नाट्यावकाशातील समकालीनतेचे अन्वयार्थ




कलेच्या क्षेत्रात समकालीनतेचा विचार करताना समकालीन नाटक आणि तेही महाराष्ट्रात घडणारं समकालीन नाटक काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. समकालीनतेच्या बहुपेडी व्याख्येत चपखल बसणारं आणि समकालीनतेच्या प्रयोगशीलतेला आपलसं करणारं अलिकडच्या काळातलं लिखाण म्हणजे आशुतोष पोतदार यांची नाटके. त्यांच्या लिखाणातून ते त्यांच्या भवतालाला भिडतात, सामाजिक सांस्कृतिक भान बाळगत प्रत्ययकारी नाटकांच्या संहिता त्यांनी गेल्या दहा वर्षात मराठी नाटकाचे वाचक, अभ्यासक आणि प्रेक्षकांना दिल्या आहेत. 'वॉटरमार्कपब्लिकेशन'ने प्रकाशित केलेल्या आशुतोषपोतदार यांच्या चार नाटकांच्या दोन संग्रहात संहिता एकत्रितपणे वाचायला मिळाल्यामुळे त्यांच्यातले काही समांतर धागे व लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेतील चिंतनाचे विषय समजून घ्यायला तर मदत होतेच पण या संग्रहामुळे त्यांच्या लिखाणातील वैशिष्ट्यांचाही सापेक्षतेने विचार करता येतो. या लेखाच्या सुरूवातीला मला प्रमाणिकपणे नमूद करावंसं वाटतं की या दोन पुस्तकात छापलेल्या चार नाटकांपैकी केवळ 'F1/105' या एका नाटकाचे सादरीकरण मी प्रत्यक्षात पाहिले आहे आणि त्याबद्दल या आधी विस्ताराने इतरत्र लिहिलेदेखील आहे. या टिपणात प्रत्यक्ष सादरीकरण व त्याचे विवेचन हे मुद्दे यात विचारात न घेता मी या नाटकांचा मुख्यतः संहिता म्हणून विचार केला आहे. या पुस्तक द्वयीतला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संहितांसोबत दिलेली नाटकांची परीक्षणे. नाटकांच्या प्रयोगांनंतर निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झालेली ही टिपणे या पुस्तकात एकत्रितरित्या वाचकांना वाचायला मिळतात आणि नाटकांच्या संहितांकडे पाहायचा एक दृष्टिकोन मिळण्यास मदत होते.

कसबा सांगाव, कोल्हापूर, बंगलुरू आणि पुणे अशा लेखकाच्या व्यक्तिगत प्रवासातून घडणारं असलं तरी नाटकीय काळाच्या संदर्भात ते एकरेषीय असत नाही. अनुभव वा आठवणींच्या पातळीवर ते प्रतिमारूपात आपल्या समोर उभं राहातं. त्यातून तयार झालेल्या समकालीन संवेदना, त्यातले पदर व त्या पदरांच्या घड्या एकमेकांवर येत राहातात. या संहिता वाचताना एकीकडे फॉर्मच्या प्रयोगातून रूपबंधाचं भान दिसून येतं, तर त्याचबरोबर आशयातून संदर्भचौकट स्पष्ट होत जाते. ‘पुलाखालचा बोंबल्या मारूती' मधलं मुख्य पात्र माया म्हणते, “निर्मितीप्रक्रिया भवतालातूनच आकारते.” हे अर्थात आपल्याला माहिती असलं तरी ते खऱ्या अर्थानं आशुतोषच्या नाट्यलेखन प्रक्रियेत घडताना दिसतं. एका अभ्यासकाच्या वृत्तीतून घडणारं हे लिखाण कला, संस्कृती, इतिहास, भाषा, सामाजिक आणि राजकीय मीमांसा असे अनेकविध पदर ही त्यांच्या लिखाणाची बलस्थाने ठरतात. मेट्रोपॉलिटन शहरांतून राहाणाऱ्या, वावरणाऱ्या समाजाच्या निरनिराळ्या स्तरातल्या, समुदायाच्या माणसांचे जगणे, त्यातले तणाव व विसंगती, शोषणाच्या व्यवस्था, मोकळीकीच्या रचना, आणि या साऱ्यातून लागत जाणारे अन्वयार्थ हे या नाटकांची पार्श्वभूमी ठरतात. या संहिता व त्यातील पात्रे या मार्फत नाटककार जातीपासून, भाषेपर्यंत, विकासाच्या प्रकल्पापासून उपभोगवादापर्यंत, परंपरेपासून समकालीनतेपर्यंत अनेक विषयांचा उहापोह करतात.



आधुनिकतेच्या भव्यदिव्य उभारलेल्या देखाव्यात एेतिहासिक संदर्भ, ओळखी, मानवी संबंध यांच्या पलीकडे जाऊन सुपरहायवे किंवा मॉलसारख्या '-जागा' (नॉन-प्लेसेस, मार्क ओजे १९९५) आधुनिक, संपन्न जगण्याचा आणि विकासाचा आभास निर्माण करतात. प्रचंड वेगाने जाणाऱ्या गाड्यातून ना वाटेतले रस्ते कळतात, ना गावं ना त्यांच्या खाणाखुणा किंवा चकचकीत मॉलच्या बंदीस्त भिंतीत ना काळाचे भान राहाते ना भवतालात घडणाऱ्या घडामोडींचे. अशा '-जागा' या एकप्रकारचे तुटलेपण तयार करण्यात हातभार लावतात. कोणत्याही प्रकारच्या मानवी संवादारहित असा हा व्यवहार चालत राहू शकतो किंवा असला तरी तो तात्पुरत्या आणि 'कंत्राटी' पद्धतीचा असू शकतो. अशा प्रतीकांच्या वापरातून आत्ताच्या परिस्थितीत सतत आजूबाजूला जाणवणारं एक प्रकारचं विखुरलेपण मात्र केवळ संवादातून नव्हे तर नाटकीय रूपरचनेतून देखील सशक्तपणे उजागर केले गेलेले दिसते. 'पुलाखालचा बोंबल्या मारूती' मध्ये गावातले काही आणि बाहेरून आलेल्यांचा रेसिडन्सीमधला एकत्रितरित्या सहभाग, कला आणि भवतालाचं नातं, जागतिकीकरणानंतर बदलेली विकासाची मॉडेल्स, वेगाने वाढलेली शहरं, गावातल्या शेती आणि शिक्षणापासूनचे अनेक प्रश्न, शहरी मध्यमवर्गाच्या आणि ग्रामीण लोकांच्या बदलत्या आकांक्षा यावरच्या तपशीलवार संवादातून हे विखुरलेपण, तुटलेपणाच्या जाणिवा सजगपणे पुढे आणल्या आहेत. समकालीनता शहरी-ग्रामीण, स्त्री - पुरूष यासारख्या द्वैतांच्या पलीकडे जाते किंवा त्यांना कवेत घेते. गावात चालू असलेल्या आर्ट रेसिडेन्सीतल्या कलाकारांच्या अॅक्टीविटीज मधून परंपरेबद्दलची चर्चा इथे एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीतल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने घडते. त्यात गतकाळाला सतत सामोरं जाण्याची प्रक्रिया यांच्या लेखनात अधोरेखित होते. मात्र इतर संहितांपेक्षा अधिक चर्चात्मकतेकडे झुकते व थेटपणाने काही मुद्दे मांडते. शहरीकरणाची प्रक्रिया आणि बदलती गावकुसं याकडे ते लक्ष वेधते. पण गाव नावाच्या गोष्टीकडे एक्झॉटिक व रम्यपणाच्या कल्पनातून बघणं, टोकाच्या दृष्टीकोनातून शहर व गाव असं द्वैत मांडणं याकडे लेखक मात्र चिकित्सकपणे बघतात. त्या ध्रुवीकरणात न अडकता त्यातली गुंतागुंत गावात येऊ घातलेल्या 'सुपरहायवे'च्या आणि त्यामुळे 'विस्थापित' होणाऱ्या बोंबल्या मारूतीच्या प्रतीकातून हाताळतात. जातीच्या उतरंडीबद्दलची चर्चा नंतरच्या टप्प्यावर येते पण सुरूवातीला स्थानिक कलेच्या उल्लेखा दरम्यान मात्र केवळ परंपरा आणि समकालीन कलाविष्काराच्या पद्धती यांच्यातल्या तणावापुरते रेसिडन्सीतल्या कलाकारांचे संवाद घडतात. त्या दोन्हीमध्ये अस्तित्वात असलेले द्वंद्वात्मक नाते मात्र नाटकाच्या ओघात बाजूला पडते. येणाऱ्या बदलाचा स्वीकार करायचा की त्याला नकार द्यायचा हे पर्याय उरतात पण त्यातून वेगळ्या पर्यायाची, अधिक सजग, समतोल साधणाऱ्या बदलाच्या पर्यायासाठीचं अवकाश अशा प्रकारच्या लेखनातून तयार होण्याच्या शक्यता आपण आजमावू शकतो का, असा प्रश्न उरतो.

आज सार्वजनिक आणि खाजगी अवकाशातला फरक धुसर होत जात असताना त्याचं प्रत्यंतर आशुतोषच्या संहितातून प्रखरपणे समोर येते. नाटकीय अवकाशाचा विचार करता 'F1/105' आणि 'आनंदभोग मॉल' ही दोन्ही नाटके मुख्यतः घराच्या खाजगी अवकाशात पार पडतात. अर्थात, हे होत असताना सार्वजनिक अवकाशातल्या घटना, सामाजिक उतरंडी, जात आणि धर्माचं राजकारण या सारख्या आपल्याला जखडून टाकणाऱ्या अनेक गोष्टी या जोडप्यांच्या खाजगी अवकाशात प्रवेश करतात. त्यांचे नातेसंबंध, विश्वास, विचार, त्यांच्या जगण्याची तत्त्वं, सवयी साऱ्यांचीच यात घुसळण होत राहाते. पण ते माणसांच्या मनोवृत्ती किंवा मानसिक आंदोलने या परीघात फिरत राहात नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'आनंदभोग मॉल' हे त्यांचं रंगमंचीय अवकाशात उभं राहिलेलं पहिलं नाटक. यातलं आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं त्यांच्या जाती अस्मिता विसरू शकत नाही. त्या विसंवादी जगण्यात आणि भांडणात पुन्हा पुन्हा त्यांची जात डोकं वर काढत राहाते. ब्राह्मण आणि मराठा या समाजातल्या दोन उच्च जातीय समूहांचं प्रितिनिधित्व करणारी ही पात्रं आधुनिक समाजात वावरताना जात गळून पडावी लागते याची जाणीव असतानाही त्यांच्या परंपरांचे दाखले देत राहातात, जातीवरून एकमेकांची उणीदुणी काढत राहातात, कामाच्या ठिकाणच्या जातीय राजकारणाने अस्वस्थ होत आपापल्या जातीला घट्ट धरून ठेवू पाहातात. त्यांना मूल न होणं हे जातीभेदाच्या पालिकडंच सत्य दाखवणारं प्रतीक असू शकतं तसंच ते त्यांच्यातल्या खुंटलेल्या नवनिर्मितीच्या जाणिवा वा क्षमता यांचं प्रतीकही असू शकतं. या अस्थिरतेच्या वातावरणात दोघंही त्यांचं मनःस्वास्थ्य इतरत्र शोधत राहातात. बाहेरच्या जगात तीव्र होत जाणाऱ्या जातीय अस्मिता, त्यात येत जाणारी कट्टरता, आधुनिकतेनं पूर्ण न केलेली वचन, जागतिकीकरणाच्या रेट्यात उफाळून वर येणारे जातीचे आणि धार्मिक अस्मितांचे प्रश्न हे सगळं या जोडप्याच्या संवादातून आपल्या पुढे उभं राहातं. या सगळ्यापासून दूर जाताना ते संभ्रमित अवस्थेत जातात. यात स्वप्नाळूपणातून त्यांचा नव्या जगाच्या निर्मितीची नव्हे तर अधिक गुंतागुंतीच्या शोषण व्यवस्थेचं प्रतीक असलेल्या मॉलच्या बांधणीकडे ते वळतात. प्रस्थापित मध्यमवर्गीय जाणिवांना छेद देणारी, त्यातले ताणे बाणे दाखवणारी व त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची चिकित्सा करणारी ही संहिता समीक्षेच्या दृष्टीकोनातून उजवी ठरते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाषेचा. या चारही संहितांचं आकलन करताना नाटकीय अवकाशासह समकालीन भाषा समाजात काय प्रकारे काम करत असते, याचा विचार लेखकाने मांडलेला आहे. केवळ मौखिक वा संवादातील भाषा नाही तर दृश्य-अदृश्य आणि संहितांचे पदर उलगडत जाताना समजत जाणारी, आकाराला येणारी भाषा, या सर्व पातळीवर भाषेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आशुतोषच्या नाटकातील भाषा ही एका विशिष्ट भाषिक समुदायापुरती मर्यादित न राहाता ती अधिक सार्वत्रिक रूप धारण करते. मराठी नाटकांना सवयीच्या असलेल्या भाषेपेक्षा वेगळी, शहरी वापरातली, बहुभाषिक समुदायांची, आंतरजालीय समाजमाध्यमातून तयार होत गेलेली ही संमिश्र भाषा सहजतेने त्यांची पात्रं बोलतात. 'सिंधु, सुधाकर..’ या संहितेत अलंकारिक ते आजची बोलीभाषा अशी ही तफावत प्रकर्षाने जाणवते. शंभर वर्षाच्या फरकाने झालेले भाषिक अभिव्यक्तीचे बदल, फक्त भाषेपुरते मर्यादित न राहाता जीवनशैली आणि बदलत्या सामाजिक व नातेसंबंधांच्या बदलाला देखील अधोरेखित करतात. 'F1/105' या दीर्घांकात अनेक भाषांची सरमिसळ होत जाते. निरनिराळी पात्रं निरनिराळ्या भाषिक अस्मिता जपत त्यांच्या भवतालाशी जोडून घेतात. पण त्याचबरोबर, तीच भाषा त्या भवतालात निर्माण होणाऱ्या संघर्षालाही कारणीभूत ठरते. मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि अगदी तंजावरी मराठीचा वापरही यातली पात्रं सहजपणे करतात. मोठ्या शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात जगणाऱ्या या पात्रांची त्यांची भाषा ही ओळख ठरते. भाषेच्या वापरावरून त्यांची ओळख, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे स्वभाव हे नुसते ठरत जातात इतकंच नाही तर त्यातून काही वेळा आपल्या साचेबंद समजांना पुष्टीही मिळते. 'आनंदभोग मॉल' मधील भाषेचा बाज हा मिश्र आहे. शहाण्णवकुळी मराठा असलेला आणि गावाकडून शहरात आलेला पण बहुतेकवेळा प्रमाण मराठी भाषेत बोलणारा 'तो' अचानक मध्येच ग्रामीण ढंगातल्या मराठीकडे वळतो. क्वचित पण 'ती' देखील ग्रामीण ढंगात बोलून जाते. पेशाने डॉक्टर असलेला 'उच्चकुलीन' मराठा 'तो' आणि ब्राह्मण असलेली 'ती' असे दोघेही उच्चविद्याविभूषित असलेल्या त्यांच्या भाषेतला हा गोंधळ वाचकालाही जरासा गोंधळात टाकतो.




लेखकाचा नाटक, त्याचा इतिहास आणि नाटकांची अर्काईव्स यातला अभ्यास व संशोधन यातूनही लेखन प्रक्रिया आकाराला येताना दिसते. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर' ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला'चे समकालीन दृष्टीकोनातून मांडणी करते. शीर्षक सुचवते त्याप्रमाणे ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या शतकभरापूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकावर आधारित आहे. हे नाटक घडत 'एकच प्याला'वर बनत असलेल्या चित्रपटासाठी रंगपट तयार करणाऱ्या डिझाईन स्टुडिओमध्ये. गतकाळातली ही कथा आजच्या काळात घुसत जाते, काळाच्या सीमा उल्लंघत वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळ होत जाते. मूळ संहितेतल्या अतिरंजित घटना व संवाद आणि आज चालू असलेल्या डिझाईन स्टुडिओतल्या घटना या मागे पुढे येत राहातात, बेमालूमपणे एकमेकात मिसळत राहातात. सुरूवातीला वेगळी असलेली ही काळाची प्रतलं नाटकाच्या शेवटाकडे एकमेकातून वेगळी काढणं अवघड होत जातं. अर्थात, 'एकच प्याला'च्या संहितेतले संवाद केवळ स्मृतीरंजनादाखल पेरलेले नाहीत तर त्यातून आजच्या संदर्भातले मानवी नाती, सामाजिक उतरंडी, लिंगभाव सारखे मुद्दे ध्वनित होत राहातात. रमा आणि अॅपल कॉश्च्युम ठरवताना त्या काळाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात पण ते करताना त्या मूळ नाटकातल्या पात्रांमध्ये खोलवर रूतत जातात. इतकं की ते त्या पात्रांकडे सहानुभूतीने आणि कधी चिकित्सक दृष्टीकोनातून पाहात राहातात. काळाच्या खेळाच्या पलीकडे जाऊन समकालीनतेचे संभाषित साकारणारे लिंगभाव, बदलत्या लग्न व्यवस्थेवरचं भाष्य आणि लिंगभावातील प्रवाहीपणा हे मुद्दे त्या निमित्ताने चर्चिले जातात. सिंधु, सुधाकर यांच्या संवादातून, रघू आणि अॅपलच्या नातेसंबंधातून, गीताच्या स्वगतातून किंवा अॅपलच्या एकाचवेळी तळीराम व सिंधुच्या पात्रात शिरताना मॅनेक्विनबरोबरच्या प्रसंगातून हे मुद्दे विविध पद्धतीने अधोरेखित होताना दिसतात.

मराठीतील शोकांतिका मानली गेलेली ही संहिता मूळ नाटकाचा आजच्या संदर्भात अर्थ तर लावतेच पण त्या प्रकियेतून काही तथ्य आणि संदर्भ यांना एकत्र आणत वाचकांना एका परीने संहितेतील आजवर अस्पर्श असलेले मुद्दे व अर्थ यांना परिचित करते. F 1/105 आणि आनंदभोग मॉल मधली जातीय व भाषिक पार्श्वभूमीतून पात्रं असली तरी 'सिंधु, सुधाकर..’ मधली पात्रं ही अशी कोणतीही लेबलं घेऊन येत नाहीत. ती केवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्री पुरूष म्हणून आपल्या समोर येतात. त्यांच्या 'ओळखीच्या' गुंतागुंती या केवळ लिंगभावापुरत्या मर्यादित राहतात. कपडे बदलून ती पात्रं आपली 'ओळखी'ची अदलाबदल करतात, काळाच्या सीमा ओलांडतात. यात इतिहास, वारसा, परंपरा, वर्तमान अशा अनेक प्रकारे गुंतागुंतीच्या रचना व त्यातले बारकावे ही संहिता मांडते. या संहितेचं वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाटककार केंद्रीत रचनेतून बाहेर पडत त्या भोवतालच्या एेतिहासिक, सामाजिक घडामोडी, भाषा, सौंदर्यशास्त्रीय कल्पना यांची गुंफण यात केलेली दिसते. त्या पण ते करताना मूळ संहिता व त्याच्या बांधणीतून पुन्हा नाटककार केंद्रीत प्रक्रिया यात ते अडकते. गडकरींचे नाटक व त्याचे पुनर्वाचन या पठडीत विचार केल्याने इतर संदर्भांना गौण स्थान मिळते की काय असेही वाटते. शिवाय, त्यातल्या व्यापक जीवनदृष्टी लक्षात घेऊनही गडकरी यांचे मध्यमवर्गीय चौकटीतले नाटक का विचारात घ्यावेसे वाटते, हा मूलभूत प्रश्न उरतो.

हा प्रश्न विचारताना हे मात्र जरूर नमूद करायला हवे की निम्नजन किंवा 'इतर' आशुतोषच्या लेखनातील महत्त्वाचा अवकाश व्यापतात. ते 'बळी' स्वरूपात न येता सबल पात्रे म्हणून आपल्यासमोर येतात आणि भौतिक परिस्थितीने निर्माण केलेले त्यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध आणि सामाजिक आंतर्विरोध हाही सखोलपणे मांडला गेलेला दिसतो. ‘सिंधु, सुधाकर...’मधल्या शिवाच्या तोंडी वाक्य आहे: “इतिहास फक्त वर्तमानच फिरतो.” मला वाटतं, आशुतोष यांच्या लिखाणात इतिहास आणि परंपरेचं हे असं वर्तमानात फिरणं, गोते खाणं आणि वर्तमान संदर्भांना स्पष्टपणे समोर आणणं हे त्यांच्या सर्वच नाटकांतला एक समान धागा म्हणून पाहाता येतो. या प्रक्रियेत अनेक संदर्भ एकत्रित व विलगपणे गुंफलेले दिसतात. ही गुंफण उलगडण्यात वाचकांची कसोटी लागते तर कधी कधी ते केवळ उल्लेखापुरते येऊन जाते, असेही वाटते. त्यामुळेच आधुनिकतेच्या प्रक्रियेकडे चिकित्सक नजरेने पाहाताना अधिक खोलात जाऊन या वास्तवाचा शोध घेता येतो का, त्यातल्या अंतःप्रवाहांचा आवाका यातून खणून काढता येतो का आणि या साऱ्या विसंगतीच्या पोटात दडलेल्या द्वंद्वात्मकतेची जाणीव सखोलपणे उतरू शकते का, याचा विचार गरजेचा ठरतो. आणखी एक सामाईक गोष्ट जाणवते ती म्हणजे या संहितांचा शेवट. संहितांच्या शेवटाला ठराविक दिशा न देता ते खुले ठेवण्याची जोखीम आशुतोष पत्करतात. यातून वाचकांना कल्पकतेची व अर्थघटनाची मुभा मिळते पण लेखकाची भूमिका बऱ्याचदा अस्पष्ट अथवा संदिग्ध राहाते. जातीचा इतिहास, धर्माचा इतिहास, रंग, स्पर्श, भाषा यांचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर या पात्रांतून व नाट्य अवकाशातून उभा ठाकतो. पण हे करताना राजकीय – सामाजिक परिप्रेक्ष्यातून धूसर रेषेवर ही नाटके आणून सोडतात. याखेरीज, मराठी नाट्यक्षेत्रात मूलभूत कलात्मक लिखाणाची व त्यातील फॉर्ममधल्या प्रयोगशीलतेची वानवा असताना ही पुस्तक द्वयी आशुतोष पोतदार यांचे लिखाण मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात मोलाची भूमिका बजावते.


लेखक: आशुतोष पोतदार
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन, पुणे
आनंदभोग मॉल आणि पुलाखालचा बोंबल्या मारूती
पाने: ११२ | मूल्य: १६०
F1/105 आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर
पाने: १३६ | मूल्य: १६०

पूर्व प्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, -१५ एप्रिल, २०१८