कलेतले प्रवाह मात्र तिथे जरा उशिराने दाखल झाल्याचे दिसतात. याचं एक कारण तिथे अस्तित्वात नसलेल्या संरचनात्मक सुविधा, आर्थिक पाठबळ आणि खासगी कलादालनांचं जाळं, हेही असू शकतं.

अलिकडच्या काळात मात्र काही कला-हस्तक्षेप किंवा लोक समुदायांबरोबर सहयोगानं उभारलेले कला प्रकल्प दिसू लागलेत. पण तेही विखुरलेल्या स्वरूपात, शहराच्या विविध भागात आकाराला येत असताना त्यात कलकत्ता शहराबद्दलची जाणीव मात्र पुसटशीच दिसतेय. त्यात बऱ्याचदा कलाकार किंवा क्युरेटर हे कलकत्त्यामधले असले तरी त्यांचे कलाप्रकल्प इतरत्र आकाराला आलेत. नोबिना गुप्ता यांचा 'डिसअपिरिंग डायलॉग्ज' या प्रकल्पांतर्गत त्यांनी लडाख आणि मध्य प्रदेशमध्ये काम केले. संचयन घोष यांचे बरेचसे परफॉर्मन्सेस शांतिनिकेतन, आसपासची गावं तर एखाद-दोन प्रकल्प  कोची सारख्या शहरात पार पडले तर शायंतन मित्रने क्युरेट केलेला 'नो मॅन्स लॅंड' हा प्रकल्प भारत – बांग्लादेश सीमेवर दोन्ही देशातल्या कलाकारांच्या सहभागातून उभारला गेला.

शांतिनिकेतनच्या शिस्तीत शिकताना आणि नंतर तिथंच शिकवताना संचयन घोष यांनी मात्र प्रयोग करत स्वत:ची कलाभाषा आणि कलाव्यवहार घडवला. सुरुवातीचं शिक्षण चित्रकलेमधलं असलं तरी  परफॉर्मन्स, कार्यशाळा, अभिवाचन, इनस्टलेशन, जनकला प्रकल्प अशा विविध माध्यमातून त्यांनी त्यांची अभ्यासपद्धती विकसित केली. त्यांच्या कलाव्यवहार हा अनेक पातळ्यांवर काम करत असून त्यात अकादमीक संस्था, कला शिक्षणपद्धती आणि लोकसमूह यांच्यातील अवकाशाचा वेध घेत आला आहे. सुरुवातीच्या प्रकल्पात त्यांनी वास्तुकलेशी मेळ घालत तिथल्या घटकांमधून विविध आकृतीबंध तयार केले. इमारतीतल्या भिंतीवरच्या तारा, दरवाजे, खिडक्या किंवा जुन्या वाड्यांमधले कोरीव लेख अशी साधनं वापरून संचयनने हे आकृतीबंध तयार करत नवी अवकाशनिर्मिती आणि त्यातून अर्थनिर्मितीचा प्रयत्न केला. बादल सरकार आणि सफदर हाश्मी यांच्या पद्धती अवलंबत शांतिनिकेतनमधे परफॉर्मन्स सादर केले. त्यात विविध प्रकारचं लिखाण, शांतिनिकेतनमधल्या उघड्या जागा, जमीन-माती, ती खोदून तयार केलेलं अवकाश, त्या निवडक लिखाणाचं एका विशिष्ट लयीत केलेलं वाचन, सादरीकरणाचे प्रकार वापरून आकाराला आलेले परफॉर्मन्सेस अशा सगळ्याच्या मिश्रणातून त्यांच्या कलाकृती उभ्या राहिल्या. एक मानवी समूह म्हणून टिकून राहाण्यासाठी अनेक विधी आपण तयार करतो, रोजच्या जीवनाचा ते अविभाज्य भाग बनतात, असे विधी हे संचयन त्यांच्या कला व्यवहारात आणतात आणि त्यांना वेगळा अर्थ प्राप्त करून देतात. बऱ्याचदा त्या विधीपेक्षा त्यातला लोकांचा सहभाग जास्त महत्वाचा ठरतो आणि नेमकी हीच गोष्ट संचयन त्यांच्या कलाकृतीत अधोरेखित करू पाहातात. कोक्राजार मधल्या प्रकल्पात त्यांनी तिथल्या बोडो आदिवासींसोबत काम केलं. प्रत्येक घरात हातमाग असलेल्या या भागात विणकामाची मोठी परंपराच आहे. पण बदलत्या आर्थिक गणितांमुळे आणि त्या भागातल्या अस्थिरतेमुळे बऱ्याचजणांना आपले हातमाग एका मोठ्या कंपनीला विकायला लागले. आपल्याच हातमागावर ते काम करायचे पण ते कंपनीच्या नफ्यासाठी! या प्रकल्पाच्या प्रक्रियेत लोकांशी बोलताना, तिथली परिस्थिती समजून घेताना आसाममधल्या बोडो बंडाच्या काळात सरकारने कला महाविद्यालयाच्या परिसरात लष्कराचे ठोकलेले तंबू संचयनला रिकामे आढळले. त्यातल्या एका तंबूत त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीनी हातमाग उभा केला. त्या करिता इतर बंद पडलेल्या मागांचे सुटे भाग वापरले. त्यात लोकांनी त्यांचे अनुभव, बदलती स्थिती, सध्याची बोडोलॅंड चळवळ याबद्दलची त्यांची मतही मांडली.




संचयन घोष, शांतिनिकेतन

चितपूर लोकल, शुमोना चक्रवर्ती
अयनवा, परफॉर्मर्स इंडिपेंडन्ट

शायंतन मित्रा बोका यांच्या 'नो मॅन्स लॅंड' या प्रकल्पात भारत आणि बांग्लादेशमधले कलाकार सहभागी झाले आणि मेघालयाच्या प्रत्यक्ष सीमारेषेवर हे कला-हस्तक्षेप ढाक्याच्या ब्रित्तो आर्ट्स ट्रस्टच्या सहयोगातून पार पाडले. दोन्ही देशातल्या सीमारेषा इतक्या धुसर आहेत, भाषा, संस्कृती इतक्या जवळच्या आहेत की रोज ही देवाणघेवाण चालू असतेच. 'टेल अॉफ़ अ विंडो' या शिमुल साहा यांच्या इनस्टलेशनमध्ये त्यांनी सीमेवरच्या तारांच्या भेंडोळ्यापलिकडे जाऊन जगाकडे पाहाण्याचा आशावाद व्यक्त केला किंवा मुहबुबुर रहमान यांनी बांबूची रचना तयार करून त्यावर केलेल्या 'फाइंड युअर वे आऊट' या परफॉर्मन्समधून भिंतीची घनता व निष्क्रियता आणि मानवी शरीराची लवचिकता यांचा रूपकात्मक वापर केला.

नोबिना गुप्ताचा 'डिसअपिरिंग डायलॉग्ज' हाही अस्तंगत होत चाललेल्या वस्तू, समूह, सांस्कृतिक व्यवहार, निसर्ग, अौषधी वनस्पती, स्थानिक उपचारपद्धती, स्थानिक वास्तुरचनेच्या पद्धती यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्यांचं जतन करणं किंवा पूर्ववत करण्याच्या काही संधी आहेत हे बघणंही नोबिना यांना महत्वाचं वाटतं. हा संवाद लडाख, इचोल, कलकत्ता अशा विविध ठिकाणी आणि अनेक पातळ्यांवर आकाराला येतो आणि त्याला सामूहिकरित्या सामोरं जाण्याच्या शक्यता शोधतो. त्यातून नोबिना शाश्वत विकासाबद्दल संवाद या लोकसमूहांबरोबर उभा करतेय. हे हस्तक्षेपातून परफॉर्मन्सेस, पॉप-अप म्युजिअम, इनस्टलेशन्स आकाराला येतात. बहुतेक वेळा, हे हस्तक्षेप शहराच्या परिघाच्या बाहेर घडलेले दिसतात. त्यात शहरीकरणातून उद्भवलेल्या प्रश्नांना बगल देणं नसून ते समजून घेत त्या पलिकडे जाऊन आजूबाजूला चालू असलेल्या संक्रमणाकडे लक्ष वेधणं तर आहेच पण एक प्रकारची स्मृत्याकुलताही आहे की काय असं वाटून जातं. 

कलकत्ता शहर, महानगरी जाणिवा, त्यातून शहरातील अवकाशाला भिडणं, तिथला इतिहास-संस्कृतीची सांगड घालत कलाव्यवहार घडवणं हे काही प्रकल्पांच्या बाबतीत आता कुठे जरा दिसू लागलंय. पण त्यातही या स्मृत्याकुलतेचा जरासा अंश आहेच! अर्थात ते करताना दोन्ही प्रकल्पांमध्ये 'हेरिटेज' किंवा वारसा या संकल्पनेकडे समकालीन दृष्टीकोनातून बघता येईल का, त्याची परिमाणं काय असतील, पारंपारिक कला, हस्तकला आणि कला यांचा एक़मेकांशी संबंध काय नि कसा आहे अशा मुद्द्यांचाही यात विचार होताना दिसतो. शहरं बदलताना तिथल्या लहान-मोठ्या रचना, जुन्या वास्तू एवढंच बदलतंय असं नाही तर वर्षानुवर्षं चालत आलेले पारंपारिक उद्योग, हस्तकला, आरेखनं आणि छपाई, त्यांचं अर्थकारण, त्यांचा वापर हेही बदलत जातंय. हे सगळं हरवत चाललंय याची केवळ खंत नाही पण त्या संसाधनातून आताच्या बदलत्या संदर्भात याकडे कसं पाहाता येईल, त्याची पुनर्मांडणी करता येईल का, असा विचारही शुमोना चक्रबर्ती यांच्या चितपूर भागातल्या या प्रकल्पातून पुढे आलेला दिसतो. छपाईयंत्र, पुस्तकाची दुकानं, जात्रा म्हणजे छोट्या मोठ्या नाटकवाल्यांची कार्यालयं, मोठाले चौक असलेली घरं, फुटपाथच्या बाजूला असलेले 'अड्डे', अनेक प्रकारच्या हस्तकलांची दुकानं, लाकडी ठोकळ्यानी छपाई सारख्या लयाला चाललेली माध्यमं, या सगळ्यांनी समृद्ध असलेला हा शहराचा भाग त्यांनी निवडला. तोही अर्थात तिथल्या स्थानिक रहिवाशांबरोबरच्या संवादातूनच! तिथे कार्यशाळा घेऊन त्यातून तयार झालेल्या कलावस्तूंचं पॉप-अप किंवा 'नेबरहुड म्युजिअम' बनवलं. अशा उपक्रमातून शहरातली ती वस्ती, तो परिसर विकसित करण्याच्या कल्पना मांडल्या गेल्या, तिथल्या रहिवाशांनीच त्या मांडल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी काय काय करता येईल हे अनेक खेळ, परफॉर्मन्स, कार्यशाळा, फेस्टीवल यांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलं. या प्रक्रियेचं दस्तेवजीकरण आणि त्यातून तयार झालेल्या कलावस्तूंचं कलकत्ता आणि मुंबईच्या कलादालनात प्रदर्शनही केलं गेलं. तेव्हा गॅलरीच्या संदर्भात या कलावस्तूंभोवती काय चर्चाविश्व घडू शकतं, त्यातून आकृतीबंधाच्या काय नव्या शक्यता आकाराला येऊ शकतात का याच्या धांडोळा घेण्याचा प्रयत्नही झाला. यात गॅलरी या संकल्पनेचाही पुनर्विचार त्यांनी केला. स्टुडिओ २१ ही गॅलरी 'चितपूर लोकल' या प्रकल्पात चर्चा- टीका करण्याची, ते विचार पडताळून पाहाण्यासाठीची एक जागा बनली. पण त्याचबरोबर हे अर्काइव्ह स्वरुपात त्या परिसरातल्या शाळेतही मांडलं गेलंय.

या कम्युनिटी प्रोजेक्ट्स बरोबरच अलिकडच्या काळात कलकत्त्यामध्ये काही कला हस्तक्षेपही आकाराला आले. त्यात शायंतन मित्र यांच्या कलकत्त्याजवळच्या सरसुना या उपनगरातल्या 'डीराइव्स फ्रॉम द मेट्रोपोलिस' या  प्रकल्पात शहराच्या परिघावर उभ्या राहाणाऱ्या स्थलांतरितांच्या वस्त्या, त्यातले विविध जनसमूह, भाषा-संस्कृती, त्यांची उपजिविकेची साधनं, स्थलांतराचा इतिहास यांना भिडत पाकिस्तानी, भारतीय आणि बांग्लादेशी कलाकारांनी तिथे कलात्मक हस्तक्षेप केले. तर गेली काही वर्षं 'पी-आय' म्हणजे परफॉर्मर्स इन्डिपेंडन्टचे कलाकार दर रविवारी शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी जमतात आणि त्यांच्यातले एक-दोघ जण तिथे परफॉर्मन्स सादर करतात. मी कलकत्त्यात असताना साऊथ सिटी मॉल मधला परफॉर्मन्स अयनवा या कलाकाराने परफॉर्मन्स सादर केला. विटा आणि काही आकृती काढलेला एक फाटका टी-शर्ट घेऊन त्यावर विटांच्या वेगवेगळ्या रचना करत त्याने या मॉलच्या बाहेर त्याचं सादरीकरण केलं. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे पूर्ण परफॉर्मन्स पार पडू शकला नाही पण त्यानिमित्तानी ते सुरक्षा रक्षक, मॉलचे मॅनेजर, जमलेले लोक यांच्याबरोबर संवाद साधला गेला आणि तोही परफॉर्मन्सचा एक भागच बनला! 'परफॉर्मर्स इंडिपेंडन्ट' हा कलाकारांचा कलेक्टीव गेली सलग चार वर्षे 'कोलकता इंटरनॅशनल परफॉर्मन्स आर्ट फेस्टीवल' भरवतोय. त्यात साधारण विषय ठरलेला असला तरी उत्स्फुर्तपणे कलाकार जागा ठरवत, एकमेकांच्या सहयोगाने हे परफॉर्मन्सेस सादर करतात. कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सहजपणे रस्त्यावरच्या माणसांत मिसळून जात वेगवेगळ्या ठिकाणी हे परफॉर्मन्सेस पार पडलेत. त्यात कलकाराचं शरीर, त्याच्या मर्यादांच्या शक्यतेच्या पलिकडे जात सद्य परिस्थितीला भिडत हे कलाकार हे परफॉर्मन्स आखतात, सादर करतात. कलकत्त्यातले घाट, रस्ते, इमारतींच्या अवतीभवती सुरुवातीचे परफॉर्मन्स आकाराला येतात. त्याच मालिकेत येत्या जानेवारीतल्या फेस्टीवलचा विषय 'युक्तिवाद - असहिष्णुता - हस्तक्षेप' (Argumentation – Intolerance – Intervention) या त्रयीभोवती गुंफलेला आहे. हे परफॉर्मन्स आत्ताचा, या घडीचा विचार मांडतात, माध्यमं वापरतात आणि नवे फॉर्म घडवतात, पुढे आणतात आणि त्यामुळेच ते समकालीन ठरताहेत.

छायाचित्र सौजन्य: शुमोना चक्रवर्ती, परफॉर्मर्स इंडीपेंडंट आणि संचयन घोष
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, डिसेंबर २०१६