जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग ३)



फौंडेशन फॉर इंडियन कंटेम्पररी आर्ट, दिल्ली या संस्थेकडून मिळालेल्या अभ्यासवृत्तीच्या कामाचा भाग म्हणून गेल्या महिन्यात गुवाहटीला पोचले. ईशान्य भारतात प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ. तेही मला तिथं भेटलेल्या जवळजवळ प्रत्येक माणसानी विचारलं होतं. सुरूवातीला या प्रश्नानी मी थोडीशी बुजत होते. आपण आजवर या भागात आलो नाही याची खंत मनात होती. आणि थोडंसं अपराधीपणदेखील. ते याकरिता की समकालीन कलेत या भागात काय प्रकारचे प्रयोग चाललेत, कलाकारांची मानसिकता काय आहे, कशाप्रकारे ते काम करताहेत याची फारच वरवरची कल्पना मला होती. मुंबई-दिल्लीकडच्या कलासंस्थांमध्ये किंवा कलेविषयक लिखाणामध्येही त्या भागात आकाराला येणाऱ्या कलेला फारसं स्थान नाही, त्याविषयी अभ्यास करणारे अगदी मोजकेच कलाभ्यासक आहेत. तिथं जायची तयारी करत असतानाही मोजकेच लेख मला कला नियतकालिकांमध्ये सापडले. गेल्या काही वर्षात मौशमी कंदाली, अमृता गुप्ता आणि मेघाली गोस्वामी यांनी आसामच्या आधुनिक आणि समकालीन कलेवर संशोधनपूर्ण लिखाण केलंय. पण तेही आसाममधल्या कलाक्षेत्राचा आवाका लक्षात येण्यासाठी पुरेसं ठरत नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न मला अनेक वेळा विचारला गेला तो म्हणजे 'तुला इथल्या कलेचा अभ्यास का करावासा वाटतोय?' त्यात 'तू ईशान्य भारतातील नसताना तुला यात रस का निर्माण झाला', असं बहुतेक वेळा अध्यारूत असायचं. माझ्या बरोबर असलेली दुसरी संशोधिका, अमृताने मी इथलीच आहे शिलॉंगची असं सांगितल्यावर त्यांचं समाधान झालेलं दिसायचं. आणि माझं उत्तर सरळ होतं, मी भारतातल्या मोठ्या शहरातल्या जनकलेचा अभ्यास करतेय त्यामुळे तेही उत्तर आमच्यातला विश्वास वाढून मनमोकळा संवाद करायला पुरेसं असायचं.

या सगळ्या प्रक्रियेत मला मात्र मेनलॅंड आणि ईशान्य भारत हा फरक पहिल्यांदाच ठळकपणे जाणवला. त्याचा आवाका समजून घेताना संजय हजारीका यांचे 'रायटींग अॉन द वॉल' हे एेतिहासिका आढावा घेणारे पुस्तक किंवा ध्रुब हजारिकाच्या 'सन्स अॉफ ब्रह्मपुत्रा' ही कादंबरी, तसंच मेघाली गोस्वामी आणि मौशमी कंदाली सारख्या कला इतिहासाच्या अभ्यासकांच्या लेखनात आसामचा इतिहास, भू-राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक घडामोडी, कलाविश्वाची जडणघडण, विद्यार्थी चळवळ, बंडखोरी याचे संदर्भ येत राहातात. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाली संस्कृती व वैैचारिक प्रभुत्व इथे वाढत गेले आणि तेच आपल्याला आसामच्या कलेतही उतरलेले दिसते. आसामच्या आधुनिक कलेचं भान हे त्या काळात कलकत्त्यामध्ये उभे राहिलेले कलाकारांचे कलेक्टिव, आधुनिकतेविषयीची वैचारिक घुसळण, आंतर्राष्ट्रीय कलाप्रवाहांचा प्रभाव यातून घडत गेले. १९६० नंतरचा तिथला काळ समजून घेताना वसाहतकालीन इतिहास समजून घेणंही महत्त्वाचं ठरतं. ब्रिटीश काळातला 'ईशान्य सरहद्द प्रांत' हा भारतापासून प्रशासकीय दृष्टीने आणि ब्रिटीश धोरणांमुळे मुख्य भारतापासून वेगळा राखला गेला. त्यामुळे या भागात वांशिक स्वायत्ततेचा उदय होण्यास हातभार लागला. तसंच बांग्लादेशला सीमा जोडलेली असल्यामुळे तिथले हिंसाचार, वांशिक अस्मिता, राजकीय प्रातिनिधित्वाचे प्रश्न हे सारे तिथला स्थलांतराचा इतिहास, भू-राजकीय प्रश्न, राजकीय अस्थिरता यांच्या संदर्भातच पाहावे लागतील. 'आसु' ही विद्यार्थी चळवळ, तेलाच्या आणि एकूणच विकासाच्या प्रश्नाला हात घालणारी आसाम चळवळ, 'उल्फा'ची बंडखोरी, बांग्लादेशी स्थलांतरितांना त्यांनी केलेला विरोध, त्यातून उदयाला आलेला मुस्लिम विरोध आणि हिंसाचार, बोडोलॅंडची मागणी आणि त्यातून आकाराला आलेल्या अतिरेकी कारवाया, लष्कराने केलेला हस्तक्षेप या सगळ्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण हे गुंतागुंतीचे आहे. या सगळ्यात 'केंद्र-परिघा'च्या मांडणीतूनच बघितलं गेल्यामुळे कला इतिहासाच्या अभ्यासात आणि कला समीक्षेच्या क्षेत्रातही या भागाचे चित्रण हे मुख्यत्वे करून त्याच्या 'अनोखे'पणावर भर देत केले गेले. पण परीघावरचे कलाप्रवाह केवळ मुख्यप्रवाहाला बळी पडले किंवा त्याच्या प्रभावाखाली राहिले असंच नव्हे तर त्या असमतोलाच्या नात्यामुळे आणि नकारामुळे त्यांनी स्वतःचे नवे मार्ग आणि भाषा तयार करण्याचे प्रयत्न केलेले दिसून येतात.

दिलीप तामुली,नोबडी, एव्हरीबडी, डेडबॉडी

 

राजकुमार मझिंदर, अगेन्स्ट होलोकॉस्ट अॅंड टेररीझम



समकालीन कलेत गुवाहाटी, सिलचर या शहरांमध्ये अनेक प्रयोग केले जाताहेत, कलेची नवी माध्यमं हाताळली जाताहेत पण त्यांची फारशी दखल मुख्यप्रवाहातल्या कला नियतकालिकात घेतली जाताना दिसत नाही. तिथले अनेक कलाकार बडोदा, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणी कलाभ्यास करून परत जाऊन तिथे राहातायत, कलाक्षेत्रात नवे प्रकार रूजवू पाहातायत. १९९०च्या आसपासच गुवाहटीमध्ये समकालीन कलेतल्या अशा प्रयोगांना सुरूवात झालेली दिसते. रॉयल डॅनिश अॅकॅडमीतून शिकून आलेल्या दिलीप तामुली यांनी 'मस्तिष्क कोना'च्या रूपात पहिल्यांदा या भागात इस्टॉलेशन उभं केलं. त्यांच्या कलाव्यवहारात त्यांनी सतत इतर कलाकारांबरोबर सहयोगातून काम केलं आणि काव्य, पथनाट्य, ग्राफिक डिजाईन, इस्टॉलेशन, परफॉर्मन्स यांच्या सरमिसळीतून कलाकृती निर्माण केल्या. नंतरच्या काळात ते हळूहळू सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणाऱ्या कलानिर्मितीकडे वळले. याच काळात विवान सुंदरम यांनी नवी वाट चोखाळली. चित्रकलेकडून ते इनस्टलेशनकडे वळलेले आपल्याला दिसतात. त्यांनी दिल्ली-मुंबईत केलेल्या त्यांच्या कला प्रदर्शनातून समकालीन कलेला वेगळी दिशा मिळाली. पण दिलीप तामुलींच्या म्हणण्याप्रमाणे सुंदरम यांच्या काही महिने आधीच त्यांनी भारतातला इस्टॉलेशनमधला पहिला प्रयोग गुवाहटीमध्ये केला होता. आसाममधील वांशिक अस्मितांचं राजकारण, त्यातून तयार झालेलं अस्वस्थतेचं वातावरण यांचं प्रतिबिंब तामुलींच्या कामात उमटलेलं दिसतं. रॉबिजीता गोगोई यांच्याबरोबर त्यांनी 'आयडेंटीटी मार्केट' आणि 'गाथा' ही जागतिकीकरण आणि त्यामुळे एेरणीवर आलेल्या 'आयडेंटीटी'च्या मुद्द्यावर भाष्य करणारी सादरीकरणं/इस्टॉलेशन आकाराला आली तर २०१२ च्या त्यांच्या 'नोबडी, एव्हरीबडी, डेडबॉडी' हा सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणारा परफॉर्मन्स त्यांनी गुवाहाटीच्या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन पार पाडला. हिंसाचारात रस्त्यावर इतस्ततः विखुरलेल्या मृतदेहांचा पंचनामा करताना पांढऱ्या खडूने मानवाकृती आखल्या जातात त्या कृतीची नक्कल करत ते मानवी हिंसेने व्यापलेलं सामाजिक वास्तव, पोलिसांनी केलेली फसवी एनकाऊंटर, शहरात पसरलेली असुरक्षिततेची भावना अशा अनेक पैलूंवर विचार करायला भाग पाडतात.

आसाम चळवळ आणि आसामी राष्ट्रवादावर चिकित्सक टीप्पणी करताना शांतिनिकेतन आणि बडोद्याला शिकलेल्या राजकुमार मझिंदर यांनी चित्रकला, मुद्रा-कला यांच्याबरोबरच सार्वजनिक अवकाशात इस्टॉलेशनच्या माध्यमातून हस्तक्षेप करायला सुरूवात केली. यात त्यांनी आसामी कवी निलोमणी फुकान यांच्या कविता कोरून त्या पुस्तकांच्या लाकडी जळक्या कपाटात ठेवल्या. लाल भुकटी आणि फुटलेल्या काचांमध्ये उभी केलेली ही गोलाकार रचना आसाम चळवळीच्या बळींना आदरांजली तर ठरतेच पण आसामच्या बहुसांस्कृतिक समाजात पुन्हा एकदा 'केंद्र – परीघ' अशी रचना तयार करणाऱ्या या चळवळीवरच प्रश्नचिन्हं उभं करते. २००८च्या बॉंबस्फोटांच्या मालिकेनंतर त्यावर टीकात्मक भाष्य करणारं 'अगेन्स्ट होलोकॉस्ट अॅंड टेररीजम' परफॉर्मन्स-इनस्टलेशन त्यांनी दुगलीपुखरी या तळ्याच्या काठाशी मांडलं. त्यात त्यांनी जळालेले तीन लाकडी दरवाजे मांडले होते आणि समोरच्या सिमेंटच्या चौथऱ्यावर लहान मुलांनी तेली खडूने चित्रे रंगवली. दरवाजावरची कुलपं निरपराध लोकांचा जीव घेणाऱ्या शासन आणि बंडखोर या दोन्हीच्या हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या असुरक्षितता आणि भीतीचं वातावरण यांची जाणीव करून देणारी होती. बॉंबस्फोटाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनी जमा झाले होते. 

इंद्राणी बरूआ, कल्चरल रि-इमॅजिनेशन्स

 

हरेकृष्ण तालुकदार, क्विट फ्रॉम स्प्लिट

 

अलिकडच्या दोन-चार वर्षात तुलनेनं या शहरातलं वातावरण शांत आहे आणि असंही लक्षात आलं की तरूण मंडळी भूतकाळातल्या हिंसाचाराबद्दल बोलायला फारशी उत्सुकही नाहीत. यातूनच मग त्यांना जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या विषयांवर काम केलेलं दिसून येतं. याचं उदाहरण म्हणजे हरेकृष्ण तालुकदार या कलाकार आणि क्युरेटर यांचे काही कला-प्रकल्प. 'अॅस्थेटीक' या कलेक्टीवच्या माध्यमातून त्यांनी अस्मिता, स्थलांतर, सीमारेषा यासारख्या मुद्द्यांना हात घालणारे 'स्प्लिट' आणि 'क्विट फ्रॉम स्प्लिट' हे परफॉर्मन्स केले. यात ते घराची आकृती ही सतत रूपक म्हणून वापरताना दिसतात. त्यांचा 'रि-विजिटींग दीपोर बील' हा प्रकल्प वाढत्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांना भिडणारा होता. गुवाहाटी शहराजवळ राहाणारे विविध भाषिक व सांस्कृतिक लोकसमूह, त्यांचा मौखिक इतिहास, मिथक, स्मृती, तिथल्या परिसराशी असलेलं त्यांचं नातं आणि प्रशासकीय धोरणांमुळे उद्ध्वस्त होत चाललेली जैव वैविध्यता तसंच सांस्कृतिक विविधता यांचा परामर्श घेत कलाकारांनी इथे कला-हस्तक्षेप केले. यात त्यांनी तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तू किंवा सहलीला आलेल्या लोकांनी टाकलेल्या प्लास्टिक आणि कागदी वस्तूंचा वापर केला.

आर्किटेक्ट, कलाकार आणि संशोधक असलेल्या इंद्राणी बरूआ यांचा 'कल्चरल रि-इमॅजिनेशन्स' हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीकाठी आकाराला आला. २०१२ साली सुरू केलेला तीन टप्प्यात चालणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश कलाकार-कारागीर, कला आणि वास्तुकला, हस्तकला आणि ललित कला अशा साचेबंद मांडणीला छेद देणं आणि त्याच प्रक्रियेतून संमिश्र कलाव्यवहार कसा आकाराला येईल याच्या शक्यता आजमावणं हा होता. सुरूवातीला यात कारागीरांबरोबर काम करताना हस्तकला-व्यवहार आणि कलेतील अमूर्तता यांचा मेळ घालत त्यांच्या साचेबंद व्याख्यांवर विचारविनिमय केला गेला. त्यानंतर स्थानिक आणि शाश्वत असं तंत्र वापरून आणि कलाकार, कारागीर व कामगारांच्या सहयोगातून बांबूचा तराफा बनवला गेला. यात संगीत, साहित्य, चित्रपट, नाटक, लोककला अशा अनेक क्षेत्रातल्या कलाकारांनी सादरीकरण केलं. स्थानिक लोकसमूहांबरोबर काम करत ब्रह्मपुत्रा नदी, तिचा परिसर, पर्यावरणीय प्रश्न यांना भिडत लोकसहभागातून नदी भोवतालच्या संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण करणं असाही याचा उद्देश आहे. मर्यादित काळासाठीच तिथे उभी असलेला हा तराफा 'फिरस्ता' किंवा 'जाजाबोर' कवी म्हणूनच कल्पिला गेला होता.

या वैयक्तिक पातळीवरच्या प्रयत्नांबरोबरच सामूहिक पातळीवरही काही कार्यक्रम आणि उपक्रम इथे चालू असलेले दिसतात. गुवाहाटी आर्ट कॉलेज, गौहाटी आर्टिस्ट गिल्ड, शंकरदेव कलाक्षेत्र, आर्ट अॅंड क्राफ्ट सोसायटी यासारख्या संस्था गेली काही दशकं इथं कार्यरत आहेतच पण अलिकडच्या काही वर्षात कलादालनाच्या बाहेर पडून कलाकार काम करतायत, एकत्र येऊन नवे प्रयोग करतायत, संस्थात्मक रचनांवर टीका करतायत. परात्मता आणि विखंडितता यामुळे माणसाला जखडून टाकणाऱ्या भांडवली समाजरचनेला समोरासमोर तोंड देण्याकरिता वैचारिक आणि दृश्यात्मक पातळीवर काय प्रयोग करता येतील हे आजमावण्यासाठी डिजायर मशिन कलेक्टीव २००४ मध्ये आकाराला आला. त्यांच्या 'पेरीफेरी' या प्रकल्पांतर्गत, सोनल जैन आणि मृगांक मधुकालिया यांनी एक जुनी बोट भाड्याने घेऊन ती ब्रह्मपुत्रेच्या काठावर उभी केली. यात कला, नदीचा, शहराचा इतिहास, परिसर, मौखिक परंपरा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, जन-कला हस्तक्षेप, अर्बन डिजाइन इत्यादिच्या अशा विविध विषयांतल्या संवादात्मक उपक्रमांसाठी ती एक प्रयोगशाळा ठरली. 'नरेटीव्स अॉफ ब्रम्हपुत्रा', 'भोटभोटी टेल्स' यासारख्या प्रकल्पात कलाकारांनी ब्रह्मपुत्रेवरचे नावाडी, प्रवासी यांच्या कथा, नदीच्या अवकाशात घडणारे संवाद, त्यातून आकाराला येणारी कथानकं, चित्रपट असे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. 'डीएमएस'चे हे प्रकल्प आणि गुवाहाटीला त्यांनी आपला तळ बनवणं, तसंच त्यांनी वापरलेल्या आकृतीबंध, रचना आणि माध्यमं यातून ते एकप्रकारे केंद्र-परीघ रचनेला उलथून टाकण्याचा प्रयत्न होता. २००५ मध्ये किशोरकुमार दास, राजकुमार मझिंदर आणि देबानंद उलुप यासारख्या कलाकारांनीही एकत्र येऊन 'अन-डू अॉब्जेक्ट्स' हा कलेक्टीव सुरू केला. संकल्पनात्मक कला व्यवहार, जन-कला प्रकल्प, प्रदर्शनं, रस्त्यावरचे कला-हस्तक्षेप अशा माध्यमांतून काम करणं हा याचा मुख्य उद्देश होता. याच धर्तीवर नंतरच्या काळात, 'येलो कॅब कलेक्टीव' आणि अगदी अलिकडे 'अंगा नॉर्थ ईस्ट' हे कलाकारांचे - कला विद्यार्थ्यांचे कलेक्टीव्स गुवाहाटी मध्ये आकाराला आले. 'अंगा नॉर्थ ईस्ट'मधले कलाकार म्हणतात त्याप्रमाणे आर्ट स्कूलबरोबर असलेल्या 'गोड भांडणातून' हा कलेक्टीव उभा राहिला. कलेचा अभ्यासक्रम, त्यातले अनेक प्रश्न, शिकवण्याच्या पद्धती, कलाशाळेची मर्यादित संसाधनं, त्याविषयीची सर्वपातळीवरची अनास्था यातून या मुलांना एकत्र येऊन समकालीन कलेला सामोरं जावं, नव्याचा शोध घ्यावा या उर्मीतूनच हे सुरू झालंय. मुंबई किंवा बंगलुरू सारख्या शहरांपेक्षा वेगळी प्रक्रिया इथे घडताना दिसतेय त्यामुळे यातून गुवाहटीच्या समकालीन कला प्रयोगांना कशी दिशा कशी मिळते ते पाहाणे मोलाचे ठरणार आहे.


छायाचित्र सौजन्य: राजकुमार मझिंदर, दिलीप तामुली, इंद्राणी बरूआ, हरेकृष्ण तालुकदार
विशेष आभार: अमृता गुप्ता-सिंग

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे | सप्टेंबर २०१६

सीमरेषा धूसर होताना: शिल्पा गुप्ता यांची मुलाखत (उत्तरार्ध)


माझ्या जनकलेवरच्या प्रकल्पावर काम करताना शिल्पा गुप्ता बरोबर प्रदीर्घ गप्पा मारायची संधी मिळाली. तिची कामाची प्रक्रिया, कामात उमटणारे कळीचे मुद्दे, माध्यमांची तिची जाण आणि हाताळणी, जनकलेबद्दलची तिची मतं तिने या मुलाखतीत उघड केली. त्या मुलाखतीचा हा दुसरा भाग.

तुझ्या नंतरच्या कामात हा धागा सतत दिसत राहतो... तुझ्या कलाव्यवहारातील आंतरक्रिया हा एक भाग झाला पण त्याच बरोबर कलाकृती खासगी कलादालनात न एकवटता ती त्यातून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडत राहिली मग ते 'देअर इज नो बॉर्डर हिअर' मध्ये असेल किंवा 'ब्लेम' मध्ये...

'ब्लेम'चा जन्म आरपारच्या दरम्यानच झाला. २०००च्या सुमारास. ए४ आकारात छापलेल्या पोस्टरवर 'ब्लेम' लिहिलेल्या रक्त भरलेल्या बाटलीच चित्र होतं. त्यानंतर गुजरात दंगली झाल्या. तेव्हा ते काम पुढे नेत मी काचेच्या बाटल्यामध्ये रक्तासारखा द्रवपदार्थ भरुन तो मुंबईच्या लोकलमध्ये विकायला नेला. त्यावर 'ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्याबद्दल मी तुम्हाला दोषी ठरवते - तुमचा धर्म, तुमचे राष्ट्रीयत्व' अशी लेबलं लावली होती. मग माझ्या बांद्रा ते फोर्ट अशा वाऱ्या सुरू झाल्या. मी माझ्या नातेवाईकांपैकी कुणालातरी लोकलमध्ये घेऊन जायचे. त्यांच्यापैकी कुणीतरी बाटलीबद्दल विचारायचे, विकत घ्यायचे, मुख्य म्हणजे काहीतरी संवाद सुरू करून प्रवाशांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी हा खटाटोप करायचे. पण मग लक्षात आलं की हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. मुंबईच्या लोकलमध्ये बायका सहज माझ्याकडे काय आहे ते बघायला मागायच्या आणि मोजून सगळ्या बाटल्या जशाच्या तशा परतही यायच्या. ते पाहून बायका अंतर्मुख व्हायच्या. त्यावरचा लिहिलेला मजकूर अगदीच स्पष्ट-स्वच्छ आहे. आणि तो मजकूर हिंदी, इंग्लिश, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषात होता. काही जण याचं काय करू असंही विचारायचे. मी त्यावेळी गोध्रा किंवा इतर कुठल्याच संदर्भाविषयी बोलायचे नाही पण त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची मत जाणून घ्यायचे.



ब्लेम, २००२-२००४


देअर इज नो बॉर्डर हिअर, २००५-६


'ब्लेम' ही कलाकृती आहे हे मला कुणाला सांगावं लागलं नाही किंवा लोकानीही कधी विचारलं नाही, भारतात आणि भारताबाहेरही. लोक त्याच्याकडे एक वस्तू म्हणूनच पाहात होते. ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं. परदेशातल्या एका म्युझियममधल्या प्रदर्शनाच्यावेळो आम्ही बाहेर त्या बाटल्या वाटत होतो. एक मुलगी ती बाटली घेतल्यावर हमसून रडायला लागली. आमचं शुटिंग करणारा कॅमेरामन ते बंद करून आमच्यात सहभागी होऊन बाटल्यांचं वाटप करू लागला.

त्यानंतर 'नो बॉर्डर' आलं...चिकटपट्ट्यांवरती ही अक्षरं छापलेली होती. ते खासगी-सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी प्रदर्शित केलं गेलंय. अजूनही कुठे कुठे मला त्या चिकटपट्ट्या वापरलेल्या दिसतात; एखाद्या ग्राफिटी कलाकारानी असेल, गोव्यातलं होटेल असेल किंवा गोदरेजने आयोजित केलेल्या प्रदर्शनातला कलाकार असेल.


समकालीन कलेमध्ये Intersubjectivity किंवा आंतरव्यक्तिक असणं हा ही एक महत्त्वाचा पैलु आहे. कलाकृती ही कलाकाराची तर असतेच पण त्याचबरोबर प्रेक्षकही त्या कला निर्मितीमध्ये, अर्थनिर्मितीमध्ये भाग घेत असतात...

माझ्या कामात ते आहेच. पण मी ते वेगळ्या संदर्भात अनुभवलं. मी सुरूवातीला नोकरी करायचे, प्रोजेक्ट्स वर काम करायचे. त्यात वेब डिजाईन करायचे प्रामुख्याने. तर न्यू मिडीया कलाकृतीसाठी मला बोलावलं जायचं. त्यात वेरिएबल्स असतात, तुम्ही ठरवता प्रेक्षकांना कुठून कुठे न्यायचं ते पण माझ्या कामात कथनं असतात आणि प्रेक्षक एका अर्थी त्या कथनाला पूर्णत्व देतात. प्रेक्षक तो प्रवास पूर्ण करतात, त्यांची वाट जरी ते निवडत असले तरी त्याची संहिता मी दिलेली असते. अर्थात हे झालं कंप्युटर किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या कलाकृतीच्याबाबतीत. पण जिथे प्रत्यक्ष कलावस्तू किंवा रोजच्या वापराच्या वस्तू येतात तिथं हे बदलतं. उदाहरण म्हणजे 'नो एक्स्प्लोजिव' लिहिलेल्या पिशव्या असतील किंवा ग्रेव्ह स्टोनची मालिका. गॅलरीबाहेर ते गेल्यावर काय घडतं हे बघणंही तितकच मजेशीर आहे. 'देअर इज नो एक्स्प्लोजिव इन धिस'च्या कापडी पिशव्या ठेवल्या होत्या आणि लोकांना त्या घेऊन बाहेर फिरण्याचं आवाहन केलं. जगभर पसरवला गेलेला दहशतवाद, त्याचं अर्थकारण, त्यातून आलेल्या सतत पाळत ठेवण्याच्या पद्धती, त्याची आपल्या खासगी आयुष्यातली घुसखोरी हे सगळंच यातून मला मांडायचं होतं. पण त्या घेताना लोकांची अस्वस्थता जाणवायची. काही जण लगेच उचलायचे तर काही जणांची बराच वेळ चुळबुळ चालायची. काही जण मोठ्या आकाराच्या बॅगा घ्यायचे, काही अगदी लहान. एकदा ओपनिंगच्या आधी मीच ती बॅग घेऊन फिरले, काही मोक्याच्या ठिकाणी थोडा वेळ लोकांच्या प्रतिक्रिया आजमावत उभी राहिले. लोकांनी मला ईमेलनेही कळवलं की बॅग घेऊन गेल्यावर काय झालं आणि आत्ता ती बॅग कुठे आहे इत्यादि. त्यातल्या काही जणांनी ती लपवून ठेवली होती तर काही जणांनी आपल्या अॉफिसमध्ये सर्वांना दिसेल अशी ठेवली होती. एकानी सांगितलं की पॅरिसमध्ये त्याला पुन्हा पुन्हा सेक्युरिटी चेक मधून जावं लागलं, शेवटी त्यातून काहीच निघालं नाही म्हणल्यावर त्याला सोडलं.

'१२७८ ग्रेव्ह स्टोन्स' यात मी हे संगमरवरी दगड ठेवले होते. काहींवर नंबर टाकले होते, काहींवर नाही. त्या दगडांपर्यंत प्रेक्षक कसे येणार, कुठल्या बाजूने येणार, त्यातं शीर्षक नेमकं कुठे लावलेलं असेल, या सगळ्याचाच बारकाव्यात जाऊन मी विचार करते. यातही आलेले लोक दगड घेऊन जाऊ शकत होते. अट एकच होती की त्यांनी त्या दगडाचे केअरटेकर बनायचे. लोकांच्या अनेक भावना तिथं व्यक्त होताना दिसल्या: लोक संशय व्यक्त करत होते, दुःखी-कष्टी होत होते, उत्तेजित झाले होते. काही जणांना नेमकं काय आहे ते कळत नव्हतं. हे कश्मिरमधल्या अनामिक कबरींविषयी आहे असं मी सांगितल्यावर त्यांच्यात एकदम चलबिचल झाली. त्यातले काही जण ते घरी घेऊन गेले, ती कलाकृती आहे की नाहीये, त्याचं नेमकं काय करायचं, कुठे ठेवायचं असे प्रश्नं त्यांच्यासमोर होते. काहींनी ते 'अशुभ' असल्यामुळे परत आणून दिले, काहींनी घरामागे पुरले, एकाच्या हातून ती शिळा तुटल्यामुळे ते घाबरून गेले, पण अशाप्रकारे ते त्या कलावस्तूचे कथनकार बनले. आणि त्या कलावस्तूचा प्रवास त्यांच्या कथनातून पुढे चालू राहिला. 

देअर इज नो एक्स्प्लोजिव इन धिस, २००७-८
 

थ्रेट, २००८-९



अशाप्रकारच्या संवादात्मक प्रक्रियेतून तुझी कलाभाषा कशी घडते किंवा बदलते का?

नक्कीच. ती तर सतत घडणारी प्रक्रिया आहे. आधी मी बालाच्या कामाचं उदाहरण दिलं. त्याची आरपार मधली कलाकृती ही जवळपास माझी असल्यासारखीच वाटत होती. त्यात लिखित मजकूर होता. १९९५ पासून मी साधारणपणे मी बहुतेक वेळा लिखित मजकुराचा माझ्या कामात समावेश करत आलेय. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. प्रतिमेला अॅनोटेशन म्हणून, सुरूवात किंवा शेवट म्हणून, कलाकृतीचा-कलाकाराचा विषयीभाव असे अनेक घटक त्यात एकत्र येतात. त्यातून लोकांशी संवाद साधणं सोपं जातं. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातले लोक तर हे पाहातातच पण अधिक व्यापक अशा प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणं मला फार गरजेचं वाटतं. 'शॅडो ३' ला म्हणूनच मी कार्टर रोड वर मांडलं होतं. यात वेळ जातोच, पैसे उभे करा, पत्र लिहा, परवानगी मिळवा, वाटाघाटी करा. मला वाटतं हा कलाकृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्र असलेल्या कलाकृतीत तंत्रज्ञानही महागडं असतं त्यामुळे तो पैलुही लक्षात घ्यावा लागतो. सिडनी बिनालेत मी टच स्क्रीन वापरले होते पण मुंबईतल्या प्रदर्शनाच्या बजेटमध्ये ते बसणारं नव्हत मग मला ती कल्पना रद्द करावी लागली! बऱ्याचदा मी जुने कंप्युटर, भाड्याने आणलेली साधनं वापरते, तंत्रज्ञांच्या मागे लागून स्वस्तातलं आणि सहज वापरता येणारं तंत्र वापरण्यावर भर देते. 'शॅडो' किंवा 'स्पीकिंग वॉल' असेल, ते सहजपणे कुठेही घेऊन जाता येतं. लोकांच्या त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया त्याचमुळे महत्त्वाच्या ठरतात... माझ्या कला व्यवहाराचा मोठा भाग व्यापलाय तो माझं (कला)वस्तूशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यात. १९९५ च्या आसपास मी पोस्टानी ३०० लोकांना माझ्या कलाकृती पाठवल्या. ५x५ इंचाच्या कागदावर एक रेखाचित्र आणि मागच्या बाजूला लिहिलं होतं, 'प्लीज डिस्पोज आफ्टर यूज'. पण त्यातून जो अनुभव आलाय त्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न उरतोच! त्यामुळे जनकला असं काही एकवचनी गोष्ट नाही. त्याचबरोबर, या प्रक्रियेतील पुनरावृत्ती (उदा. पोस्टाचे स्टॅंप लावण्याची क्रिया आणि पत्रांच्या नंबर टाकलेल्या अनेक प्रती) आणि बहुलता ('सिंगिंग क्लाऊड' मध्ये वापरलेले अनेक आवाज) या दोन गोष्टी माझ्या कलाकृती आकाराला आणत असतात. 'थ्रेट' या कलाकृतीमध्ये थ्रेट हा शब्द लिहिलेले वीटेच्या आकाराचे साबण इन्स्टलेशनमध्ये मांडलेले होते. ते साबण प्रेक्षक घेऊन जाऊ शकतात, वापरू शकतात आणि जसा साबण झिजत जाईल तशी ती 'थ्रेट' कमी होत जाईल, अशी या मागची कल्पना आहे. आत्तापर्यंत साधारण तीस हजार साबण या माध्यमातून जगभर पसरलेत. यात दोन गोष्टी घडतात, एक तर आर्ट गॅलरीत कलाकृती केवळ विक्रीसाठी असाव्यात या समजाला तडा जातो आणि येणारे प्रेक्षक या कलाकृतीचा भाग बनतात, ती कलाकृती त्यांच्या जीवनाचा भाग बनते. काही लोकांनी ते साबण वापरले, काहींनी जपून ठेवले, काहींनी विविध प्रदर्शनात मांडले. असं त्या कलावस्तूचं स्वतःचं असं जग निर्माण होत जातं. तसंच, मी माझ्या कामासाठी डेटा पण गोळा करत असते. उदाहरणार्थ, 'हंड्रेड हॅंड ड्रॉन मॅप्स' हा २००७ पासून चालू असलेला प्रकल्प आहे. यात मी जगभरातल्या विविध देशातल्या लोकांकडून त्यांच्या देशांच्या नकाशाची चित्रं काढायला सांगून ती गोळा केली आहेत. या प्रक्रियेत त्यांचा विषयीभाव लक्षणीय ठरतो; एकाच गोष्टीकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टीकोन यातून स्पष्ट होतात आणि तेच कलाकृती घडवतात.


मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: शिल्पा गुप्ता
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, अॉगस्ट २०१६