अमृता शेरगिल आणि स्त्रीदेह




आपल्या शरीरावर आपला जैव अधिकार असतो आणि ते शरीरच आपलं अस्तित्व ठरवत असतं. शरीर आपली 'ओळख' ठरविण्यात मोलाची भूमिका बजावतं. शरीराकडे बहुतेक वेळा 'हिंसा, अपवर्जन आणि अत्याचाराचं स्थान' म्हणून पाहिलं जात असलं तरी पण शरीराचा उत्सव करणं, ते साजरं करणं ही बाजूही आपण लक्षात घ्यायला हवी. शरीराकडे कशाप्रकारे बघितलं जातं यावरून लिंगभाव / लिंगभेद कार्यरत होतात का? कलेतले संकेत हे सामाजिक मूल्यांवरूनच ठरत जातात. भारतात आणि पाश्चिमात्य जगतातल्या स्त्रियांच्या चित्रणात हे स्पष्टपणे दिसून येतं. पुरूषांना स्त्रियांमध्ये वांछनीय वाटणाऱ्या गुणविशेषांवरून हे चित्रण साकारत गेलं. तुमचे विचार, आकांक्षा, कृती हे यात फारसे विचारात घेतले जात नाहीत. तुम्ही स्वतःला सुशोभित करून प्रेक्षकांकडे नजर फेकता तेव्हा त्यातून तुमच्या भौतिक अस्तित्वाचा शारीर रूपात बोध करून दिला जात असतो. तुमचे कपडे, तुमचे दागिने, तुमचं दिसणं यातून तुमचं स्व-जाणिवेतून घडणारं अस्तित्व ठरत जातं. कला समीक्षक जॉन बर्जर परखडपणे मांडतात: “अगदी सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की पुरूष कृती करतात आणि स्त्रिया केवळ दर्शन देतात. स्त्रिया स्वतःकडे कायम दुसऱ्यांच्या नजरेतून पाहातात. त्यामुळे, एखाद्या ठराविक दृष्टीतून पाहिली जाणारी वस्तू या अर्थाने त्या स्वतःकडे पाहू लागतात.”

२० व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात मात्र हा दृष्टीकोन बऱ्यापैकी बदलला आहे. जगभरात स्त्रीवादी लेखक, कलाकार, दिग्दर्शक यांनी इतिहासाचे पुनर्लेखन केले. अस्मितांचा पुनर्विचार करताना संघर्षाचं स्थान बनलेल्या शरीराकडे ही मांडणी करत नव्या दृष्टीकोनातून पाहाण्याचा खटाटोप केला गेला. भारतातल्या स्त्री कलाकारांचा मात्र शरीर साजरं करण्याकडे कल आहे. हे करताना त्यांचा हेतू मात्र जे जे खाजगी किंवा व्यक्तिगत ते ते राजकीय आहे हे ठासून सांगण्यावर होता. हे करताना त्यांनी नेहमीचे सामाजिक संकेत आणि प्रतिरूपणाच्या पद्धती उलथून टाकल्या.

भारतात हा बदल अमृता शेरगिल यांच्यामुळे सुरू झाला. त्यांच्या अतिशय अल्पावधीच्या आयुष्यात त्यांनी भारतीय स्त्री कडे 'पाहाण्या'चे नवे मार्ग शोधले/विकसित केले. त्यांचं १९४० साली बनवलेलं 'खाटेवर आराम करणाऱ्या बायका' किंवा 'वुमन रेस्टींग अॉन अ चारपाई' हे चित्र राष्ट्रीय आधुनिक कलादालनात आज टांगलेलं दिसतं. त्यानंतर पन्नास वर्षांनी केलेल्या चित्रांवरही या चित्राचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. शेकडो वर्षं चित्रकारांना भारावून टाकणारा हा विषय शेरगिल यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी हाताळला. पण हे करताना त्या वेगळाच अर्थ त्यातून सांगू पाहातात आणि त्यातून त्यांचा स्त्रियांच्या दृष्टीकोनातून याकडे पाहाण्याचा निग्रह दिसून येतो.

आणि हे असून देखील अमृता शेरगिल या परिपूर्ण स्त्री होत्या हे कोण नाकारू शकतं? त्यांचा आधुनिक दृष्टीकोन, स्पष्टवक्तेपणा, संवेदनशीलता, कलेतील आत्मनिष्ठता आणि उत्फुल्ल व्यक्तिमत्वामुळे त्या कायमच त्यांच्या समकालीन कलाकारांचं लक्ष वेधून घेत. माल्कम मगरिज म्हणतात त्याप्रमाणे, “सजीवसृष्टी, प्राणी, रंग आणि विश्वाच्या एेंद्रिय अनुभवातून मिळणारा आत्यंतिक आनंद घेणारी अशी ही स्त्री होती. यामुळेच तिच्या चित्रांत विलक्षण चेतना आणि जिवंतपणा जाणवतो.” तिच्या या भुरळ पाडणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे तिचा कलाव्यवहार हा कायम आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे.

Woman Resting on Charpoy by Amrita Sher Gil


Olympia by Manet


शेरगिल यांच्या जगण्यातला विरोधाभास हा त्यांचा आकर्षण बिंदू होता. त्यांच्या व्यक्तिमत्वातला ओथंबून वाहणारा मोहकपणा आणि त्यांच्या कामासक्त व्यक्तित्वाची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यांच्या निरनिराळ्या प्रसंगीच्या स्व- व्यक्तिचित्रणातून (सेल्फ पोर्ट्रेटमधून) ते प्रतीत होते. पॅरिसमध्ये (१९३०-३४ दरम्यान) काढलेल्या व्यक्तिचित्रात ती निरनिराळ्या रूपात आपल्यासमोर येते - कधी ती आपल्याला मोहवून सोडते तर कधी तिच्या काळ्याभोर केशसंभार व लालचुटुक ओठांमुळे एखाद्या जिप्सीप्रमाणे भासते, तर कधी मनसोक्त खिदळताना तिच्याकडे बघणाऱ्यांकडे ती कानाडोळा करते. पण तरीही एक कलाकार म्हणून ती तिच्या चित्रातल्या स्त्री प्रतिमांकडे वेगळ्या नजरेने पाहाते. या नग्न स्त्री प्रतिमा स्त्रियांची संवेदनशीलता दर्शवितात. 'वुमन इन ग्रीन' मधली स्त्री निष्क्रियपणे खुर्चीत बसली आहे तर 'ऱिक्लाईनिंग न्युड' मध्ये निर्वस्त्र स्त्री मोतिया रंगाच्या रेशमी कापडावर पहुडलेली आहे. तिच्या बाजूलाच गुलाबी दुपट्टा पांघरलेला दिसतो. यातून एकीकडे मानवी शरीराचा, कातडीचा स्पर्शगोचरपणा जाणवतो पण त्याचबरोबर स्टील लाईफमध्ये चित्रण केल्याप्रमाणे हे शरीर अचल असल्यासारखे वाटते. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, मृत्यूमध्ये जीवन गोठले गेल्यासारखे भासते.

चित्रकलेच्या संदर्भात असं म्हणता येऊ शकतं की स्त्रीकडे एखादी 'पाहाण्याची वस्तू' म्हणून बघितलं गेलं.. अशा पहुडलेल्या स्त्रियांची चित्रे इतक्या मोठ्या प्रमाणात केली गेली की त्यांच्याकडे चित्रकलेतला एक प्रकार म्हणून पाहिलं जाऊ शकतं. उफिझी गॅलरीमधलं तिशिअनचं गाजलेलं चित्र 'व्हीनस अॉफ उर्बिनो' असेल किंवा रेम्ब्रॉंने त्याची पत्नी सास्कियाचं काढलेलं रेखाटन असेल किंवा प्रादोमधलं अपकीर्ति झालेलं गोयाचं 'नेकेड माजा' असेल किंवा १९व्या शतकात खळबळ माजवणारी आणि बेधडकपणे प्रेक्षकांकडे रोखून पाहाणारी मानेची 'ऑलिम्पिया' असेल...युरोपातील प्रत्येक महान कलाकाराला या विषयाने भुलवून टाकले होते. मिथकातले विषय निवडणं आणि मानवाकृती रेखाटणं ही खरंतर केवळ एक सबब होती. त्यांचा मूळ उद्देश त्यातून मॉडेल्सच्या कामुक देहांचं चित्रण करणे हा होता. फिकट रंगाच्या रेशमी वस्त्र अंथरलेल्या कोचावर या स्त्रिया निर्वस्त्र अवस्थेत पहुडलेल्या दिसतात. आपली चमकदार उष्ण कांती आणि प्रेक्षकांकडे भिडणारी थेट नजर यातून त्या आपल्या कामुकतेचा दाखला देतात.


Self Portrait


भारतीय चित्रकलेतील राजपूत लघुचित्रांमध्ये हा विषय तेवढाच लोकप्रिय होता: प्रियकराची वाट पाहात पलंगावर पहुडलेली किंवा प्रियकराला आलिंगन देणारी 'नायिका' या रूपात हे चित्रण केलं गेलं. १९ व्या शतकापासून मात्र त्यात अचानक बदल घडून आला. 'गीतगोविंद' किंवा 'रसमंजिरी' या कथनामधून 'नायिके'चं महत्त्व कमी होत जातं. पण स्त्री प्रतिमा वेगळ्या रूपात येतात व त्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं. एखादी वारांगना पहुडलेली दिसते किंवा मांजरीशी खेळताना दिसते, किंवा पिवळ्या लोड-तक्क्यांना टेकलेली एखाद्या स्त्रीची नग्नाकृती दिसते. पण हे करताना या प्रतिमा प्रेक्षकांच्या उपभोगासाठी खास पद्धतीने तयार केलेल्या पक्वान्नासारख्या भासता.

भारतात आणि पाश्चिमात्य जगतातल्या या प्रकारचं पूर्वीपासून चित्रण होत आलं आहे याची शेरगिल यांना पुरेपूर जाणीव होती. १९३५ नंतर त्यांच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू झालं आणि त्याचबरोबर, त्यांच्या चित्रकलेतही नवी भाषा आणि उर्मी उमटताना दिसू लागल्या. याच काळात त्यांच्या चित्रात या जुन्या चित्रांचे संदर्भ झिरपू लागले. १९ व्या शतकात मानेच्या 'ऑलिम्पिया' या चित्रातील नग्न स्त्रीच्या बिनधास्तपणामुळे युरोपात गहजब झाला होता. पॅरिसमध्ये शिकत असताना हे चित्र शेरगिल यांच्या दृष्टीस नक्कीच पडले होते व त्यांच्या विचारविश्वाचा भाग बनले होते. तसंच, दक्षिण भारतात प्रवास करताना, खास करून तिरूवनंतपुरमच्या भेटीनंतर, त्यांनी राजा रवी वर्मा यांची चित्रं पाहिली आणि त्यावर चिकित्सक भाष्य करणारं लिखाण देखील केलं. त्यामुळे जेव्हा त्यांनी 'वुमन रेस्टींग अॉन अ चारपाई' हे चित्र रंगवलं तेव्हा त्यात या दोन चित्रांचा संदर्भ आणायचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला असावा. आधी उल्लेख केलेल्या चित्रांपनुसार त्या या चित्रात हुबेहुब रचना करतात. मी वर सूचित केलेल्या विधानाला यामुळे निश्चितच बळकटी मिळते. या चित्रात एक तरूण स्त्री खाटेवर लवंडून आराम करते आहे तर शेजारी बसून एक वयस्क, काळसर वर्णाची स्त्री तिला पंख्याने वारा घालते आहे. मानेने यात रंगभेदाचा वापर त्याच्या चित्रात केलेला दिसतो. 'ऑलिम्पिया' मध्ये चित्राच्या मागच्या भागात एक कृष्णवर्णीय स्त्री हातात फळांची करंडी घेऊन उभी आहे. यामुळे पुढच्या बाजूला असलेल्या गोऱ्या तरूण स्त्रीची प्रतिमा अधिक वरचढ ठरते. रवी वर्माच्या चित्रातही या प्रकारच्या रचना-विचाराचे जोरकसपणे अनुकरण केलेले दिसून येते. मात्र हे करताना त्यांनी भारतीय 'परंपरा' आणि तैलरंगाचे पाश्चिमात्य 'तंत्र' यांचा उत्कृष्ट मिलाफ साधला.

वर उल्लेखलेल्या या सर्व चित्रातल्या विषय आणि रचनेमधलं साधर्म्य मात्र तिथेच संपुष्टात येतं. शेरगिल यांनी केलेलं चित्रण आणि चित्राचे संस्करण हे त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा मूलतः वेगळं होतं. माने आणि रवी वर्मा दोघांनी देखील अत्यंत देखण्या व कामुक मॉडेल्स चित्रं काढण्यासाठी वापरल्या होत्या. त्यामुळे त्या चित्रातही तो जिवंतपणा, संवेद्यता आणि त्यांचा हुबेहुबपणा परिणामकारक आहेत. शेरगिल देखील मॉडेल्स वापरत असत: उदाहरणार्थ, या चित्रात ताणलेला पण डोक्यापासून पायापर्यंत लाल वस्त्राने झाकलेला देह हा पिवळ्या खाटेच्या पार्श्वभूमीवर तापलेल्या निखाऱ्यासारखा दिसतो. पण त्यांच्या चित्रात स्त्रिया त्यांच्या मूळ रूपात येतात. त्यांची मनस्कता, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सार त्यातून उघडपणे पुढे येतं.

माने आणि रवी वर्मा दोघंही यथादर्शी (पर्स्पेक्टीव) मांडणीचा उपयोग त्यांच्या चित्रात करतात. हे करताना त्यांच्या चित्रातल्या स्त्रिया या गाद्या गिरद्यांवर बसून प्रेक्षकांच्या नजरेला नजर भिडवताना दिसतात. हे करताना त्यांचं काहीसं वरचढ स्थान प्रस्थापित होतं. पण शेरगिल यांच्या चित्रात मात्र जुन्या पद्धतीच्या, सर्वसाधारपणे मध्ययुगीन काळातील लघुचित्रात वापरल्या गेलेल्या, विहंगमावलोकन पद्धतीने चित्रण येते. यामुळे या चित्रात मात्र प्रेक्षक वरून खाली चित्रातल्या स्त्रिच्या प्रतिमेकडे पाहातो अशी रचना तयार होते. अशा प्रकारे प्रेक्षकांचा 'पाहाण्याचा' अनुभव बदलतो. स्त्रीचं शरीर या नजरेसमोर जणू काही उघडं पडतं, अधिक संवेदनशील बनतं. घराच्या आतल्या भागात असलेल्या अनिश्चल वातावरणात ही तरूण स्त्री पहुडलेली दिसते. अशा बंदिस्त वातावरणात ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर ती 'पाहाण्याची वस्तू' म्हणून उभी राहाते.

पण त्याचवेळी असंही दिसतं की त्या चित्रातलं स्त्रीचं शरीर हे फक्त पुरूषी वांछनेकरिता उपलब्ध असलेली वस्तू म्हणून त्याकडे पाहाता येत नाही. आणि त्यामुळेच एकाच वेळी दोन भाववृत्ती तिथे साकारलेल्या दिसतात! नुकतंच लग्न झालेल्या तरूणीचं शरीर लाल-केशरी रंगांमुळे उठावदार दिसतं आणि त्यातूनच तिलाही काही इच्छा-आकांक्षा आहेत याची जाणीव होत राहाते. हा रंग चित्रात अनेक ठिकाणी वापरून त्यातून उठाव आणला आहे. तिच्या केसात माळलेला सिंदूर असेल किंवा तिच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा असेल. तसंच, खाटेचे चारही कोपरे आणि पंख्याच्या हॅंडलला तोच रंग वापरून शेरगिल ते साधू इच्छितात. त्या तरूण स्त्रीचा चेहरा भावहीन आहे. मात्र तिचं शरीरातून तिच्या भावना व मानसिक आंदोलनं प्रकट होतात. तिच्या मनातली हुरहुर आणि उत्कट, आर्त भावनेचं ते चित्रण आहे.

Young Girls


Bride's Toilet


लाल रंग हा लग्नाच्या पवित्र मानल्या गेलेल्या बंधनाचं प्रतीक आहे पण तो लैंगिक भावनेचं देखील प्रतीक आहे. भारतीय कविता आणि चित्रकलेच्या परंपरेत या रंगाला विशेष महत्त्व आहे. लाल रंग तीव्र भावनांचं व अनुरक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. ते प्रेमाचं रूपकही आहे. भक्ती साहित्यात हा भाव सहजपणे पाझरलेला दिसतो. प्रियकर आणि प्रेयसी एकच नाद आणि भावनेत समरस होतात आणि ही प्रेमाची भावना उत्कटपणे व्यक्त करतात: 'लाली मेरे लाल की, जित देखे तित लाल, लाली देखने मै गये, अौर मै भी हो गयी लाल.'

लोकभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत 'लाल'चे अनेक अर्थ होतात. लाल म्हणजे प्रियकर किंवा प्रेयसी साठी वापरला जातो, तसंच तीव्र ओढ वाटणं आणि अनुरक्तीची भावना निर्माण होणं, अशाही अर्थी हा इथं वापरला आहे. शेरगिल यांना भारतीय सौंदर्यशास्त्राची फारशी जाण नसली तरी लघुचित्रांनी मात्र त्यांच्यावर मोहिनी घातली होती. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात लघुचित्र शैलीचा प्रभाव त्यांच्या चित्रांवर ठळकपणे आढळतो. कार्ल खंडालवाला यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी याबद्दल लिहिलं होतं. खंडालवाला यांच्या 'उष्ण रंग' हा शब्दविन्यास त्यांच्या मनावर रेंगाळला होता. त्याचा प्रभाव त्यांच्या 'द स्विंग', 'यंग गर्ल्स', 'द ब्राइड', 'वुमन अॅट बाथ', आणि 'वुमन रेस्टींग ऑन अ चारपाई' या चित्रातील उष्ण रंगांच्या वापरातून स्पष्टपणे दिसून येतो. खरंतर, त्यांना अवघं २९ वर्षांच्या आयुष्य लाभलं. पण आयुष्याच्या शेवटच्या तीन-चार वर्षात ही सगळी चित्रं त्यांनी काढली. आणि यातला समान धागा म्हणजे ही सर्व चित्रं स्त्रियांविषयीची आहेत!

स्त्रीवादी मांडणीत, 'शरीर' हा वारंवार येणारा विषय आहे, तसंच तो शब्दालंकार म्हणूनही वापरला जातो. यापेक्षा अधिक काय म्हणावं? शेरगिल तर आता स्त्री-कलाकारांची प्रतिमा बनली आहे. इतर कुठल्याही भारतीय कलाकारापेक्षा शेरगिल यांच्याबद्दल लिहिलं, बोललं गेलं आहे, त्यांचं काम वाखाणलं गेलं आहे. आता असं सगळं असताना पुन्हा एकदा त्यांच्या कलाकृतींचा अभ्यास करण्यामागे काय उद्देश असावा? त्या कलाकृतींचं तुमच्या 'शरीरा'शी काय नातं असू शकतं? त्यामागचं खरं कारण असं की शेरगिल यांनी चित्रकलेतून भारतीय शैली किंवा भारतीय संवेद्यतेचा पुनर्शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यातल्या नाट्यमयतेनं या शोधप्रक्रियेला निराळाच आयाम लाभला. भारतीय कलेतल्या या प्रश्नाला अत्यंत कल्पकतेनं हाताळणाऱ्या या चित्रकर्तीबद्दल लिहिण्याची मला त्यामुळेच उत्सुकता होती. 'स्त्रीचं शरीर' या विषयावरच्या शेरगिल यांच्या या अपूर्ण राहिलेल्या कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम अलीकडच्या काळात अनेक स्त्री कलाकार करत आहेत. गेल्या दशकभरातील तीन उदाहरणं आपण इथं पाहूया.

सर्वप्रथम, अभिलाषेचा विचार करू. एक स्त्री असल्याने तुम्ही अभिलाषित वस्तू असता, पण त्याचबरोबर, तुम्हाला स्वतःच्याही काही इच्छा, अभिलाषा असतात. त्यामुळे तुम्ही चित्रात एक वस्तू तर असताच पण त्याच वेळी चित्राचा विषयही असता. लिंगभावाच्या दृष्टीकोनातून त्यात एक प्रकारचं द्वैत निश्चितच आहे. १९८९ मध्ये गोगी सरोज पाल यांनी चित्रकलेची नवी मालिका तयार केली. यात त्यांनी स्त्रियांबद्दलची मिथकं आणि त्यांच्या फॅंटसीचं चित्रण केलं. त्यातली पहिली प्रतिमा होती ती कामधेनूची. कामधेनू म्हणजे इच्छापूर्ती करणारी गाय. आपल्या इच्छा आणि स्वप्नं पूर्ण व्हाव्या यासाठी तिची पूजा केली जाते. स्त्रीकडे ही इतरांना सतत देणारी, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारी, 'दात्री' म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे कामधेनू हे या स्त्री करिता योग्य असं प्रतीक आहे. एक स्त्री कलाकार म्हणून याकडे बघताना गोगी सरोज पाल तिरकसपणे पण विनोदाने म्हणतात: “लोक कामधेनूूचं काय ते कौतुक करतात... कामधेनू किती चांगली असते, ती तुमच्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करते. पण किती गंमत आहे पाहा. कामधेनूच्या इच्छेचा कोणीच विचार करत नाही. तिच्या काय इच्छा असतील आणि त्या इच्छा कोण पूर्ण करेल?”

अर्ध-नारी आणि अर्ध-गाय अशा मजेदार मिश्रणातून ही कामधेनूची पांढऱ्या किंवा फिकट पिवळसर रंगाची प्रतिमा तयार होते. या कामधेनूच्या निर्वस्त्र चित्रणातून तिची लैंगिकता देखील अधोरेखित होते. पण तिच्या हात-पायाची खुरं आळत्याच्या लाल रंगात रंगवलेली दिसतात. त्या रंगामुळे मात्र ती प्रेक्षकांना भुलवून स्वतःकडे आकर्षित करून घेत असल्याचे भासते. याच प्रमाणे सरोज पाल यांनी 'किन्नरी' ही पक्षी आणि स्त्री यांच्या मिश्रणातून तयार होणारी काल्पनिक प्रतिमा उभी केली आहे. कामधेनू किंवा किन्नरीसारख्या प्रतिमांतून सरोज पाल भारतीय चित्रकलेतील कामुक किंवा एरॉटिक प्रतिमांची नवी भाषा तयार करतात. त्या संमिश्र सजीवांच्या चित्रणात एक प्रकारचे निलाजरेपण आहे. एकाच वेळी त्यात स्त्री आणि राक्षस या दोहोंचं अस्तित्व आहे. एकाच वेळी रानटी आणि सुसंस्कृत किंवा शांत आणि उद्दाम अशा दोन टोकाच्या रूपात त्या प्रतिमांचा कायापालट होत राहातो. या प्रतिमा चित्रणातून त्या 'पुरूष हा अभिलाषी असतो' आणि 'स्त्री ही अभिलाषित असते' या पारंपारिक समजांना धक्का देतात.

पुढचा मुद्दा आहे शरीराबद्दलचा. स्त्रीच्या शरीराकडे प्रामुख्याने एखादी वस्तू म्हणून पाहिले जाते. आणि खासकरून पुरूषांना हवी असलेली अशी ही वस्तू मानली जाते. पण आता तिच्याकडे केवळ 'पाहाण्याची वस्तू' या दृष्टीकोनातून बघता येतं. कंचन चंदेर यांच्या 'टॉर्सो' या चित्रात हे जाणवतं. १९९४ साली एका कार्यशाळेत त्यांनी या कामाला सुरूवात केली. कागद, काथ्या, शेण आणि रंग यापासून त्यांनी अतिशय जोमदार असं शिल्प तयार केलं. नुसतंच धड असलेल्या या शिल्पात हात, पाय, चेहरा यांचा समावेश नाही. त्यामुळे कुठलीही शारीरिक हालचाल किंवा भावना यातून व्यक्त होत नाही. साधारणपणे, स्त्रीकडे केवळ तिच्यात असलेल्या जननक्षमतेच्या भूमिकेतून बघितलं जातं. या शिल्प प्रतिमेतून तेच पुन्हा एकदा अधोरेखित होतं. अशाप्रकारे, स्त्रीच्या जैव परिस्थितीचा शोध चांदेर आपल्या 'टॉर्सो' या चित्रमालिकेतून घेतात. यामध्ये स्त्रीचं शरीर हेच एक विधान बनून आपल्यासमोर येते, तेच आपल्याला काही सांगू पाहाते.

तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे लाल रंगाबद्दल. शेरगिल यांनी याचा पुनर्वापर केल्यामुळे त्याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. राजपूत लघचित्रांमध्ये वापरले जाणारे लाल, निळा-काळा किंवा गेरूचा पिवळा हे रंग त्यांनी सढळपणे 'वुमन ऑन अ चारपाई'मध्ये वापरले आहेत. या रंगांच्या परिणामी या चित्रातील निश्चल पहुडलेल्या स्त्रीच्या शरीरात जिवंतपणा येतो. याच धर्तीवर, अर्पिता सिंग यांच्या चित्रात रंगाची रचना एखाद्या स्वररचनेप्रमाणे भासते. या विविध रंगांच्या खेळातून त्या अर्थघटन करतात, कलाभाषेचा शोध घेतात आणि त्याच प्रमाणे साचेबंद रचना उलथून टाकतात. त्यांच्या चित्रात अगदी मनाच्या आतल्या कप्प्यात जाणवणाऱ्या भावना या शरीराकृतीच्या रचनेतून प्रकट होतात. आणि या खोलवर दडलेल्या भावना केवळ रंगांच्या माध्यमातून व्यक्त करणं शक्य होतं. 'वुमन इन रेड' (१९८५) आणि 'वुमन सिटींग ऑन अ टिन ट्रंक' (१९८७) या चित्रातल्या स्त्रिया लाल रंगाच्या पट्ट्यांनी आच्छादलेल्या दिसतात. या पट्ट्यांमुळे त्या लाल रंगात घेरल्या गेल्यासारख्या आणि आसक्तीच्या तीव्र भावनेने चिंब झाल्यासारख्या वाटतात. साधारण दहा वर्षांनी सिंग यांनी याच विषयाकडे वळल्या व त्यावर पुन्हा काम केलं. त्यावेळच्या 'वुमन इन रेड' (१९९४) मधली स्त्री ही रंगांची आच्छादनं पूर्णपणे झिडकारते. कामुक भाव असलेली ही स्त्री उकिडवी बसलेली आहे. पण या बसण्यातून तिच्या आतलं सामर्थ्य प्रकट होत राहातं आणि तिल्या नव्यानेच जाणीव झालेल्या स्वातंत्र्याचं दर्शन आपल्याला होतं. वस्त्रहीन शरीरातून असा साक्षात्कार होणं, हेच स्त्रित्वाचं नग्न सत्य आहे!


--- 

मूळ लेखिकागीती सेन
मराठी अनुवादनूपुर देसाई

पूर्व प्रसिद्धी: अमृता शेरगिल अॅंड बॉडी हा गीती सेन यांच्या लेखाचा हा मराठी अनुवाद 'आशयघन'च्या एप्रिल २०१८ च्या अंकात प्रकाशित झाला.