जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – २)



गेल्या भागात म्हणल्याप्रमाणे बंगलुरू शहरात कलाकारांनी एकत्र येऊन 'कलेक्टिव्स' सुरू केले. याला सुरूवात झाली २००० नंतर. हे बंगलुरू मध्येच का घडलं? या शहराचं वेगळेपण काय आहे हे देखील पाहायला हवं. या शहराला कलाकारांनी असे उपक्रम सुरू करायचा इतिहास आहेच. त्याचबरोबर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे दिल्ली किंवा मुंबईसारखी या शहरात खाजगी कलादालनांची व्यवस्था फारशी इथं अस्तित्वात नसणं. त्याच बरोबर कलाशाळातून बाहेर पडल्यावर या नवोदित कलाकारांनी काय करायचं, कलाकरांच्या नेटवर्कचा भाग कसं बनायचं, आपली कला जाणकारांसमोर कुठे प्रदर्शित करायची अशा प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत हे कलेक्टिव्स अस्तित्वात आले. यातल्या कलाकारांनी आपला कलाव्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कलाप्रकार, कल्पक रचनात्मक मांडणी यांना स्विकारलं, प्रयोगातून जुन्या रचना मोडून काढून शहाराच्या कलापटलावर अनेक नव्या रचना उभारायला सुरूवात केली. साधारण २००० च्या दशकात समुहा, जागा, बार-वन, १ शांतीरोड यासारखे कलेक्टिव्स इथं उभे राहिले. इथल्या तरूण कलाकारांशी बोलताना लक्षात आलं की २००२ साली इथं 'खोज' या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यशाळेचा फार खोलवर परिणाम या कलाकारांच्या कलानिर्मिती प्रक्रियेवर घडून आला. आधी म्हणलं त्याप्रमाणे यांची संकल्पनात्म मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे केवळ कलाकारांनी केलं. हे प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारे ठरले. या प्रकल्पांकडे हे कलाकार त्यांच्या कलाव्यवहाराचा एक भाग म्हणून बघत होते, आहेत. पण ते कलाकार म्हणून स्वत्वाची व्याप्ती वाढवत इथं 'कलाकार' किंवा 'क्युरेटर' न राहाता फॅसिलिटेटर बनतात, ते कला प्रकल्पांची जोडणी करतात, लोकांना यात सहभागी होण्यास आणि त्यातून कलानिर्मिती करण्यास उद्युक्त करतात. इतर अनेक कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणून त्यातून हे कला-प्रकल्प आकाराला येतात आणि यशस्वीरित्या पार पाडतात. त्यामुळे त्यात कुठलीही पक्की संस्थात्मक रचना न आणता ते कला-प्रकल्पांसारखेच चालवले गेले. त्यातले काही मर्यादित कालावधीकरिता चालवले गेले तर काही दीर्घकालीन ठरले. सुरेश कुमार जी., अर्चना प्रसाद आणि शिवप्रसाद यांची संकल्पना असलेला 'समुहा' हा कला-प्रकल्प ४१४ दिवस सलग चालवला गेला, यात २३ सभासद कलाकारांना प्रत्येकी १७ दिवस कला निर्मिती आणि प्रदर्शनासाठी मिळाले. त्या सोबत, समकालीन कलेवर चर्चा, कार्यशाळा, मांडणीही आयोजित केल्या गेल्या. तसंच 'बार-वन' ही रेसिडन्सी २००७ पासून २०१२ पर्यंत चालू होती. यात भारतातील आणि बाहेरील देखील अनेक समकालीन कलाकार बंगलुरू मध्ये राहून काम करून गेले. बंगलुरू शहराचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आणि त्या कलाकारांचा कलाव्यवहार यातून या रेसिडन्सीज् आकाराला आल्या

'जागा'ची इमारत
 
मल्लेश्वरम कॉलिंग, अर्चना प्रसाद, जागा


या सगळ्याचे पडसाद बंगलुरू मधल्या कलाकारांच्या वैयक्तिक पातळीवर आणि कलाव्यवहारावर देखील पडलेले दिसतात. साधारण २००० च्या आसपास समुहाच्या सुरेश यांनी कलावस्तू बनवणं बंद केलं. सध्याच्या आर्थिक रचनेत आणि कलाबाजारात कलावस्तूचे विषयवस्तूकरण होण्याची प्रक्रिया सहजपणे घडते. त्याला विरोध म्हणून त्यांचं शिक्षण शिल्पकलेत झालं असलं तरी त्यांनी स्वतःचं शरीर माध्यम म्हणून वापरायला सुरूवात केली. सुरेश यांचा कला व्यवहार हा साइट स्पेसिफिक म्हणजे स्थल-निष्ठ आहे. सार्वजनिक अवकाशात वावरताना तिथले तपशील घेऊन त्यांना जोडून घेत ते त्यांचा परफॉर्मन्स आकाराला आणतात ज्याला ते 'लाइव आर्ट' अशी व्याख्या वापरतात. हा कुठल्याही प्रकारचा तालमी करून किंवा ठराविक कथन असलेला परफॉर्मन्स नसून त्या त्या ठिकाणच्या संदर्भातून आकाराला येणारा कलाप्रकार आहे. त्यामुळेच तो तात्कालिकही आहे आणि तो एक़ हस्तक्षेपही आहे. तो त्या ठराविक काल आणि अवकाशात उपलब्ध असतो, प्रेक्षकांना भिडतो, त्यांच्याशी संवाद साधतो. शहराचं अवकाश सुरेश यांच्यासाठी साइट बनते, त्यांच्या कला व्यवहाराला त्यामुळे अनेक पदर प्राप्त होतात. 'समुहा' हा प्रकल्पदेखील त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग म्हणूनच त्यांनी आकाराला आणला. हे नवोदित कलाकारांसाठी, एकमेकांचा कलाव्यवहार समजून घेत एकत्र येऊन कलेचं चर्चाविश्व घडवण्यासाठीचं एक व्यासपीठ बनला. 'समुहा'च्या काळातच कलाकारांच्या चर्चा आणि विचारविनिमयातून 'जागा'ची कल्पनाही पुढे आली. सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी कलासंस्था न उभारता कमी वजनाच्या पोलादी पट्ट्या जोडून तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत त्यांनी काम सुरू केले. याचा फायदा असा झाला की ही इमारत सहजपणे कुठेही उचलून घेऊन जाणं शक्य होतं. उपलब्ध असलेल्या जागेनुसार रचना करत नंतर त्यांनी 'जागा'ची बांधणी केली.