शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग दोन)


यातून तुम्ही मग सार्वजनिक अवकाशाकडे कसं वळलात? काही प्रयोगांबद्दल सांगू शकाल काय?
माझे परफॉर्मन्स हे मी एक परफॉर्मर म्हणून सादर न करता एक प्रक्रिया म्हणून घडवत असतो. माझा रोख हा माझ्या कृती आणि हालचालीतून ते अवकाश कसं बदलेल, त्याचं जडणं-घडणं कसं बदलेलं यावर असतो. आणि कलाकारांची भूमिका ते त्यांच्या शरीर आणि अभिनयात कसं आणता येईल आणि त्यापुुढे संवादात कशी रूपांतरित करता येईल यावर भर देणारी असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ते घडत जातं. माझ्याबाजूने एका परीने तर होतंच पण त्यांच्याही बाजूने ते आकार घेतं. त्यानंतर मी एका सार्वजनिक स्मारकाच्या ठिकाणी कला-हस्तक्षेप केला. कॉलेज स्ट्रीट भागात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा आणि स्मारक आहे. त्या स्मारकालाही इतिहास आहे. नक्षलवादी चळवळीचा जोर असताना त्यांनी एका ठराविक पद्धतीच्या शिक्षणपद्धतीला विरोध दर्शविण्याकरिता त्या पुतळ्याचं डोकं उडवलं होतं. ते नंतर परत उभारलं गेलं. तुला माहितीच असेल विद्यासागरांनी हे समाज सुधारक होते आणि विधवा, महिलांचं शिक्षण अशा अनेक आघाड्यांवर खूप काम केलं होतं. शोनागाछी भागात काम करणारा एक गट आहे..दुर्गानारी संघ किंवा असं काहीतरी नाव आहे. मला नेमकं आता आठवत नाही. विद्यासागरांच्या जयंतीला ते त्या भागात फेरी काढतात आणि पुतळ्याला हार चढवतात. ही पण पार्श्वभूमी त्याला होती.

माझा प्रकल्प हा मुख्यत: पुतळ्याकडे एक प्रतिमा किंवा आयकॉन म्हणून पाहात होता, त्याचबरोबर पुतळ्याचं अचलत्व, त्याचे आजच्या संदर्भातले अर्थ, विद्यासागरांनी हाताळलेले मुद्दे, त्यांचं वर्तमानातलं महत्त्व आणि स्थिती असे अनेक मुद्दे त्यातून उलगडत गेले. नाट्यक्षेत्रातला माझा मित्र प्रणव मुखर्जी याच्या बरोबर मी तिथे काम केलं. तो त्यांचं मृत्युपत्र घेऊन आला. विद्यासागर तसे श्रीमंत होते. ब्रिटीशकाळात ते शाळेत शिकवायचे. अनेक लेखक-कवींना त्यांनी त्या काळात मदत केली होती. तर त्यांचं ते मृत्युपत्र हे अर्थातच त्यांच्या संपत्तीबद्दल होतं. मग आम्ही विचार केला की त्यांच्या स्मारकापाशीच त्याचं जाहीर वाचन करूया. त्यांचं सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्य ही समांतर रेषांवर चाललेली होती. म्हणजे एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून विचार केला तर त्यांनी खूप लोकांना आर्थिक साहाय्य केलं होतं पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांनी त्यांच्या संपत्तीचं नेमकं काय केलं, ते त्यातून कळणार होतं. त्याचबरोबर, आजच्या काळात त्यांच्या कार्याचं काय महत्त्व आहे, हेही. प्लायवूडमध्ये त्यांची आकृती कोरून ती पुतळ्यासमोर ठेवली. सर्वात मोठी पुतळ्याच्या आकाराची होती. त्याचं प्रमाण लहान करत करत एकदम छोटी आकृती सर्वात पुढे होती. त्यामागे पुतळा लपला होता. पुनर्विवाह किंवा स्त्रियांच्या प्रश्नावर नियतकालिकांमध्ये आलेले लेख कापून ते त्यावर गुंडाळले. त्यांनी बंगाली मुळाक्षरं पहिल्यांदा आणली त्यामुळे मग आम्ही ती पण प्लास्टिकमध्ये कापून ठेवली होती. त्या सगळ्या गोष्टी कागदांत गुंडाळल्या आणि मागेच असलेल्या सार्वजनिक तळ्यात त्यांचं विसर्जन केलं.

नंतर सार्वजनिक अवकाशातलं म्हणजे २००६ मध्ये बिर्ला अॅकॅडमीच्या बागेत एक परफॉर्मन्स- इन्स्टलेशन केलं होतं. जमीन आणि त्यात होत चाललेले बदल यावर मी एक परफॉर्मन्स केला. सार्वजनिक बागेतलं ते एक परफॉर्मन्स-इन्स्टलेशन होतं. त्याच सुमारास कलकत्त्यात खोजची सुरूवात झाली. त्यात आम्ही एका आर्किटेक्टबरोबर बाडीपूरमधल्या एका सरंजामी पद्धतीच्या घरात एक कला-हस्तक्षेप पार पाडला होता. कलकत्त्याच्या उच्चभ्रू लोकांसाठीचं ते विश्रांतीसाठी जायचं स्थळं होतं. आणि अलिकडच्या काळात मी कलकत्त्यात माझं काम प्रदर्शित केलंय पण शहरात प्रत्यक्ष कला हस्तक्षेप फारसे केले नाहीयेत.

लॉस्ट इन आयकॉन फ्रोझन इन मिथ, कलकत्ता, २००२

लॉस्ट इन आयकॉन फ्रोझन इन मिथ, कलकत्ता, २००२


कलकत्त्याबाहेर तुम्ही बरेच हस्तक्षेप आणि सामुहिक कला प्रयोग केले आहेत, ते शहराच्या अवकाशाबाहेरचे असले तरी त्याबद्दल काय सांगू शकाल? फक्त कलाकार म्हणून नव्हे तर कला शिक्षक म्हणूनही तुम्ही याला भिडत आला आहात...

एक तर शांतिनिकेतनमध्ये शिक्षक म्हणून काम करतानाचा अनुभव आहे, केलेले प्रयोग आहेत. 'प्रक्रिये' बद्दलची समज वाढवी, त्याचं कला निर्मितीमधलं महत्त्व ध्यानात यावं ही एक बाजू त्याला होती. त्याचबरोबर संवादात्मक कलाकृती आणि निर्मिती प्रक्रिया यांची सांगड घालणंही त्यात होतं. त्या धर्तीवर मग मी विद्यार्थ्यांबरोबर काम सुरू केलं. एक तर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर 'शॅडो कास्टींग' पद्धतीचं काम केलं. त्यांच्या आठवणी, त्यांचे दृष्टीकोन हे सगळं त्यात येत गेलं. पण या प्रक्रियेत त्यांचं शरीरावर मागून प्रकाश पडायचा आणि पडद्यावर त्यांची सावली पडायची. फोटोसिंथेटीक मटेरिअल वापरलं होतं, आपण सिल्क स्क्रीनला वापरतो तसं. पण प्रकाशाची योजना अशा पद्धतीने केली होती की एक्स्पोजरला १५-२० मिनिटं लागायची आणि त्या मधल्या वेळात आमचा संवाद चालू राहायचा. त्यामुळे त्याला अॅनिमेशन सारखा परिणाम साधला जायचा. ते जवळपास मी सलग दहा वर्षं करत होतो. ते नंदनमेलात आम्ही प्रदर्शितही करत असू. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना मी शांतिनिकेतनमधल्या बाहेर उभ्या असलेल्या स्मारकांपैकी एक-एक निवडायला सांगत असे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जागा निवडल्या. मुलींचं वसतीगृह, टुरिस्टसाठीचं प्रसाधनगृह, ग्रंथालय, बैज यांची शिल्पं. त्याचा इतिहास, त्याचं माध्यम, आशय या सगळ्याची माहिती त्यांनी करून घ्यायची आणि जाहिरातीसारखा तेच शिल्प वापरून फ्लेक्स बनवायचा, असं मी त्यांना सांगितलं. तो फ्लेक्स त्या शिल्पाशेजारीच लावायचा त्यामुळे त्याचा आकार काय असेल, नेमकी जागा कोणती असेल, त्यामागचं राजकारण काय, त्यामुळे फ्लेक्स बनवताना कोणत्या बाबींचा नेमका विचार त्यांत मांडावा लागेल या सगळ्याचा विचार त्या विद्यार्थ्यांना करावा लागे. २००५ नंतर आम्ही 'फूल्स क्लब' सुरू केला. त्याचं नावं होतं 'गॉबेट्स'. ते मुलांनीच निवडलं होतं. 'गॉबेट्स' हे 'गंभीर मूर्ख' असतात म्हणजे त्यांच्या कृती निरर्थक असल्या तरी त्यामागची प्रेरणा ही महत्त्वपूर्ण असते. त्यात वेगवेगळे उपक्रम घेतले. नाट्यघर मध्ये सादरीकरण ठेवलं होतं. यात मुलांनी 'शांतिनिकेतन आयडल' यावर १-१ मिनिटाचे सोलो परफॉर्मन्स करायचे होते. त्यांचं सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दोन्ही समोर पडद्यावर उमटताना दिसत असायच्या. शांतिनिकेतनमध्ये सगळ्यात पवित्र मानलं गेलेलं 'छातिम'चं रोपटं बक्षिस म्हणून ठेवलं होतं. जो तिसरा येईल त्याला खरंखुरं छातिम मिळायचं आणि पहिल्या-दुसऱ्याला मात्र सोनेरी-चंदेरी छातिम दिलं जायचं! दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही केला त्यात शांतिनिकेतनमधला वृक्षारोपणाचा इतिहास टिपण्याचा प्रयत्न केला. रविंद्रनाथांपासून त्याला एक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. तर आम्ही तिथल्या अर्काइवमधून झाडं लावण्याचा गेल्या ८० वर्षांचा इतिहासाचा आलेख बनवला. मुलांनी कधी कुठे झाडं लावली गेली त्या जागा शोधून काढल्या. ती झाडं आज कोणत्या अवस्थेत आहेत, त्यातली किती उरली आहेत, त्या जागी भिंती, इमारती किंवा इतर काही उभं राहिलं आहे का याची झाडाझडती या विद्यार्थ्यांच्या गटानी घेतली. वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा विविध शाखांच्या लोकांनी या सहभाग घेतला.

मी स्वतः इथल्या आदिवासींबरोबरही काम केलंय. पण त्याला बराच काळ जावा लागला. सुरूवातीला ते केवळ एका बाजूने होतं. म्हणजे विद्यार्थीदशेत असताना आम्ही रेखाचित्र करायला संथाळ वस्तीवर जायचो तेवढंच. तिथं जाऊन काम करणं अवघडच होतं कारण मी 'बाहेरचा' आहे ही भावना सतत असायची. मी त्यांना जाऊन काय शिकवणार? त्यांची घरं, त्यांचं जगणं याची चित्रं काढण्यापलिकडे जाणं गरजेचं होतं. मग मी त्यांच्याशी शांतिनिकेतनमधला एक कला शिक्षक या नात्यानी संपर्क साधला. त्यांच्या इथल्या सुकलेल्या पानांचे रिसायकलिंग कसं करता येईल यावर एक प्रकल्प सुरू केला. त्याला 'खोज'कडूनही काही मदत मिळाली. दोन गावात दोन स्टुडिओ उभारले आणि त्यात नैसर्गिक तंतूंपासून कागद बनवायची प्रक्रिया सुरू केली. त्यापासून त्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. त्या वस्तू प्रदर्शनात, संथाळ फेस्टिवलमध्येही मांडल्या. त्यांनी तो व्यवसाय म्हणून सुरू करावा यासाठी मी त्यांच्या मागे लागलो नाही. ते या अनुभवाचं आणि कौशल्याचं काय करतात ते जास्त महत्त्वाचं होतं. मग माझ्या लक्षात आलं की व्यवसाय करणं हा विचारच मुळात तिथे रूजलेला नाहीये. त्यामुळे मी त्यावर भर देण्यात काही अर्थ नव्हता. त्यांना जर वाटलं तसं काही सुरू करावं तर ट्रेनिंगसाठी वेळोवेळी मी नक्की जाईनच. ती प्रक्रिया पुढे तशीच चालू राहिली नाही पण ते सहा महिने त्यांच्या बरोबरचा संवाद, वेगळ्या मटेरिअल मधलं काम हे सगळंच अर्थपूर्ण होतं.

लूम हाऊस, कोक्राझार, २००४

लूम हाऊस, कोक्राझार, २००४


कलकत्ता आणि शांतिनिकेतनच्या अवकाशापलिकडे जाऊनही तुम्ही काम केलंय. गेल्या काही वर्षात विविध सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भात हे काम आकाराला आलेलं दिसतं...

आसाममध्ये मी काही काम केलं. गुवाहटीला 'पेरिफरी' बरोबर. त्यांच्या ब्रह्मपुत्रेच्या काठावर उभ्या असलेल्या बोटीवर सलग सात दिवस चहापानाबरोबर गप्पांच्या मैफिली असा तो कार्यक्रम होता. त्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या अवकाशात गुवाहटी शहर, त्याभोवतीच्या आठवणींना उजाळा देणं, तिथली अनेक कथनं, मिथकं, सामूहिक स्मृती या धर्तीवर तो संवाद घडत गेला. मित्रांच्या आेळखीतून लोक येत गेले, सहभागी होत गेले. त्याला मी 'अॅंकर हाऊस' असं नाव दिलं होतं. ते मुख्यत: संवादात्मक हस्तक्षेपाच्या पातळीवर आकाराला आलेलं काम होतं. नंतर बोडोलॅंडमधल्या कोक्राझारच्या कॉलेजमध्ये एक प्रकल्प केला होता. त्यात मग आजूबाजूच्या हातमाग कारागीरांबरोबर संवाद सुरू झाला. शासन आणि बंडखोर यांच्यातल्या तहानंतर आम्ही भेट देत होतो. त्यात सरकारतर्फे अशा कलाकौशल्याला पाठिंबा देण्याचाही एक भाग होता. ते उभं करण्याच्या किंवा बनविण्याच्या प्रक्रियेत आठवणींना उजाळा देणं, हातमागावर कापड विणणं आणि त्या कारागीरांचं जगणं या दोन्ही बद्दलच्या गोष्टी गोळा करणं अशी ती प्रक्रिया राहिली आहे. आम्ही काही जुने, मोडकळीला आलेले हातमाग मिळवले. लष्कराच्या एका जुन्या पण आता वापरात नसलेल्या तंबूत आम्ही त्याची मांडणी केली. आता वापरात नसला तरी बंडखोरांपैकी काही जण अजून शरण आले नव्हते त्यामुळे कधीही पुन्हा संघर्षाला सुरूवात होईल याचा नेम नव्हता. त्यामुळे तंबूच्या आत हे उभं करणं आम्हाला अधिक सुरक्षित वाटलं. गावातल्या बायकांनी त्यावर कापडही विणलं. बोडोंच्या कापडाच्या डिजाईनमध्ये बरीचं प्रतीकं वापरली जातात. ती प्रतीकं वापरून त्यांनी ते कापड विणलं. या प्रक्रियेत मग खूप लोक येत गेले, चर्चा होत राहिल्या...हे साधारण २००५-६ मध्ये झालं असेल. त्याकाळात जनकलेला फारसं आर्थिक पाठबळही नव्हतं. 'फिका'ची सुरूवात २००८ मध्ये झाली असेल. त्या आधी भारतात असं काहीच नव्हतं. मी त्याकाळात जनकला प्रकल्प करतच होतो. एक़ प्रकल्प मी केला होता तो म्हणजे सुलभ शौचालयांचा. त्यात कल्पना अशी होती की राष्ट्र या संकल्पनेच्या संदर्भात लोकांचा आनंद मोजायचा. गोपाळ भांडची कथा वापरून मी काम सुरू केलं. मी चित्रं आणि कथा असलेलं पुस्तक तयार केलं. त्यात गोपाळ भांडची कथा मांडली. उडिया आणि हिंदी म्हणजे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही भाषात ती कथा मांडली होती आणि भुवनेश्वर शहरातल्या विविध जागा त्यात चित्रित केल्या होत्या. शहरातल्या सार्वजनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर जुन्या शिल्पातून मिळालेल्या राजाच्या वेगवेगळ्या प्रतिमा साकारल्या आणि त्या सुलभ शौचालयात स्टोरी-बोर्डाच्या रूपात मांडून ठेवले. तिथे येणाऱ्या लोकांसाठी एक पॅनेल ठेवलं होतं. त्यावर लोक त्यांची आनंदी असण्याविषयीची कल्पना काय आहे, ते लिहू शकत होते. पण ती त्या अर्थी सार्वजनिक जागा होती. त्याहून अधिक खासगी जागा म्हणून मग त्यातली काही पॅनेल्स मी स्वच्छतागृहाच्या आतही ठेवली होती. बाहेरच्या जागेतलं लिखाण हे अगदी नैतिकता पाळणारं होतं पण आतलं लिखाण हे अशिष्ट बोलीभाषेत केलेलं होतं. गंमत म्हणजे स्त्रियांच्या स्वच्छतागृहातून फारसं लिखाण मिळालं नाही! मग ते सगळं लिखाण आणि त्याचे विडिओ असं आम्ही ललित कला अकादमीमध्ये मांडलं. 'राजारेर कष्ट दूर' असं त्याचं नाव होतं, 'कष्ट' म्हणजे पोटाचे त्रास या अर्थी!

(क्रमशः)
मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष