जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – १)



बंगलुरू शहर हे आज माहिती आणि तंत्रज्ञानाचं हब म्हणून ओळखलं जातंय. गेल्या काही वर्षात हे शहर, शहराचं व्यक्तिमत्व बदलत गेलंय. तसा या शहराचा इतिहास जेमतेम तीन-चारशे वर्षांचा. पण गेल्या पंधरा-वीस वर्षात शहर वाढत गेलं, आसपासची गावं, तलाव, रहवासी सगळ्यांना सामावून घेत गेलं. एवढंच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यात कामासाठी येणारे भारतभरातले तंत्रज्ञ, अभियंते, डिजाइनर या सर्वांनी शहरची जडणघडण होत गेली. हे सगळं होत असताना, शहराचा पसारा वाढत जाताना, त्याचा विकास होत जाताना शहराच्या कला-सांस्कृतिक जीवनातही अनेक बदल होत गेले. हे प्रयोग मुख्यत्वे दृश्यकलाकार, नाट्यकलाकार त्याचप्रमाणे समकालीन नृत्यकलाकार यांच्या प्रयत्नातून घडून आलेले आपल्याला दिसतात. यात जनकला किंवा सार्वजनिक अवकाशात घडणारे कला-प्रकार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. या पार्श्वभूमीवर बंगलुरू मध्ये गेल्या काही वर्षात आकाराला आलेले कलाकारांचे कलेक्टिव्स, त्यांनी पार पाडलेले जनकला प्रकल्प, इतर कलाशाखांच्या सहयोगातून मांडलेले आकृतीबंध, अनेक माध्यमांच्या संयोगातून तयार झालेल्या कलाकृती आणि प्रकल्प हे सगळं समजून घेणं हे महानगरात घडणाऱ्या जनकला प्रकल्पाची व्याप्ती आणि खोली समजून घेण्याकरिता जरूरी ठरतात.

बंगलुरू शहराला मी अलिकडे भेट दिली ती माझ्या जनकलेवरच्या अभ्यास प्रकल्पादरम्यान. या प्रकल्पा अंतर्गत मी भारतातल्या मोठ्या शहरांतल्या अशा कला हस्तक्षेपांकडे अधिक बारकाईने पाहायला लागले. हे जनकला प्रकल्प या शहरांमध्ये का आकाराला आले, त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ काय होते, त्यामुळे समकालीन कलाव्यवहारामध्ये काय फरक पडतोय हे सगळे मुद्दे तपासून पाहाता येणं हा याचा उद्देश आहे. या हस्तक्षेपातून होणाऱ्या सामाजिक घुसळणीतून सार्वजनिक अवकाशात काय प्रकारचे बदल घडतात, तिथला कलाप्रकार काय प्रकारची रूपं धारण करतो. त्याचबरोबर, जनकला ही संकल्पनाच मुळात प्रवाही आहे त्यामुळे त्याचं अर्थघटन कसं होतं, यातले अनेक प्रवाह कुठून उगम पावतात, त्यात 'सामाजिकता' अधिक महत्त्वाची की 'कलात्मकता', भारतीय संदर्भात जनकलेची सैद्धांतिक मांडणी कशी करता येईल, त्याचे विविध पैलू शहरांच्या संदर्भात तसेच प्रेक्षकवर्ग, जनकलेची सौंदर्यात्मक मांडणी या परिप्रेक्ष्यातून कसे जाणून घेता येतील हाही या अभ्यासाचा भाग आहे. यात मी मुंबई, दिल्ली, बंगलुरू, कलकत्ता, कोची इत्यादि शहरांमधल्या जनकला व्यवहारांचं दस्तेवजीकरण करणं आणि पुढे जाऊन त्यांचं अर्काइव उभं करणं ही उद्दिष्टं ठेऊन कामाला सुरूवात केली. बंगलुरू शहर यातलं पहिलं शहर होतं जिथे जाऊन मी कलाकार, कला संस्था, तिथले विद्यार्थी, शिक्षक, कलेक्टिव्सचे संस्थापक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. यावरून बंगलुरू शहारातील जनकलेच्या उगमाचा आणि विकासाचा एक आलेख आपल्यासमोर उभा राहू शकतो.

गेल्या दोन दशकात या शहरातले कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रवेश करत परफॉर्मन्स, सामुदायिक कला व्यवहार, जनकलेची इतर अनेक रूपं आजमावून पाहायला लागले. पण याची मुळं शोधायची असतील तर दोन कलाकरांचा कलाव्यवहार इथं पाहावा लागेल. एक आहे, जॉन देवराज आणि दुसरे म्हणजे सी. एफ. जॉन. हा कालखंड होता १९९०च्या दशकाचा. जॉन देवराज यांनी बंगलुरू शहराच्या सार्वजनिक अवकाशात शिल्पं उभी केली. यात त्यांनी मुख्यतः लहान मुलांना सहभागी करून घेतलं. या मुलांनी देवराज यांच्या बरोबर ही प्रतिकात्मक शिल्पं आणि स्मारकं शहरातले बगिचे, मोकळी मैदानं, तलाव अशा ठिकाणी तयार केली. या शिल्पांचा आशय हा सामाजिक होता, त्यात शांतता, मैत्री, लोकशाही, स्वातंत्र्य यासारखी मूल्ये जपणारी प्रतिकं त्यांनी मुलं आणि नववसाक्षरांच्या सहयोगातून उभारली. यात कला लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवणं हा मुख्य उद्देश होता.

बॉर्न फ्री


१९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच बंगलुरू शहराचं वातावरणही ढवळून निघालं. ठिकठिकाणी जातीय दंगली आणि हिंसाचार उसळला. या अस्वस्थ करणाच्या काळात अनेक कलाकारांना स्टुडिओच्या बाहेर पडून, प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करण्याची, संवाद साधण्याची आवश्यकता असल्याची तीव्र जाणीव झाली. गाणी, प्रदर्शनं, नाटकं अशा विविध माध्यमांतून भारतभर अनेक कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रत्यक्ष लोकसंपर्कात येऊन कलाकृती तयार करू लागले, लोकांच्या सहभागातून कलाव्यवहार आकाराला येऊ शकतो, तो अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो का यावर विचार आणि प्रक्रिया या काळात सुरू झाली. देवराज यांनी 'आशेच्या बगिचात' बॉर्न फ्री हे १४ फूटी शिल्प मुलांच्या मदतीने १९९४ साली उभं केलं. लोकचळवळींशी संबंधित असलेले सी. एफ. जॉन यांना त्या काळात शहरातल्या दंगलग्रस्त भागात पोस्टर आणि कबीराच्या दोह्यांमधून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. हा अनुभव त्यांच्याकरिता अत्यंत क्लेशदायक ठरला. पण तरीही हे चालू ठेवत त्यांनी पुढे सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणारे आणि विविध समुदायांबरोबर संवादात्मक कला-प्रकल्प १९९३ ते २००३ या दहा वर्षाच्या कालावधीत आकाराला आणले आणि पार पाडले. कलेक्टिव्सचा धागा या उपक्रमांशीही जोडलेला आहे कारण जॉनच्या बरोबरीने काही कलाकारांनी एकत्र येऊन या काळात कलाकृती आणि कला प्रकल्पांवर काम केले. हे सहयोगातून काम करणं, केवळ आपल्या व्यक्तिगत अवकाशात काम न करता त्याची व्याप्ती वाढवणं, कलाकारांचा एक गट एक कम्युनिटी म्हणून उभं राहाणं आणि त्यातून आपल्याला भवतालाला भिडणं हे या कलाकारांना शक्य झालं


कल्चरल स्पायरल

 

वॉल्स अॉफ मेमरीज


हे करताना त्यांनी कलाकारांना केवळ स्वतःचे अनुभव प्रमाण न मानता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थिती समजावून घ्यायला उद्युक्त केलं. दंगलग्रस्त भागात जाऊन काम करायला लागल्यावर सहभागी कलाकारांची विचार प्रक्रिया, कला-प्रक्रिया या सगळ्यातच आमूलाग्र बदल या काळात घडून आला. 'कल्चरल स्पायरल' हे ४० फुटी सर्पिलाकृती मांडणी शिल्प जॉन यांनी शीला गौडा आणि रसना भूषण, राघवेंद्र राव, सुरेखा या कलाकारांच्या सहयोगातून उभारले. मांडणी शिल्प उभं करायचं आणि तेही सार्वजनिक अवकाशात हा नावीन्यपूर्ण प्रयोग बंगलुरू मध्ये पहिल्यांदाच घडत होता. अगदी भारतातल्याही पहिल्या काही प्रयोगांपैकी हा एक. यात दोन सर्पिलाकृती एक्रेलिक एकमेकांत अशा पद्धतीने गुंफल्या होत्या की एकातून प्रवेश करतील आणि केंद्रबिंदू पर्यंत पोचून दुसऱ्या सर्पिलाकृतीतून बाहेर पडतील. यातल्या पारदर्शक भिंतीवर आक्का महादेवी, कबीराच्या ओळी आणि त्याच बरोबर प्रतिमा रंगवलेल्या होत्या. प्रेक्षक त्या अनुभवत आत शिरतो पण त्याचबरोबर तो त्या सर्पिलाकृतीतून निर्माण होणारे एकमेकांवर येणार पदर अनुभवतो, एका पारदर्शी पातळ भिंतीतून पलिकडची भिंत पाहू शकतो. त्यावरच्या प्रतिमाकृती एकमेकांना छेद देतात, नवे अर्थ आणि संदर्भ देतात. त्या प्रतिमांच्या थरातून आपण पलिकडच्या प्रेक्षकांनाही पाहू शकतो. सर्वात आत, त्या सर्पिलाकृतीच्या केंद्रस्थानी दोन आरशांची रचना केलेली होती. हे आरसे तुम्हाला स्वत:कडे बघायला, प्रश्न विचारायला, आपले अनुभव ताडून बघायला भाग पाडतात. या दशकभराच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रकल्पांवर कलाकारांच्या आणि त्या त्या परिसरातल्या समुदायांच्या सहयोगातून काम केले. 'टेरीटेरी' हा आैद्योगिक परिसरातला प्रकल्प असेल किंवा 'क्वेस्ट फॉर सेलिब्रेशन अॅंड क्वेस्ट अॉन वेस्ट' हा प्रकल्प हे जागतिकीकरणानंतर आलेल्या उपभोगवादी जीवनसरणीवर भाष्य करणारे, जमीन, निसर्ग, मानवी गरजा याबद्दलचे मुद्दे उपस्थित करणारे होते. 'वॉल्स अॉफ मेमरीज' या कलाप्रकल्पासाठी त्यांनी शहराबाहेरची जुनी मोठी पायऱ्या असलेली विहीर निवडली. ही विहीर जॉन, त्रिपुरा कश्यप आणि अझिस टी. एम. या तिघांसाठी एक आव्हानात्मक साइट बनली. तिथल्या रहवाशांच्या स्मृती, त्याभोवती गुंफलेल्या कथा आणि मिथकं, त्या विहिरीचं त्या भागातलं महत्त्व, जमिनी खालची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आटलेल्या विहीरी, वाढत्या शहरीकरणामुळे बदलत जाणारी भूरचना, त्याबरोबर नाहिसे होत जाणारे विहीरींसारखे घटक, आटलेल्या विहिरींमध्ये साठत जाणारा कचरा हे सगळं लक्षात घेऊन या कलाकारांनी तेथे हस्तक्षेप केला. इन्स्टलेशन, फोटोग्राफी आणि परफॉर्मन्स या माध्यमांतला हा कलाविष्कार तिथल्या स्थानिक लोकांच्या संवादातून घडत, उलगडत गेला. वर्षानुवर्षे सामूहिक स्मृतीचा भाग असलेल्या पण बदलत्या सांस्कृतिक व्यवहारात वापरातून बाद ठरलेल्या विहीरीसारख्या फॉर्मवर काम करण्यातून कलाकारांनी तिथल्या जगण्याशी, लोकांची स्वप्नं, आकांक्षा, भीती यांच्याशी त्यांचा मेळ घातला. इथं विहीर ही एक प्रयोगशाळा बनली आणि कलाकारांना आपले प्रयोगशील मार्ग चोखाळायला वाव मिळाला. एवढंच नव्हे तर या सारख्या प्रयोगशील कलाव्यवहाराची मालिकाच या शहरात या काळात आणि त्यापुढे सुरू झाली आणि बंगलुरू शहराने समकालीन कलाव्यवहारात अशा सामूहिक कला प्रयोगांनी पुढच्या दशकात मोलाची भर घातली.


छायाचित्र सौजन्य: जॉन देवराज आणि सी. एफ. जॉन
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे (मार्च २०१६) 



No comments:

Post a Comment