जन-कला: सार्वजनिक ठिकाणची समकालीन कलारूपे (पूर्वार्ध)


समकालीन कलेचा आणि कला व्यवहाराचा  विचार करताना त्यात होत जाणाऱ्या बदलांचा आणि नव्या शक्यतांचा विचार आणि आकलन होणे, या बदलातून तयार होणारी नवी कला रूपं समजून घेणेअभ्यासणे आणि त्याकरिता नव्या जाणिवा निर्माण होणे ही फार महत्वाची प्रक्रिया सध्या आपल्याला घडताना दिसतेय. साधारणत:१९९० नंतर भारतीय समकालीन कला विश्वात जे बदल घडत गेले त्यातून संकल्पनात्मक कला, मांडणी-शिल्प, सादरीकरण कलाविडीओ आणि नाद कला यासारखी विविध रूपे आणि आकृतिबंध तयार झालेले दिसून येतात. द्विमितीय चित्रे, रेखाचित्रे आणि त्रिमितीय शिल्पे यापलीकडे जाऊन नवीन शक्यतांचा विचार यात झालेला दिसतो. ही नवी रूपे इतर ज्ञानशाखांच्या संयोगातून घडून आली  त्याचबरोबर प्रस्थापित कलाप्रकारांच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवे निर्माण करण्याच्या प्रयोगशीलतेमधून देखील घडवली गेली. हे सगळं घडताना नवा प्रेक्षकवर्ग ही घडायला हवा, या नव्या कलारुपांकडे कसं पाहायचं याची दृष्टी विकसित व्हायला हवीनव्या सांस्कृतिक जाणिवा तयार होताना, जागतिक स्तरावर देवाण-घेवाण सुरु असताना या नव्या कलाप्रकारांकडे आपल्या इथल्या संदर्भात कसं समजून घ्यायचं याचा समग्रतेने विचार व्हायला हवा आणि त्यादृष्टीनेही अनेक तऱ्हांनी अनेक स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत

समकालीन कलाविश्वामध्ये एक महत्वाचं अंग अलीकडच्या काळात विकसित होताना दिसतंय ते म्हणजे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केली जाणारी कला रूपे. ज्याला आता कलाविश्वात 'पब्लिक आर्ट' असं संबोधलं जातं. ही सार्वजनिक ठिकाणे अनेकविध प्रकारची असू शकतात, असतात. एकीकडे अमूर्त, संकल्पनात्मक पण त्याच बरोबर ठोस स्वरूपात दिसणारे असे हे कलानिर्मितीचे आणि कलेचे चर्चाविश्व उलगडणारे आणि घडवणारे अवकाश आहे.  संग्रहालये, बाजार, मॉल, स्टेशन, रस्ते, चौक, बगीचे, समुद्रकिनारे या सारख्या ज्या ज्या ठिकाणी लोक सहजतेने संचार करू शकतात, कुठल्याही आडकाठीविना त्यांना प्रवेश मिळू शकतो, त्या ठिकाणी प्रदर्शित केली गेलेली कला ही सर्वसाधारणपणे पब्लिक आर्ट म्हणून ओळखली जाते. याला इथून पुढे आपण 'जन-कला' अशी संज्ञा वापरूया. लोक किंवा जन ही काही एकवचनी श्रेणी नाही त्यामुळे यात अर्थातच हे लोक कुठल्या सामाजिक-आर्थिक स्तरातून येतात हा मुद्दा उरतोच. पण तरीही सर्वसाधारणपणे समावेशक असे याचे स्वरूप असते असे आपण म्हणूयाअशी कला जी सहजपणे लोकांपर्यंत पोहोचते, लोक ज्या कलेचा आस्वाद घेऊ शकतात आणि जी लोकांच्या रोजच्या व्यवहाराच्या ठिकाणचा भाग बनते आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जी कला लोकांबरोबरच्या संवादातून, देवाण-घेवाणीतून निर्माण होते ती खऱ्या अर्थाने जन-कला ठरते

बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींचे हे पुतळे झाकण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता.


सुरुवातीला आपण थोडीशी त्याची पार्श्वभूमी बघितली तर सार्वजनिक ठिकाणचे कलाविष्कार कसे घडत आणि बदलत गेले, कोणकोणत्या रुपात मांडले गेले ते आपल्याला समजून घेत येईलआपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर असं दिसतं की पूर्वीपासूनच सार्वजनिक ठिकाणी, मग त्या सरकारी इमारती असो, प्रार्थनास्थळे असो, चौक असो,  तिथे आपल्याला चित्र-शिल्पादि कला प्रकार दर्शनी भागात लावलेले दिसून येतात. ती त्या त्या समाजाच्या दृकसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली होती. पण त्या कलाकृती या सत्ताधारी, धार्मिक सत्ताकेंद्रे किंवा उच्च वर्गीयांच्याकरिता किंवा त्यांच्या मागणीनुसार बनवल्या गेलेल्या होत्या.  अलीकडच्या काळातही सार्वजनिक ठिकाणी राजकीय, सामाजिक नेत्यांचे आणि इतिहासातील महापुरुषांचे (आणि क्वचित स्त्रियांचेही) पुतळे आणि स्मारके उभारली गेलेली दिसतात. बदलती सत्तासमीकरणे, सत्ता संबंध आणि सामाजिक-सांस्कृतिक घुसळणीतून त्यांना उभा राहणारा प्रतिरोध, त्यातून तयार होणाऱ्या नव्या जाणिवा अशा बहुअंगी प्रक्रियेतून ही शिल्पे उभी राहताना दिसतात. त्याच बरोबर त्या त्या ठिकाणच्या सांस्कृतिक राजकारणाशीही त्याचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो:  महाराष्ट्रात शिवाजी, राजस्थानात राणा प्रताप किंवा दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश मध्ये मायावती यांचे पुतळे. त्यांचे अर्थ, संदर्भ आणि ज्या पार्श्वभूमीवर ते उभारले गेले त्याचा साकल्याने आणि अनेक स्तरांवर विचार करण्याची गरज आहे.  

याच बरोबर सार्वजनिक ठिकाणच्या कलेचा दुसरा पैलू म्हणजे आधुनिक कलाकृतींचा आणि कलाकारांचाही त्यात असलेला समावेशखुल्या मोकळ्या जागेत बनवलेल्या या कलाकृती त्या पाहणाऱ्यावरती एक वेगळाच ठसा उमटवून जातात. सरकारी आदेशावरून किंवा शासन संस्थेच्या प्रभावाखाली उभ्या राहिलेल्या कलाकृतींपेक्षा यांचं स्वरूप निराळं दिसतं. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामकिंकरबैज यांची शांतीनिकेतन येथील शिल्पे. स्वातंत्र्यपूर्व काळात साधारण १९३५ नंतर त्यांनी आजूबाजूचा निसर्ग, त्यांचं अवकाश, तिथले संथाळ, त्यांचं जगणं, त्या जगण्याची लय आणि गती या शिल्पांमधून टिपली. सुजाता, महात्मा गांधी, मिल कॉल, संथाळ कुटुंब ही काही ठळक उदाहरणेया शिल्पांची भव्यता, निसर्गातील रूपांशी असलेले साम्य, त्या आकृतीतील जोमदारपणा, सिमेंट, वाळू, माती यांच्यातून घडवल्यामुळे तयार झालेला खडबडीत पृष्ठभाग आणि  त्यातून त्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी, कामगार, शेतकरी त्यांना प्राप्त होणारं एक वेगळं अस्तित्व या सर्वच गोष्टी कलाविश्वात एक मूलगामी बदल घडवणाऱ्या होत्या


शांतीनिकेतन
 


डॉ. भाऊ दाजी लाड सिटी म्युझियम, मुंबई



सार्वजनिक ठिकाणच्या कलेचा तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे कलासंग्रहालयामध्ये प्रदर्शित केली गेलेली आधुनिक आणि समकालीन कला. कलासंग्रहालये ही अशी जागा आहे जी व्यक्ती आणि शासनसंस्था यांचा मध्य साधते. तिथे लोकसहभागातून आणि लोकांमधून कलेची संकल्पनानिर्मिती आणि सार्वत्रिकीकरण व्हावे अशी अपेक्षा असते. आपल्याकडे बहुतेक कलासंग्रहालये ही शासनाच्या पाठबळावर चालणारी आहेत आणि त्याचबरोबर क्युरेटर तिथली प्रदर्शने, कथन-पद्धती, कलाकृतींची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी ठरवत असतातत्यामुळे त्यात लोकांचा खराखुरा वाटा कितपत असू शकतो हा प्रश्न आहेच. पण त्याच बरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की ही संग्रहालये कलेचं चर्चाविश्व घडवण्यात मोठी भूमिका निभावत असतात. १८७२ साली बांधून पूर्ण झालेलं मुंबईचं डॉ. भाऊदाजी लाड मुंबई सिटी म्युझियम या वासाहतिक काळात उभ्या राहिलेल्या कला संग्रहालयात मुख्यत्वे करून पुरातत्व अवशेष, नकाशे, चांदीची आणि तांब्याची भांडी, विविध सामाजिक समुहांचे पोशाख, कारागीर समाजांच्या मातीतील प्रतिकृती यांचा संग्रह आहे. १८५१ साली लंडनला भरविण्यात आलेल्या 'ग्रेट एक्झिबिशन' मध्ये ब्रिटनच्या जगभरातील वसाहतींमधल्या कारागिरीचे आणि हस्तकला-कौशल्याचे नमुने तिथे मांडण्यात आले होते. या नमुन्यांच्या प्रतिकृती तेव्हा तयार करण्यात आल्या आणि त्या हे संग्रहालय उभारण्यामागचं महत्वाचं कारण ठरल्या. आज आपण जर पाहिलं तर या वासाहातिक कला-नमुन्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला समकालीन कला प्रदर्शित केलेली दिसते. समकालीन कलाकार या संग्रहालयाचा इतिहास, मुंबईला व्यापारी बंदर म्हणून असलेला इतिहास, या संग्रहालयातील कलावस्तू यांचा विचार करून कलाकृतींची निर्मिती आणि प्रदर्शन करताना दिसतात. या संग्रहालयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे येणारा प्रेक्षक वर्ग. बाजूला असलेला राणीचा बाग आणि ब्रिटीश काळापासून असलेली या ठिकाणाची लोकप्रियता यामुळे समाजातील विविध स्तरातील लोक या संग्रहालयाला रोज भेट देतात. त्यामुळे वसाहतवादाचा इतिहास, समकालीन कला आणि व्यापक प्रेक्षक वर्ग यामुळे इथे घडणाऱ्या कलेच्या चर्चाविश्वाला वेगळाच आयाम प्राप्त होतो

या सगळ्यात एक समान धागा आहे तो म्हणजे ही कला दीर्घकाळ टिकणारी, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अर्थ प्राप्त होणारी आणि त्या त्या काळातील लोकांशी-समाजाशी अनेक बाजूंनी संवाद साधणारी ठरते. याउलट, समकालीन कलेत आज जी जन-कला म्हणून ओळखली जाते आणि व्यवहारात आणली जाते ती बहुतांशी अल्पकालिक असते. तिची काल आणि स्थळसापेक्षता हीच तिच्या निर्मितीमागची  महत्वाची प्रेरणा असते. १९६० नंतर उभ्या राहिलेल्या नागरी हक्कांच्या चळवळी आणि त्यात कलाकारांचा असलेला मोठ्या प्रमाणातील सहभाग यातून अमेरिकतील सार्वजनिक ठिकाणच्या कलेचे रूप हळूहळू बदलत गेले. कलेतून विविध सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय प्रश्नांना हात घालणे, त्याबद्दल जागृती करणे,  या कलाकृतींच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे, समकालीन कलेला अधिक समावेशक बनवणे अशा उद्देशांनी कलाकार जन-कलेकडे पाहत होतेत्यात  अजून एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कलावस्तूच्या क्रयवस्तूकरण होण्याच्या प्रक्रियेकडे चिकित्सक व टीकात्म दृष्टीने पहाणेएका अर्थी जन-कला ही त्या त्या ठिकाणच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात एक हस्तक्षेप ठरते. हा हस्तक्षेप करताना कलाकार विविध जनसमुदायांबरोबर काम करतात, त्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांचा या कलाकृती निर्माण करताना विचार करतात, आणि या समुदायातील लोकांच्या सहभागातून कलाकृती निर्माण करतात. आधुनिक समाजात आणि तेही लोकशाही पद्धतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शिल्या जाणाऱ्या कलेचा विचार कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे ज्याला कलाकार, वास्तुविशारद, नगर-रचनाकारक्युरेटर, कलाकारांचे गट आज भिडताना दिसतात. लोकांच्या सहयोगातून, त्या त्या ठिकाणचे संदर्भ लक्षात घेऊन आणि स्थळ-विशिष्टतेनुसार कलाकृती निर्माण करणं हा यामागचा हेतू असतो. भारतीय कलाविश्वाच्या क्षितिजावर याचा उदय बराच उशिराने झाला. आणि काही महानगरे सोडली तर समकालीन जन-कला आत्ता कुठे इतरत्र पोहोचतेय आणि रुजू पाहतेय




पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जून २०१५