'हाकारा' कशासाठी? / Why 'Hakara'?

मे २०१७ मध्ये पहिली आवृत्ती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो तेव्हापासून 'हाकारा' का? हा प्रश्न अनेक वेळा आम्हाला विचारला गेला. 'हाकारा'ची कल्पना प्रत्यक्ष आकार घेऊ लागल्यापासून ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. कला, साहित्य आणि सामाजिक-सांस्कृतिक भान या सगळ्याला एकत्र बांधणारं, त्यावर चर्चा घडवून आणणारं एक अवकाश असावं, या विचारातून 'हाकारा'ला सुरूवात झाली. यावर विचार करताना, त्याला शब्दरूप देताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज असं अवकाश मर्यादित रूपात  आपल्याला दिसतं.  त्याची व्याप्ती आणि खोली वाढवायची असेल तर त्यावर नव्याने लिखाण, चर्चा आणि चिकित्सा व्हायला हवी. त्याच्या  कक्षा रुंदावायच्या असतील तर माध्यम पण ते अवकाश सामावणारे हवे आणि सहजपणे वाचक अभ्यासकांपर्यंत पोचवण्यासाठी उपलब्ध असणारं  हवं. त्यामुळेच  नवमाध्यम त्याच्या लवचिकतेमुळे माध्यमाचे आणि आरेखनाचे प्रयोग करायला उपयोगी ठरलंय. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा द्वैभाषिकतेचा. मराठी आणि इंग्रजी भाषेत घडणारी मांडणी, विचारमंथन आणि देवाणघेवाण यातून समृद्ध चर्चाविश्व कसं आकाराला येईल, त्याकरिता कोणती नवी माध्यमे आणि घाट वापरता येतील यावर सातत्याने संवाद घडत राहावा, यासाठी हा 'हाकारा'चा पार.


Snehal Goyal, Before I lose them forever (Edition 01: Memory II)







 
K.G. Subramanyan, Santhal Letters, Asia Art Archive collection (Edition 01: Memory II)


'हाकारा'चं रसायन हे जर्नल किंवा नियतकालिक आणि  दृश्यात्मकता व त्यातली सौंदर्यदृष्टी यांच्या मिश्रणातून तयार होत आहे. प्रत्येक आवृत्ती ही नव्या विषयाला धरून त्या भोवती रचलेल्या कथा, कविता, चित्रं, मुलाखती, लेख यासारख्या निरनिराळ्या रचनाप्रकारातून आकार घेते. 'आठवण' मध्ये हिंसेच्या अनुभवाच्या कैफियतीपासून साध्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांना उजाळा मिळतो. 'आतलं, बाहेरचं, अधलं-मधलं' मध्ये गुंतागुंतीच्या आणि असंख्य पदर असलेल्या जगण्याच्या, कलाव्यवहाराच्या, सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक पैलूंवर मांडणी केली आहे. ही मांडणी करणारे कवी, चित्रकार, छायाचित्रकारांपासून इतिहासकार, कथाकार, नाटककार आणि शास्त्रज्ञ आहेत. एकाच विषयाच्या अनेक बाजू, अनेकविध दृष्टीकोन त्या विषयाबद्दलच कुतूहल जागवतात, जागं ठेवतात. त्याचे निरनिराळे पैलू आपल्यासमोर आणतात. यातून 'हाकारा'तील मांडणी ही ठरावीक पद्धतीच्या अभिव्यक्तीच्या किंवा कलाविष्काराच्या रूपांना धडका देत त्यांचा परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानिमित्ताने आम्ही मांडलेली 'हाकारा'ची भूमिका:

हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;

a call, a general or a great and continued calling


हाकारा’ या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपण आणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे. जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणि कोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्या आणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्य माध्यमातून ‘हाकारा’च्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे. काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असते तर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रितीने गुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धुसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणि तिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशा अभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणि चिकित्सक प्रक्रिया ‘हाकारा’चा गाभा असेल.

‘हाकारा’च्या पारावरून बोलावण्यामागं लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चा घडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचं विश्लेषण इथं केलं जाईल. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्वाचं ठरतं तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड मोलाची ठरेल.

‘हाकारा’चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती, दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

हाकारा'ची येती आवृत्ती आता/Now  या विषयाभोवती गुंफलेली आहे. आपल्या कलाकृती/लिखाण पाठविण्यासाठी पाहा: http://www.hakara.in/appeal-call-3/

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā


Current edition


Our contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. With hākārā, our aim is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, we’ll focus on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.
In keeping with this focus, hākārā will be published online in freely accessible and interactive format by focusing on the area that may help us address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures.

The hākārā editors would be interested in the sharing of research, speculations, literary and visual work presented innovative ways that responds to current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society. We particularly encourage innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.

To submit your work for our forthcoming edition on आता/Now , please see our Next Call here: http://www.hakara.in/appeal-call-3/

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā.