सामाजिकतेला भिडणारा कलाकार: तुषार जोग



जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यावर म्हणजे साधारण नव्वदोत्तरी पिढी दृककलॆच्या संदर्भात काही विशिष्ट भूमिका बजावताना दिसते का? या दशकात कलाकार म्हणून तुमची जडण-घडण कशी झाली?

१९९० नंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. युनायटेड कलर्स अॉफ बेनेटनची चकचकीत जाहिरात मल्टिकल्चरलिझमचा बुरखा पांघरून आली असली तरी त्यामागचं शोषण, कामगारांची पिळवणूक, स्थानिक कापडउद्योगांवर आलेली गदा हे सगळे मुद्दे नजरेआड करता येण्यासारखे नव्हते. त्या काळात जाहिरातींनी बाजारपेठेचा आणि लोकांच्या मनाचा कब्जा घेतला. सतत त्या प्रतिमा आपल्यावर आदळू लागल्या, टीव्ही, होर्डिंग, जाहिराती, पेपर...उदारीकरणानी सगळ्यांनाच उपभोक्ता बनवून टाकलं मग तो कुठल्याही आर्थिक स्तरातला का असेना. गावातल्या तरूणांना कोका कोलाच्या जाहिरातीत आणून राष्ट्रवादातून याला होणारा विरोधही हाणून पाडला. सतत दिसणाऱ्या, उपलब्ध असणाऱ्या या प्रतिमा लोकांच्या जीवनाचा भाग बनल्या, नाही त्यावर सत्ता गाजवू लागल्या.

याउलट, ललितकला (चित्र, शिल्प, ) कायमच लोकांपासून अंतर राखून राहिल्या. त्या लोकांसाठी दुर्बोध तर होत्याच पण एका ठराविक उच्चभ्रू लोकांपर्यंतच मर्यादितही राहिल्या. पॉप्युलर प्रतिमा जरी कलाकारांनी वापरल्या तरी त्या त्यांच्या मूळ संदर्भापासून दुरावतात, एक्झॉटिक बनतात. सौंदर्याचं राजकियीकरणाला एक मर्यादा असते, ती मर्यादा कलाकारच स्वतःवर घालून घेतात. जागतिक स्तरावर एका ठराविक पद्धतीचंच काम दाखवलं आणि वाखाणलं जातं.

अोपन सर्कलच्या माध्यमातून यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यात कलाकार, कला-विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते यांना एकत्र आणून कार्यशाळा, अभ्यास शिबिरे, प्रदर्शनं भरवली. यातून संवाद सुरू व्हावा हा उद्देश होता. कलाकार म्हणून लोकांशी, आयुष्यातल्या प्रत्यक्ष गोष्टींशी कसं जोडून घेता येईल त्याचाहा शोध होता. त्यात पुढे काही कला-हस्तक्षेप केले. नवीन आर्थिक धोरण, कापडगिरण्या बंद पडणं, धर्मांधता, ध्रुवीकरण, या सगळ्याला हात घातला. गुजरात दंगलीनंतर 'रिक्लेम आवर फ्रीडम' ही मोहिमही सार्वजनिक ठिकाणी राबवली. यातून कलाकारांना या मुद्दयांवर लोकाशी संवाद साधता आला.

या सगळयातून माझी राजकीय समज तयार झाली आणि त्याव विचारातून मी कला निर्मिती सुरू ठेवली. या अनुभवातून हे जाणवलं की राजकारणाचं सौंदर्य बदलणं, निश्चित करणं गरजेचं आहे...



कला निर्मिती करतानाची तुमची प्रकिया काय असते, ते सांगू शकाल का? विविध माध्यमातून काम करताना तुमची भूमिका काय असतॆ, तॆ सांगाल काय?

माझा कलाव्यवहार सीमांतीकरण, शहरीकरणामुळे झालेले विस्थापन किंवा शासनाने आणलेली 'विकासा'ची प्रारूपे या सारख्या मुद्द्यांना हात घालताना त्यातील स्थानिक आणि समकालीन राजकारणाचा शोध घेऊ पाहातो. माझं काम यातला असमतोल विकास आणि त्यामुळे उद्भवणारी सामाजिक-सांस्कृतिक बिघाड याला भिडण्याचा प्रयत्न करते. यातून ते चळवळ, जन-कला, विद्रोह आणि हस्तक्षेप यासारखे प्रांत व्यापू पाहाते. कला हे माझ्यासाठी सामाजिक राजकीय बदलाचे माध्यम आहे त्यामुळे त्याकरिता आवश्यक तो संवाद साधणे, चर्चा करणे किंवा त्या मुद्द्याला दृश्यमानता मिळवून देणं हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. जरी मला त्यातली तरलता, काव्यात्मकता भावत असली तरी माध्यमाला इथं दुय्यम स्थान मिळते.


कलेचा बाजार, कलादालनातील कलाव्यवहार आणि सामाजिक भान असलॆली कला निर्मिती यातला समन्वय आणि समतॊल कसा राखता? तॆ एकमॆकाला पूरक असतात की परस्परविरॊधी भूमिका बजावतात, तुम्हाला काय वाटतॆ?

आपली भूक किती आहे ते आपण ठरवायचं...आपली भूक जास्त असली तर आपल्याला मार्केटच्या हातात हात घालून तिला मैत्रीण बनवलं पाहिजे, अर्थात तिच्या गरजा पुरवल्या पाहिजेत... मग कामाच्या 'एडिशन्स' होतात, 'असिस्टंट्स'ची फौज जमवावी लागते... आणि स्मॉल, मिडियम, लार्ज आणि कधी कधी एक्सएक्सएक्सएलच्या आकारात 'उत्पादन' करावं लागतं.

गॅलरीज गरजेच्या आहेत कारण कलाकाराला पण जगण्यासाठी पैसा लागतो, ते अगदी साहाजिक आहे. पण आत्ता मुद्दा असा आहे की सध्या जे कलाकार आणि गॅलरी यांचं नातं आहे ते असमतोलाचं आहे. पण आवश्यक त्या कलाप्रकारांना पाठिंबा देताना, त्यांची जोपासना करताना किंवा त्या कलाकृती आणि ते कलाकार टिकून राहावेत, वृद्धिंगत व्हावेत याकरिता त्यांची बाजारपेठ 'तयार करताना' दिसत नाहीत. याउलट, ज्यांच्या कामाला बाजारात भाव आहे किंवा जे कलाकार बाजारपेठ लक्षात घेऊनच काम करतात अशाच कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शनं मांडली जातात.

अर्थात, गॅलरीज काही धर्मादाय संस्था नाहीत, शेवटी तो व्यवसायच आहे... सकस सांस्कृतिक क्षेत्र उभं करणं, त्याची जोपासना करण्याकरिता योगदान देणं, ते जतन करणं यासाठी लागणारी तळमळ त्यांच्याकडे असावी लागते. पण अलिकडच्या काळात या गॅलरीज आणि प्रॉपर्टी डिलर्स यांच्या काही फारसा फरक उरलेला नाहीये, दोघंही प्रति चौरस फुटाच्या दरानी गोष्टींची खरेदी-विक्री करत असतात

 


मुंबई इथं भरलॆल्या वर्ल्ड सॊशल फॊरमच्या सांस्कृतिक समिती मध्यॆ तुम्ही महत्वाची भूमिका बजावलीत, तॊ उपक्रम नक्की काय हॊता? मुंबईच्या सार्वजनिक अवकाशाशी त्यातून कलाकार कसॆ भिडलॆ? त्याची फलनिष्पत्ती काय, असॆ तुम्हाला वाटतॆ?

मी आणि मधुश्री दत्त २००४ मध्ये मुंबईत भरलेल्या डब्ल्यूएसएफच्या सांस्कृतिक समितीचे निमंत्रक होतो. जवळपास २५०० कलाकारांचा समावेश यात आम्ही केला होता. राजकीय अंगानी कला आणि संस्कृती या दोन्हीकडे पाहिलं जावं, कलेमार्फत आजच्या चर्चाविश्वात हस्तक्षेप करता यावा आणि सांस्कृतिक व्यवहार हा राजकीय एकत्रिकरणाचा एक पाया ठरावा या उद्देशानं याची योजना आखली होती. यात विद्रोही कलेचा तर समावेश होताच पण त्याचबरोबर केवळ संकल्पनात्मक पातळीवर नव्हे तर सांस्कृतिक व्यवहाराच्या पातळीवर कलाकृतींच्या राजकीय क्षमता आेळखल्या जातील अशी भावनिष्ठा निर्माण करणं हाही होता. कला आणि लोक यांच्यातील दरी कमी व्हावी, राजकीय कला लोकसहभागातून घडवता यावी आणि त्याकरिता अवकाश तयार करता यावं असंही आम्हाला वाटतं होतं. यात मग प्रदर्शनाच्या जागा निवडणं, त्यांच्या विषयाची निवड, कार्यक्रम आखणं, व्यासपीठं उभी करणं हे सगळंच आम्ही केलं. यात सुधीर पटवर्धन, नवजोत अल्ताफ, नलिनी मलानी, शकुंतला कुलकर्णी यासारखे स्थानिक कलाकार आणि विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत लोकलवर चित्रं काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 'होम विथ नो वॉल्स' या विषयावर जगभरातून कलाकारांनी 'कॉपी लेफ्ट' कलाकृतींच्या प्रतिमा पाठवल्या, त्या विविध रूपांत प्रदर्शित करण्यात आल्या. त्याचबरोबर, केबिन बॅगेज, बगदाद!बगदाद!, बॉम्बे/बम्बई/मुंबई यासारखी प्रदर्शनं पण आयोजित केली होती.

आम्ही ज्या उद्देशानी हा घाट घातला होता त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलो. कार्यक्रमाची भव्यता, त्यांची वैविध्यता, मांडणी, त्यातून उभं राहिलेलं वातावरण, राजकीय प्रतिनिधित्व या सगळ्यातूनच डब्ल्यूएसएफला एका वेगळ्याच उंचीवर आम्ही पोहोचवू शकलो. त्यानंतर, २००५ मध्ये पोर्तो अल्जिर, ब्राझिल आणि २००७ च्या नेरोबीमधल्या डब्ल्यूएसएफमध्येही माझा सहभाग होता. तिथे मी एक आंतरराष्टट्रीय कलाकारांचा कॅंप क्युरेट केला होता, त्या कलाकारांनी उद्घाटनाच्या रॅलीसाठी कलाकृती बनवल्या आणि नंतर मी स्थानिक कलाकारांबरोबर देखील काम केलं.


'लॉस्ट अॅंड फाऊंड वॅल्यूज(?) अॉफ डेमॉक्रसी' या मुंबईच्या उपनगरी रॆल्वॆ आणि छत्रपती शिवाजी स्थानकावर सादर कॆलॆला कला प्रकल्प काय हॊता
 
कळत नकळत अनेक गोष्टी आपण गमावत जातो पुढे जाताना. माणूस म्हणून आपण काहीतरी गमावतो का? आपण ते गमवतो की नसतंच ते कधी आपल्याकडे? कुणाला स्वातंत्र्य गावलंय का? कुणाला समता हाताशी लागलीय का? आणि न्याय? आणि प्रतिनिधित्व कुठाय?

यात मी विद्यार्थी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या शेल्टर होममधल्या मुलांबरोबर काम केलं. सीएसटीला घेतलेल्या दोन दिवसाच्या कार्यशाळेत ही मुलं सहभागी झाली होती. त्यात त्यांची या शहराबद्दलची काय कल्पना आहे, ते कसं असावं असं त्यांना वाटतं किंवा त्यांच्या आजबाजूला, आयुष्यात कसली उणीव आहे याची रेखाटनं त्यांनी स्क्रॅप बुकमध्ये केली. त्यांनी बनवलेली चित्र, कोलाजेस यातून ते निरागसपणे स्वातंत्र्य, समता, प्रतिनिधित्व आणि न्याय याविषयी प्रश्न मांडत होते. यातल्या काही वह्यांमध्ये रिकाम्या पानांवर मी (युनिसेलने) काही चित्रांची भर घातली. हा हस्तक्षेप आणि इतरांनी बनवलेली चित्रं यामुळे त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला. त्यावर संपर्काचे काहीतरी नंबर खरडून त्या वस्तू लोकलच्या डब्यांमध्ये आम्ही सोडल्या किंवा 'हरवल्या'. त्या प्रवाशांना 'सापडल्या' आणि काहींनी त्या परत केल्या, त्यांचं प्रदर्शन सीएसटी स्टेशनवर भरवलं आणि ते सगळ्यांसाठी खुलं होतं.




सौंदर्यशास्त्र आणि राजकीय जाणिवा यांची सांगड तुमच्या कला व्यवहारातून कशी घालता? या संदर्भात मोटरसाइकलवरून कॆलॆला मुंबई तॆ चीन (वाया सरदार सरॊवर आणि थ्री गॉर्जॆस) हा प्रवास/परफॉर्मन्स या बद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडॆल...

२००० मध्ये मी कलाकृती तयार करणं मी बंद केलं, ते जवळपास दोन वर्षं. माझ्या मास्टर्स नंतरचं म्हणजे जवळपास दहा वर्षाचं काम मी नष्ट केलं, अगदी त्याच्या डॉक्युमेंटेशन सहित. कला ही स्वांतसुखाय आहे आणि तिचा समाजाला काहीच उपयोग नाही, तिची काही भूमिका नाही असं मला वाटायला लागलं. वेगवेगळ्या संघटना, ट्रेड युनियन यात मी सहभागी व्हायला लागलो. मोर्चे, सभांना जायचो, बॅनर, पोस्टर्स किंवा पत्रक बनवून द्यायचो. यातून समजात काहीतरी बदल घडवून आणण्यात आपण वाटा उचलू शकू असं वाटत होतं. पण त्यातही एक प्रकारची अस्वस्थता यायला लागली. मी जे करतोय ते पुरेसं नव्हतं, मोर्चात फक्त घोषणाबाजी करून काहीच साधलं जात नव्हतं...म्हणजे मी निषेध मोर्च्यांना कमी लेखतोय असं नाही पण निषेधाचा तो फॉर्म मला पुरेसा योग्य वाटत नव्हता.

...म्हणजे तुम्ही चर्चगेट स्टेशनच्या बाहेर बॅनर किंवा फलक धरून उभे असता पण तिथले लोक मात्र ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असतात, त्यांना घरी पोचायची घाई असते...तुम्ही वाटलेली पत्रकं कुठेतरी रस्त्याच्या कडेला, प्लॅटफॉर्मवर पडलेली असतात... लोक तुम्ही काय म्हणताय, का जीव खाऊन ओरडताय ते साधं एेकायला, वाचायला, बघायलाही तयार नसतात. परत कुणीतरी, काहीतरी इथं येऊन बोंबा मारतंय, कसल्यातरी मागण्या करतंय, त्याबद्दल कोणाला काय पडलंय...पण या गलक्यामुळे त्यांची ५.१७ ची विरार लोकल चुकणार म्हणून ते वैतागलेले असतात.

फॉर्म चुकत असला तरीपण ते मुद्दे मात्र महत्वाचे होते, आहेत. मला ते इतरांपर्यंत पोचवायचे होते, त्यावर चर्चा घडवून आणायची होती. मला सगळ्याची उत्तरं माहिती नसतील पण मला प्रश्न पडत होते आणि ते विचारणं फार गरजेचं होतं. आणि मला वाटलं हे कलेच्या माध्यमातून साधता येईल कारण मग तिथे बघणारे लोक तर असतील... ती दोन वर्षं मी ओपन सर्कल बरोबर काम करतच होतो. पण आमचा कार्यक्रम हा मुख्यत्वे कला रस्ते, पार्किंग, होर्डिंग्स अशा ठिकाणी आणून राजकारण आणि सौंदर्यशास्त्राची सांगड घालणं हा होता. २००२ पासून मी ज्या कलाकृती बनवल्या त्यांचा उद्देश राजकारणाचे सौंदर्यीकरण आणि सौंदर्यशास्त्राचं राजकियीकरण करणं हा होता. वॉल्टर बेंजामिन त्यांच्या 'द वर्क अॉफ आर्ट इन द एज अॉफ मेकॅनिकल रीप्रॉडक्शन' (१९३५) या लेखात म्हणतात त्या अर्थी नव्हे, तर बोरिस ग्रॉइस त्यांच्या 'आॅन आर्ट अॅक्टिविजम' (२०१४) या लेखात मांडणी करतात त्या अर्थी राजकारणाचं सौंदर्यशास्त्र बदलणं - सौंदर्यशास्त्राचा निष्फळपणा आणि त्याचबरोबर राजकियीकरण - म्हणजे सौंदर्यशास्त्राचा वापर राजकीय ध्येयासाठी करणं, एक राजकीय आरेखन म्हणून त्याकडे पाहाणं.

त्यानंतरच्या माझ्या कलाकृती या सौंदर्यशास्त्राच्या सापेक्षतेतून निर्माण होत गेल्या, यात एखाद्या मुद्द्याच्या किंवा विषयाच्या प्रतिरूपणापेक्षा सामाजिक संबंध, देवघेव हे कलानिर्मितीचा पाया बनत गेले. यातून कधीकधी मग त्याची परिणिती लोकसहभागातून केल्या गेलेल्या 'लॉस्ट अॅंड फाऊंड वॅल्यूज(?) अॉफ डेमॉक्रसी' यासारख्या प्रकल्पांमध्ये झाली जिथे लोकांबरोबर काम करून मी कलाकृती बनवल्या. याचसारखे इतर प्रकल्प म्हणजे हायपोहायड्रो-हायपरहायराइज, लॅमेंट फॉर स्पॅरोज, विंडो क्लिनर्स प्रोजेक्ड इन लंडन, आर यू अवेक, वॉशिंग डर्टी लिनन, इत्यादि.

२००१ मध्ये मी नर्मदा बचाव आंदोलनाच्या संपर्कात आलो आणि तेव्हापासून मी या जनचळवळीचा कट्टर समर्थक आहे. 'राइडिंग रोसिनान्ते - बॉम्बे टू शांघाई वाया सरदार सरोवर अॅंड द थ्री गॉर्जेस' हा प्रकल्प एक परफॉर्मन्स किंवा कृती होती. त्याचा उद्देश होता नर्मदेवरची सरदार सरोवर, ओमकारेश्वर आणि महेश्वर धरणं, तिबेटमधली ग्यानत्से आणि यान्द्रोक तलाव, आणि चीनमधलं थ्री गॉर्जेस धरण यामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटणं...प्रत्यक्ष परिस्थती पाहून त्याबद्दल त्या संपूर्ण कालावधीत ब्लॉग चालवणं, 'प्रजासत्ताक' या संकल्पनेचं परिक्षण करणं, नागरिकांना खरंच निर्णयाचा अधिकार आहे का, कितपत आहे, 'सर्वांच्या फायद्याचे' मध्ये नक्की कुणाचा समावेश होतो याचा तपास करणं...असले मोठाले 'विकास' प्रकल्प खरंच समन्यायी असतात का की समाजातील दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करतात की त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवतात याचा शोध घेणं...


कोची बिनालेच्या दरम्यान तुम्ही तेथे प्रदर्शित कॆलॆल्या कामाबद्दल: तुम्ही कशाप्रकारॆ तिथल्या सामाजिक घटकांबरॊबर संवाद साधलात आणि त्यातून सहयॊगिक कलानिर्मिती कशाप्रकारॆ घडली?

'वॉशिंग 'आर्टी लिनन' हा माझा प्रकल्प 'क्रिटिकल जंक्चर' या कोची बिनाले दरम्यान भरलेल्या प्रदर्शनाचा भाग होता. हे प्रदर्शन भारत आणि पोलंड या दोन देशांच्या सहयोगातून भरलं होतं. यातून मी धोब्यांच्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या गटाला या प्रदर्शनातून स्थान मिळवून द्यायचा प्रयत्न केला. वन्नार संघम ही सहकारी संघटना आहे जी धोबीखाना चालवते. जवळपास ६० धोबी रोज १०००च्या वर लिननचे चादरी, पडदे धुतात. कोची हे पर्यटन स्थळ असल्यामुळे हे मुख्यकरून तिथली होटल्स आणि होम स्टे मधून येतात. इथलं काम पारंपारिक पद्धतीनं चालतं. पाण्याचे हौद बांधून त्यात उभे राहून धोबी रोज कपडे धुतात. दिवसाचे बारा-बारा तास राबतात. आणि हे सगळं काम अतिशय शारीरिक कष्टाचं असतं. यामुळे त्यांना अनेकदा शारीरिक व्याधींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे वन्नार संघम कधीपासून धोबीखान्याचं यांत्रिकीकरण करायच्या प्रयत्नात होते पण पुरेशा निधी अभावी ते जमत नव्हतं.

यातली एक गोष्ट मात्र चांगली होती की कोअॉपरेटिव असल्यामुळे त्याचा फायदाही त्यांना होतो. एकत्र विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात, एकत्र बॅंकेचं खातं आहे, समिती आहे. ही व्यवस्था जर मोडली तर छोट्या-मोठ्या लाॅंड्री त्यांची जागा घेणार. आणि आता तरूण मंडळी बरीचशी बाहेर पडलीयेत त्यामुळे धोबीखाना मध्ये बहुतकरून मध्यमवयीन किंवा वयस्क लोकच काम करतात. त्यात एक भावनिक धागा तर आहेच पण अडीअडचणीला संघम त्यांना मदतही करतो.

माझ्या प्रकल्पात मी वन्नार संघम बरोबर काम केलं. मी म्हणजे माझी नकली कंपनी युनिसेल. प्रदर्शनातली जागा त्यांना लिनन वाळवण्यासाठी दिली. यातून त्यांना एक प्रकारची दृश्यमानता लाभावी असा एक उद्देश होता. आणि हा प्रकल्प बिनालेच्या काळात केल्यामुळे बहुतेक करून ते लिनन हे कला पर्यटकांचेच होते. यातून धोबी खान्यासाठी निधी उभा करण्यात आला ज्यातून त्यांनी अलिकडेच अौद्योगिकी तत्वावर चालणारी धुलाई यंत्रं आणि हायड्रो एक्स्ट्रॅक्टर तिथं बसवली.

पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, डिसेंबर २०१५, पुणे 
मुलाखत आणि मराठी अनुवाद: नूपुर देसाई