शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग एक)


संचयन घोष हे  कलाभवन, शांतिनिकेतन येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत. गेली अनेक वर्षे परफॉर्मन्स, जनकला आणि लोकसहभागातून कलानिर्मिती हा त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग राहिला आहे. माझ्या जनकलेवरच्या संशोधन प्रकल्पानिमित्ताने त्यांच्याशी झालेली ही बातचीत. 

कलकत्त्यामध्ये जन-कलेचे काही एेतिहासिक संदर्भ पाहायला मिळतात का? कुठून आणि कशी सुरूवात झाली?

शांतिनिकेतन हे शहरी व्यवस्थेपेक्षा वेगळी अशी व्यवस्था आहे. एक कम्युनिटी म्हणता येईल. तिथल्या प्रेरक शक्ती वेगळ्या आहेत. आदिवासी गावं, निसर्ग आणि एकूणच त्या संस्थेचं तत्वज्ञानही, त्या जागेची गती, वातावरण हे सारच निराळं आहे. कलकत्त्याच्या संदर्भात पाहायचं झालं तर ९० च्या आसपास काही कलाकार सार्वजनिक अवकाशात काम करू पाहात होते. पण आज आपण जन-कला म्हणतो त्या अर्थाने नव्हे. त्यातले काहीजण सार्वजनिक अवकाशात चित्रं काढत असत. पण ते त्यांचा स्टुडिओतला कलाव्यवहार सार्वजनिक अवकाशात आणण्यापुरतंच मर्यादित होतं. चित्रवाणू मुजुमदार होते. पण ते मुख्यतः विविध इमारती, वास्तुशिल्पाचे नमुने आणि त्यातला कला हस्तक्षेप या अंगाने त्याकडे पाहात होते. साधारण २०००च्या सुमारास, विवान सुंदरमचं व्हिक्टोरिया अॅंड अॅल्बर्ट म्युझिअमला झालेलं साईट-स्पेसिफीक इन्स्टलेशन हेही होतंच. पण नाटकाच्या संदर्भात ते जास्त पाहायला मिळतं. किंवा 'कले'च्या ठराविक व्याख्येच्या बाहेर जाऊन पाहिलं तर राजकीय चळवळी, निषेध, मोर्चे यातही पाहायला मिळतं. रस्त्यावरच्या ग्राफिटी, खासकरून कम्युनिस्ट चळवळीतून आलेल्या, समाजवादी विचारातून आलेल्या समांतर अशा प्रतिमा, मुद्रा किंवा कृती हे १९६० नंतर दिसतच राहातं ते अगदी अलिकडेपर्यंत. नाटकाच्या रूपातले हस्तक्षेपही फार मोलाचे ठरलेले दिसतात. उदाहरणार्थ, बादल सरकारांचं 'तिसरा रंगमंच'. त्यात दोन प्रकार असायचे. एकतर ते एखादी जागा, इमारत भाड्याने घ्यायचे. प्रेक्षकांनी आत जाऊन त्या जागेची अनुभूती घेणं अपेक्षित असायचं. ती खोली बाहेरून बंद असायची, आत बसायला जागा नसायची, बसायचं की उभं राहायचं आणि नेमकं काय करायचंय हे तुम्हाला माहिती नसायचं. अशातच तिथले कलाकार विविध रूपं घेऊन यायचे आणि तुमच्याबरोबर संवाद साधायचे, तुम्हाला त्यात सहभागी करून घ्यायचे. पण त्याचबरोबर, ते मोठ्या पातळीवर लोकांपर्यंत पोहोचू पाहात होते, खासकरून कामगारापर्यंत. शहीद मिनारच्या भागात ते जायचे. तिथे झाडाखाली दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी लोक बसलेले असायचे. हे कलाकार त्यांच्याशी गप्पा मारत मारत सुरू करायचे आणि मग काही सामाजिक प्रश्न धरून त्याभोवती त्यांचा परफॉर्मन्स गुंफायचे. अॉगस्तो बोआलच्या पद्धतीचं संवादात्मक नाटक आणि राजकीय चळवळ या दोन्हीच्या संयोगातून हा कलाप्रकार आकाराला आला होता. पण बादलदा ते खुल्या जागेत किंवा खरतर कुठल्याही जागेला रंगमंचाचं रूप देऊन तिथे हे प्रयोग पार पाडायचे. आणि मग याच धर्तीवर चालणारे इतर बरेच नाटकाचे गट काम करत होते. दर शनिवारी-रविवारी ते तिथे येऊन सादरीकरण करायचे. बादलदांनी कायमच पथनाट्य आणि 'तिसरा रंगमंच' यात फरक केलाय. पथनाट्य हे तुम्ही कुठेही करू शकता, शहरात, रस्त्यावर, एखाद्या कोपऱ्यावर. 'तिसरा रंगमंच' हा नव्या जागेत उभा केला जाई. प्रेक्षक, कलाकार आणि एख़ादी विशिष्ट स्थिती किंवा प्रसंग यातून ते आकाराला येत असे. तीन बाजूला प्रेक्षक असे पण चौथ्या बाजूला भिंत असली तरी तिथेही लोक असत. हे साधारण २०००च्या मध्यापर्यंत जोरात चालू होतं. दुसरी महत्त्वाची जागा म्हणजे नंदन. डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात हे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून उभारलं गेलं.खुल्या जागेतल्या किंवा रंगमंचावरच्या नाटकांसाठीचं हे एक ठिकाण बनलं. नाटकाचे अनेक ग्रुप्स ते वापरत आले आहेत. अलिकडे 'पाय'ने सुद्धा त्यांच्या परफॉर्मन्सेससाठी ही जागा वापरलीये. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या बागा किंवा मोकळ्या जागांमध्येही त्यांचे कलाकार परफॉर्मन्स करतात.










शांतिनिकेतनमधे असतानाच तिथल्या शिक्षणापलिकडे जाऊन तुम्ही सुरुवातीपासून प्रयोग केलेत, त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली?

मी शांतिनिकेतनमध्ये असताना प्रयोग करू पाहात होतो. बादल सरकारांचं नाटक पाहात होतो. त्या कृती, ती पद्धत भावणारी होती. हे साधारण १९९४-९५च्या आसपास. 'तिसरा रंगमंच' हा जो प्रकार आहे तो त्या अर्थी दृश्य परिभाषेचा फारसा वापर करत नाही. त्यात दृश्य स्वरूपाचे घटक बहुधा नसतातच. मुख्य करून कलाकार आपल्या शरीराचा वापर करून ती दृश्यात्मकता उभी करायचे. कपडे, नेपथ्य, प्रकाशयोजना अशा गोष्टींचा अगदी कमीतकमीच उपयोग केला जायचा. बादलदांच्या कार्यशाळांना जायला लागल्यावर संवाद, कृती शरीराच्या हालचाली याबरोबरच नाटकात वापरली जाणारी सामग्री, तिचा नाटकाच्या अवकाशाशी असलेलं नातं, त्या सामग्रीच्या वापरातून उभा राहणारा व्यवहार, त्या सामग्रीतून घडणारी प्रक्रिया, ते कसं बदलत जातं हे मला महत्वाचं वाटायला लागलं. त्या धर्तीवर मी काही प्रयोग शांतिनिकेतनमध्ये करायला लागलो. तौफिक तेव्हा विद्यार्थी होता. आम्ही 'नंदन मेला' मध्ये काही परफॉर्मन्सेस केले होते. मला रस कशात होता तर या सामग्रीतून उमटणारी काव्यात्मकता ही त्या प्रक्रियेच्या अनुभूतीचा भाग कसा बनेल. हाच विचार पुढे नेत मी काही साईट स्पेसिफीक इन्स्टलेशन केली. सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणं यात मला रस वाटत होता. त्याची प्रक्रिया नेमकी काय असेल असाही प्रश्न होता. मी तेव्हा जनकलांच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी जाणून घेत होतो. जेव्हा जेव्हा कलाकार असं काहीतरी करायचे तेव्हा तो एक भव्यदिव्य असा प्रसंग बनायचा, कलकाराच्या शौर्याचा लक्षवेधी असा देखावा बनायचा! अर्थात, त्यात वसाहतवादातून तयार झालेल्या सार्वजनिक अवकाशातल्या कलेच्या एकसंध संकल्पनांना धक्का देण्याचा प्रयत्न होता हे मी नाकारत नाही. पण शेवटी तो एक देखावा बनून राहायचा. प्रेक्षकांना त्यात कुठेच सहभागी केलं जात नसे. मला नेमका त्यातच रस होता! प्रेक्षक हा केवळ बघ्या न राहता ते त्या कला हस्तक्षेपाचा भाग कसा बनतील ते माझ्यासाठी महत्वाचं होतं.
अर्थात सुरूवातीच्या काळात मी फक्त मटेरीअल घेऊन प्रयोग करत होतो. संवादात्मक कलाव्यवहार अजून आकाराला आला नव्हता. पण एखादं मटेरीअल किंवा सामग्री वेगळ्या संदर्भात कशी मांडता येईल, त्याचे अर्थ आणि परिमाण कसं बदलत जातं ते मी तपासून पाहात होतो. अनोळखी ठिकाणी जाऊन काहीतरी हस्तक्षेप करून म्हणायचं की हा कला प्रकल्प आहे, आता समजून घ्या, हे काही मला पटत नव्हतं. मग मी इथेच घराजवळ सुरूवात केली. मी शिकत असताना सातेक वर्षं इथं नव्हतो मग परत आल्यावर वाटलं की आपण काय करतो ते या अाजूूबाजूच्या लोकांबरोबर का शेअर करू नये! त्यांना माहिती होतं मी नुकताच आर्ट कॉलेजमधून बाहेर पडलोय. मग मी त्यांना त्यांचाकडचा कचरा द्यायला सांगितला...हे माझ्या कामात वापरायचंय म्हणल्यावर ते जरा उडालेच! कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बॅटऱ्या असं बरंच काय काय गोळा झालं...त्या आधी मी शांतिनिकेतनमध्ये असताना 'मेमोरिअल' या संकल्पनेवर काम करत होतो. छत्तीसगडमध्ये काही आदिवासी भागात गेलेल्या माणसांची अशी स्मारकं उभारतात. ती व्यक्ती कशी होती, तिच्या आवडी निवडी लक्षात घेऊन तिथे वस्तू ठेवल्या जातात. त्या कल्पनेतून मी प्रेरणा घेतली. मग मला वाटलं की जिवंत व्यक्तींच्या आठवणी का असू नयेत? त्यातून 'मेम्वार्स अॉफ अन्नोन ड्वेलर्स' हा कला प्रकल्प आकाराला आला. त्याची सुरूवात एका भित्तीचित्रापासून झाली. त्याच्या जवळच एक रस्त्यावरच्या दिव्याचा खांब होता. त्याचबरोबर, काही वस्तू मी गोळा केल्या होत्या. तो खांब पूर्णपणे बदलून गेला हळूहळू त्याच्याभोवती अनेक वस्तू रचल्या. ही प्रक्रिया काही दिवस चालू होती. येता जाता लोकं ते पाहात होते. मग मला वाटलं की त्यांनाही यात सहभागी व्हायला बोलवावं. तिथं राहाणाऱ्या लोकांना मी बोलावून त्यांना त्यांच्याकडूनच गोळा केलेल्या 'मदर डेअरी'च्या पिशव्या दिल्या आणि त्या रस्त्याखालच्या गटाराच्या एका तोंडापासून दुसऱ्या तोंडापर्यंत असे मांडायला सांगितले. दोन दिशा दाखवणारे बाणाचे आकार त्यातून तयार झाले. मग एका रविवारी माझ्याबरोबर रंगरंगोटी करायला मी त्यांना बोलावलं. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं. ते तसंच काही काळ तिथे राहिलं मग नंतर काढून टाकलं. पण तो माझा पहिला कला हस्तक्षेप होता. लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनत हस्तक्षेप करत माझा कलाव्यवहार घडत गेला.

याशिवाय सुरुवातीच्या काळातल्या प्रकल्पांविषयी सांगू शकाल का? प्रक्रिया काय होती आणि काय पद्धती तुम्ही अंमलात आणत होतात?

त्यानंतर मी भवानीपूरजवळच्या गॅरेच्या जागेतही एक काम केलं. -५च घरं असलेली ती एक जुनी इमारत होती आणि शिवाय मध्ये मोकळी जागाही होती. ती जागा दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात असे. ही क्षणिकतेचा विचार मी माझ्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांशी बोललो, त्यांनी त्या जागेबद्दलच्या गोष्टी, आठवणी, त्यांचे अनुभव शेअर केले. गॅरेजमधलीच सामग्री मी वापरली. ती रि-सायकल केली. त्यातून एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषा उभ्या केल्या. त्यात बांधणी करणं हेच मोठं काम होतं. मोठाले पाइप वापरून ते उभं केलं होतं आणि ते एखाद्या पेहेरावासारखं होतं. कुणीही त्यात आत जाऊन फिरू शकत होतं. मधोमध एक भोक होतं त्यात तुम्ही उभं राहून चौफेर पाहू शकायचात. त्याच्यावर मी माशांच्या जाळ्या, छोटे पाइप आणि क्रॉसची चिन्हांपासून आकाश तयार केलं. क्रॉस म्हणजे तारकासमूह होते. तो काळच काव्यात्मक होता...शीर्षकं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. ते पूर्णपणे सार्वजनिक होतं असं म्हणता येणार नाही. माझे काही मित्र येऊन गेले किंवा आजूबाजूला राहाणारे लोक बघून जायचे. तिथे राहाणारे लोकांना त्या कामाशी जोडून घेता यायला हवं, ते त्यांच्या जगण्याच्या अवकाशाचा भाग बनावं असं मला वाटतं होतं.

तिसरं मी जे काम केलं ते ख्रिस्तोच्या कामातून प्रेरणा घेऊनच केलं होतं. पण त्याचं स्केल लहान करून मी ते व्यक्तिगत स्मृतीच्या पातळीवर मांडलं. 'रॅपिंग अॉफ द हाऊस'. एक जुनं घर पाडून तिथं इमारत उभी करणार होते. घर जरी पाडलं तरी विजेच्या जोडणीसाठी ते कनेक्शन नेहमी चालू ठेवतात. त्यामुळे त्या इमारतीचा शेवटचा का होईना थोडासा भाग शिल्लक राहातोच. ती त्या नष्ट झालेल्या घराच्या स्मृतीरूपात उरली. नव्या इमारतीचे रहवासी त्या स्मृतीला तसेच स्विकारणार होते. मग मी त्या विजेच्या खोक्याला भेटवस्तू गुंडाळायच्या कागदानी गुंडाळले. पण ते पारदर्शक होतं. त्यामुळे आतली रचना दिसू शकत होती. आणि नंतर त्या कामाच्या आेघात मला कळलं की ते घर कुणा कलाकाराचं होतं. त्यांचं निधन झालं असलं तरी कुटुंबियांशी माझा परिचय होता. त्यांनी मला ते काम करायची परवानगी दिली. त्यांचे जुने फोटोदेखील त्या इन्स्टलेशनमध्ये मी ठेवले होते, त्यांच्या वापरातले रंगाचे डबे पण होते. ते पाहून ते सगळेजण फारच भावूक झाले...शेजारी आणि घरातल्यांनी त्यांच्या त्या जागेबद्दलच्या, कलाकाराबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. कचरा गोळा करणारे त्यातल्या काही वस्तू घेऊन जायला लागल्यावर शेजाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि ते नेमकं काय प्रकरण आहे तेही सांगितलं. तिथले लोकच त्या कलाकृतीची देखभाल करायला लागले. सगळेच त्या कलाकृतीत सहभागी झाले असं नाही. पण त्यातून काहीतरी संवाद नक्की सुरू झाला. या त्यामानाने सरळसरळ सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कलाकृती होत्या. त्यानंतर एका शाळेत परफॉर्मन्स- इन्स्टलेशन केलं होतं. नाटकांचा फेस्टीवल चालू असताना बाहेर रंगांचे ढीग ठेवलेले होते. त्यात बसून काही जण कविता, लेख, असं वेगवेगळ्या लिखाणाचं वाचन करत होते. फेस्टीवल संपल्यावर ते त्यातून बाहेर आले आणि ते सगळे रंगांचे ढीग करड्या रंगांत परिवर्तित झाले. शहरी जगण्यातली दाहकता, भी़षणता, यांत्रिकपणा या बद्दल ते भाष्य करणारं होतं. कलाकारांनी त्यांचं शरीर, रंगांचा वापर यातून त्यात काव्यात्मकता आणली. . परफॉर्मन्सचा शेवटी ते सगळे त्या जागेत आडवे झाले आणि जमिनीवर शरीराची आखणी केली, मग त्या आकृत्यांमध्ये त्यांनी ती भांडी ठेवून त्यात तेल टाकून ते जाळलं. ते म्हणजे तुमचा आत्मा जळाल्याचं रूपक होतं. त्यांनी वाचलेले लेख आणि कविता या शहरीकरणामुळे झालेले बदल, स्थलांतर, मूळ गाव सोडून शहरात येण्याचा अनुभव यावर भाष्य करणारे होते. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं अवकाश कसं नष्ट करता येईल किंवा कमी करता येईल याचा मी सतत यातून विचार करत होतो. पण ते साध्य होत नव्हतं. म्हणजे मी काहीतरी बनवायचो आणि लोक येऊन बघून जायचे. त्यामुळेच मग मी वेगवेगळ्या कृतींचा समावेश करायला सुरूवात केली.

मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जानेवारी २०१७