शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग ३)



निराळ्या अवकाशात आणि सामाजिक संदर्भात काम करताना तुमच्या प्रक्रियेमध्ये कोणते बदल घडत जातात? गेल्या कोची बिनालेतल्या 'क्रिटीकल जंक्चर' या प्रदर्शनातल्या तुमच्या संदर्भात मी हे विचारतेय...

गेल्या कोची बिनालेच्या वेळी मी एक वर्तमानपत्र तयार केलं, 'डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'. मल्याळम सिनेमात हे वाक्य बऱ्याचदा वापरलं जातं. कम्युनिस्ट भावाला दुसरा भाऊ सुनावत राहतो की पोलंड मध्ये अमकं झालं, तमकं झालं, त्यावर कम्युनिस्ट असलेल्या भावाचं उत्तर असतं, ''डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'! तो आमचा अंतर्गत मामला आहे, या अर्थी. हे मी वापरायचं कारण म्हणजे 'क्रिटीकल जंक्चर' हे प्रदर्शन कोचीत पोलंडच्या सहयोगानं भरवलं होतं. रशिया भेटीनंतरचे टागोरांनी सहकार चळवळीबद्दल मांडलेले विचार किंवा कम्युनिस्ट सत्ता पोलंडमध्ये आता नसताना तिथे घडलेले बदल, भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीतून आलेली सांस्कृतिक मांडणी यावरचे जुने लेख, आत्ता पोलंडमध्ये चालू असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक हस्तक्षेपावरचे लेख यांचा त्याच्या समावेश केला होता. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्ष हरीकुमार गुप्ता या लोककलाकाराबरोबर काम करतोय. सामाजिक व्यंगावर गाणी आणि सादरीकरणातून टीका-टिप्पणी करण्याचा हा प्रकार. त्यांची स्वतःची अशी काही कलेविषयक भूमिका आहे, संकल्पना आहे. ती पण या पत्रिकेत छापली होती. कोचीत एका चहाच्या टपरीवर आम्ही दोघांनी त्याचं जाहीर वाचन केलं. पूर्वी कम्युनिस्ट चळवळ जोरात असताना कामगार रोज चहाच्या टपरीवर जमून असं वाचन आणि त्यावर चर्चा करायचे. कोचीत ते हळूहळू बंद पडलं. पण साधारणपणे १९७० पर्यंत त्यांच्या रोजच्या जगण्याचा तो अविभाज्य भागच होता. तोच फॉर्म आम्ही वापरायचं ठरवलं

 

त्यातल्या विडिओमधून सध्या चालू असलेल्या माझ्या प्रकल्पाची प्रक्रिया टिपलेली दिसते. हरीदा शांतिनिकेतनपासून ३० किमीवरच्या एका गावात राहतात. त्यांचं गाव, तिथल्या खाणी, लोकांचं जगणं हे सगळं त्यांच्या गाण्यात, कवितेत उतरताना दिसतं. इथली उपसलेली माती दूरच्या कारखान्यात जाते आणि तीच माती गावातले लोकं परत विकत घेतात. त्याच्या वस्तू बनवून तिथल्याच बाजारात विकतात. वस्तूंची ही देवाणघेवाणही त्या विडीओत दिसते. स्वतःचीच माती ते विकतातही आणि विकतही घेतात! हरीदांबरोबर मी निरनिराळ्या अवकाशात काम केलंय, त्यांचं गाव, तिथल्या जागा, कलकत्त्याची कला दालनं किंवा हा कोचीचा प्रकल्प. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून, चर्चेतून हे आकाराला येतं. त्याच बरोबर, 'समकालीन' या संकल्पनेकडे आपण कसं बघतो, तेही महत्वाचं ठरतं. समकालीन ही प्रवाही संकल्पना आहे. ती स्थानिक पातळीवरही आकार घेत असते आणि ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यपणे ज्याला आपण पारंपारिक म्हणतो त्यातही ही समकालीनता उमटताना दिसते. तसं बघायला गेलं तर ती 'साइट-स्पेसिफीक' असते. त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला मला आवडतं. कोची सारख्या पूर्णपणे अनोळखी ठिकाणी काम करताना दोघांसाठी ती प्रक्रिया घडत होती: सांस्कृतिक, भाषिक पातळीवरही.

अशा प्रकारे सहयोगातून कलाकृती उभ्या करताना नेमकं काय वेगळं घडत असतं? म्हणजे कलाकार म्हणून त्यावर नेमका कुणाचा हक्क असतो?

कलाकृतीवर कलाकाराचा हक्क तर असतो. कलाकारच त्या कलाकृतीचा कर्ता/कर्ती असते. त्याच्या पूर्णपणे पलिकडे जाऊन काहीतरी असेल अशा रोमॅंटिक विचारातही आपण अडकता कामा नये. माझं यात काहीच नाही, सगळं लोकांनीच केलंय असं काही नसतं. मुद्दा असा आहे की त्याची व्याप्ती तुम्ही कशी वाढवता, ज्यायोगे ती कलाकृती फक्त एका व्यक्तीची किंवा एकाच विचारातून आलेली न राहाता जास्त व्यापक बनेल. तुम्ही इतरांचे मुद्दे विचारात घेता तेव्हाच ती परिपूर्ण बनते. अशा कलाकृतींचा मुळात हेतूच तो आहे. पण कलाकृती निर्माण करताना सगळ्यांना सारखाच हक्क असेल, ती प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने हाताळली जाईल, ही कल्पना जरा युटोपिक आहे. त्यामुळे कलाकृती बनवताना तुम्ही अनेक मुद्दे आणि भूमिका विचारात घेतलेच पाहिजेत, त्या विचारांचं बहुपेडी असणं हाच त्याचा गाभा आहे.

खाजगी आणि सार्वजनिक यासारख्या कल्पनांचा कलाक्षेत्राच्या संदर्भात, खास करून जनकलेचा विचार करताना, तुम्ही कसा विचार करता? त्या कशा आकाराला आल्या?

हे मात्र मी शांतिनिकेतनमध्ये शिकलो. तिथल्या सामूहिक जगण्यातून आणि एकत्र येऊन केलेल्या कला उत्सवातून शिकत गेलो. कारण आपल्याकडे त्याचं काही प्रारूप तयार नाहीये किंवा इतिहासातले काही दाखले नाहीयेत. सार्वजनिक असणं याचं आपल्याकडचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रवादाचा उदय. ब्रिटीशविरोधातून तो त्या काळात आकाराला आला. शहराला भिडणारा असा सार्वजनिक अवकाशाविषयीचा विचार आणि मांडणी आपल्याकडे झाली नाहीये. त्यामुळे या ठराविक राष्ट्रवादाच्या चौकटी बाहेर जाऊन आपल्याला उदाहरण शोधावी लागतात. ते जरा अवघडच काम आहे. गेल्या २०-२५ वर्षात मात्र आपल्याला आजूबाजूला ते आकाराला येताना दिसायला लागलंय. १९९० नंतरच मुख्यतः कारण त्याआधी पब्लिक-प्रायवेट याचा विचार करणाऱ्या कलाकृती फारशा नव्हत्या. विवान सुंदरमचं कलकत्त्यातलं इन्स्टलेशन, 'खोज'चे प्रकल्प किंवा सफदरच्या हत्येनंतर दिल्लीत सुरू झालेलं 'सहमत'चं काम, एवढंच. त्याशिवाय, नाटकाच्या क्षेत्रात काहीतरी केलं जात होतं पण दृश्यकलेच्या बाबतीत मात्र फारसं घडलेलं दिसत नाही. पण त्याआधी पाहायचं झालं तर १९६० मधल्या सोमनाथ होर यांच्या 'तिभागा डायरी' आहेत. त्यांनी तिभागा चळवळीच्या काळात गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, तिथल्या लोकांच्या वेदना समजून घेतल्या. त्यातून या डायरी तयार झाल्या. किंवा दुसऱ्या बाजूला नव-सिनेमा आला. त्यातही कॅमेरा प्रत्यक्ष गावात, लोकांपर्यंत पोहोचला, खऱ्या लोकेशनवर गेला. कलेच्या बाबतीत 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' या कल्पनांची एेतिहासिक पार्श्वभूमी बघताना याचाही विचार केला पाहिजे. १९६० ते ८० मध्ये देशभर अशा प्रकारचे प्रयोग चालू होते. कलाप्रकल्प म्हणून नव्हे तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातले उपक्रम आणि संवाद या पातळीवर ते काम चालू होतं. पण त्यात बरीच सर्जनशील मंडळी काम करतच होती. फक्त सामाजिक विकासाचा मुद्दा नव्हता तर जगणं, व्यवहाराच्या पद्धती यातूनही ते घडत होतं. पण त्या इतिहासाचं दस्तेवजीकरण झालं नाही. त्याविषयी लिहिलं गेलं नाही, त्यामुळे त्यातलं आज फारच थोडं आपल्यापर्यंत पोहोचतं. आसाममध्ये एकानी जंगल उभं केलं. अशी उदाहरण खूप आहेत. त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे नाहीतर मग कलाकारांना सतत 'या प्रकारच्या कला व्यवहाराची सुरूवात कुठून झाली?' या प्रश्नाला सतत सामोरं जावं लागतं. शांतिनिकेतन मधली भित्तीचित्रं आणि रामकिंकर यांची शिल्पं याच्या पलिकडे अकादमीक क्षेत्रात त्याचं उत्तर मिळत नाही


 

मला कलाभवनमध्ये पण 'तू चित्रं का काढत नाहीस?' या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. माझं उत्तर एवढंच आहे की मी कॅनव्हासवर चित्रं काढत नाही. इतर मटेरिअल, प्रक्रिया, अनुभव यातून ते आकाराला येतं. तो संघर्ष कायम चालू असतो. पण थोडं पुढं-मागं करत त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मला कला शिक्षक म्हणून दिलेल्या चौकटी काम करावं लागतं. मी फक्त त्याची व्याप्ती वाढवायचा प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं झालं तर मला 'लाईफ स्टडी' शिकवावं लागतं. पण मग तिथंच मी 'शॅडो कास्टींग'चा प्रयोग केला. असे स्टडी करताना मग मी त्यांना सामाजिक अवकाशात घेऊन जातो. तिथले अनुभव, त्या जागेचा इतिहास, निरनिराळी मटेरिअल हे सगळं तुमच्या चित्रात कसं आणता येईल आणि ते समजून घेऊन चित्र कसं तयार होईल, असा विचार मी विद्यार्थ्यांना करायला लावतो. आता केवळ माध्यम आणि घाट याच्या पलिकडे जाऊन बरेचजण विचार करायला लागलेत असं दिसतंय. अर्थात, या सगळ्याबद्दल आमच्या सतत वाद आणि चर्चा होतच असतात.

या सारख्या प्रकल्पांवर काम करताना दोन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, एक म्हणजे आर्थिक पाठबळ आणि दुसरं म्हणजे त्यांचं दस्तेवजीकरण करणं. त्या संदर्भात काय सांगू शकाल?

आत्ता मी ज्या प्रकल्पावर काम करतोय त्याला 'आयएफए'ने थोडी मदत केली आहे. मी शक्यतो फंडिंग एजन्सीकडून पैसे घेऊन काम करत नाही कारण मग फक्त पैसे मिळवायला हा काम करतोय अशी कलाकाराची प्रतिमा बनते. त्यापेक्षा मला लोकांबरोबर काम करण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात रस आहे. यात मी एका नाटकाच्या ग्रुपबरोबर काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारे लॅंडस्केप कसं दाखवता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. बीरभूममधल्या वेगवेगळ्या भागात आम्ही मिटींग घेतोय. तिथली जमीन, निसर्ग आणि एकूण राहाणीमान समजावून घेतोय. यात विविध क्षेत्रातले लोक एकत्र आले आहेत. ते त्यांच्या कामातून आपापल्या भागातल्या लॅंडस्केपला कसं भिडतात, ते पाहायचा प्रयत्न आहे. ते एकत्र येऊन हे धागे एकत्र आणू शकतात का आणि या जमिनीची, अवकाशाची काही वेगळी कल्पना करू शकतात का, ते आम्हाला पाहायचं आहे. जमीन ही केवळ मालकी हक्कापुरती मर्यादित न राहाता अशा इतर काय शक्यता असू शकतात ते पाहाणं महत्त्वाचं आहे. त्या त्या भागातले लोक-कलाकार, कारागीरांना आम्ही बोलवायचं ठरवलं. ते त्यांची रोजंदारी सोडून येणार तर त्यांना किमान जाण्या-येण्याचा खर्च तरी द्यायला हवा म्हणून मग मी 'आयएफए'ला विचारलं. त्यांनी आर्थिक मदत करायची तयारी दाखवली. ते पैसे संशोधनाकरता असले तरी ही प्रक्रिया तेवढ्यापुरती मर्यादित नाही. ती मुख्यतः संवादी प्रक्रिया आहे. आम्ही सुरूवात टागोरांकडून प्रेरणा घेऊन सहा ऋतू, सहा गावं यापासून केली. नंतर मात्र त्याची दिशा बदलली. भौगोलिकदृष्ट्या एकदम वेगळ्या असलेल्या सहा जागा आम्ही निवडल्या. लोकांना भेटलो. त्यांच्या ओळखीतून अजून काही लोक जोडले गेले. त्यांच्या बरोबरच्या गप्पांमधून काय काय करता येईल ते ठरवलं. यासाठी सहा शामियाने उभे केले. त्या त्या ठिकाणी त्यात कार्यक्रम आयोजित केले. एक दिवसभर एकत्र जमून अनेक गोष्टी समजून घेतल्या, चर्चा केली. त्याचा विडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग आहे.

यात एक़ गोष्ट नक्की की आम्ही कुठलाही परफॉर्मन्स करत नाही. आपापल्या कला व्यवहाराचं चिकित्सक आकलन करणं हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येक जण आपापल्या कला प्रकाराचे बारकावे सगळ्यांसमोर ठेवतो आणि मग त्यावर चर्चा होते. यात शेतकरी पण आहेत, ते शेतीही करतात आणि लोककलाकार आहेत, ते गाणीही गातात. यात शेती तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक इतिहासकार आहेत त्यामुळे जमिनीच्या प्रश्नांवर पण खूप चर्चा होते. शेतीच्या प्रश्नावर चर्चा होते. पण त्या भागातून आलेल्या लोककलाप्रकारांवरही गप्पा होतात. त्यात नेमके काय आणि कसे बदल घडता आहेत, ते हे कलाकार मांडतात. त्या शामियानाचं आणि त्यावर काढलेलं डिजाईन हा पण एक चर्चेचा मुद्दा असतो. त्या डिजाईनमध्ये तिथल्या लोकसंख्येची माहिती पुरवणारे आलेखही काढले जातात. एके ठिकाणी या शामियान्याच्या कापडावर काही महिलांनी त्यांची गाणी लिहिली, भरतकाम केलं. शेवटच्या वेळी सगळीकडची अशी आकडेवारी घेऊन त्याची शामियानाच्या कापडावर चित्ररूपात मांडणी केली. त्याला साधारण कार्यशाळेचं स्वरूप येतं त्यामुळे येऊन फक्त सादरीकरण करून गेले असं होतं नाही. लोकांचा पूर्णवेळ सहभाग यात अपेक्षित आहे. वसंत ऋतूमध्ये एका आदिवासी खेड्यातल्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला. तिथल्या स्थानिक गोष्टी आणि आधुनिकता यांचा मेळ साधत टागोरांच्या विचारांतून ही शाळा चालवली जाते. ते गुंतागुंतीचे संबंध काय आहेत हेही आम्हाला समजून घ्यायचं होतं. संथाळ नृत्य तिथे सादर केलं गेलं पण त्यात आधुनिक काळात नेमके कोणते बदल घडले यावरही चर्चा केली गेली.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे कुणीही 'प्रेक्षक' नसतं. सगळेजण या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. हे सहा कार्यक्रम झाल्यावर त्यांना एकत्र कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. पण आम्ही त्या त्या ठिकाणी हे अनुभव प्रदर्शित करायचा विचार करतो आहोत, तसंच इतर ठिकाणीही ते घेऊन जायचा विचार करतो आहोत. पण ते बाहेर घेऊन जाताना त्यामागचं आमचं धोरण काय असेल ते नीट ठरवावं लागेल. ते तुम्ही इतरत्र कसं घेऊन जाता, त्याची मांडणी कशी करता, त्यातून काय पद्धतीचे संबंध प्रस्थापित होतात ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्या भोवती सजावट न करता ते जसंच्या तसं लोकांसमोर मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तो दस्तेवज अपूर्ण असू शकतो, त्यात त्रुटी असू शकतात, ती चालू प्रक्रिया म्हणून लोकांसमोर येऊ शकते. त्या प्रकल्पाचं बहुपेडी असणं हे दस्तेवजीकरणाच्या प्रक्रियेत टिकवता आलं पाहिजे. विविध पद्धतीने ते करता येऊ शकत. विडिओ रेकॉर्डिंग, रेखाटनं, नोंदी ठेवणं, डायरी, फोटो, इत्यादि. अशा प्रकल्पांमध्ये त्यांची तात्कालिकताही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे विडिओ रेकॉर्डिंगमध्ये अगदी पाच वेगवेगळ्या आवृत्ती पण असूच शकतात! त्यातून एखादं नवीन कथनही तयार होऊ शकतं. अर्थात, ती वेगळीच कलाकृती ठरेल. ती या प्रक्रियेला पुरेसा न्याय देऊ शकत नाही. मला असं वाटतं की त्या दस्तेवजाचा अस्सलपणा जपणं मोलाचं आहे. कारण माझ्यासाठी फॉर्मपेक्षा प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे.


मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, मार्च २०१७