सौंदर्य आणि क्रोर्य


या वेळची दिल्ली वारी ही खरंतर महत्वाच्या गाठी भेटी घेण्यासाठी आखलेली आणि त्यातही मे महिन्याच्या कडक उन्हात बाहेर पडता तरी येईल की नाही असं वाटत होतं. पण नेमका त्याच दिवशी पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा देखील होता आणि दोन प्रदर्शनं अगदी आवर्जून पाहण्यासारखी होती. मृणालिनी मुखर्जी यांचे राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (NGMA) भरविण्यात आलेले सिंहावलोकनात्मक प्रदर्शन हे त्यातलं एक प्रदर्शन आणि दुसरे होते नेचर मॉर्ट या कलादालनात असलेलं आयेशा खालीद आणि इम्रान क़ुरेशी या कलाकार जोडप्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन. दोन्ही प्रदर्शनातील कलाकार खरंतर वेगवेगळ्या काळातले, भिन्न प्रवृत्तीचे, शेजारच्या देशातले आणि कलेकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन असलेले पण तरीही त्यांच्यात काहीतरी एकत्र बांधणारा धागा जाणवत राहिला. माणसाचं त्याच्या भवतालाशी असलेलं नातं आणि त्या नातेसंबंधातून तयार होणारे संवेदनांचे विविध पदर या कलाकृतीत उमटत जातात. फुलांच्या पाकळ्यांच्या गुंतागुंतीच्या पण नाजूक आणि सौंदर्यपूर्ण रचना आणि त्यातून उलगडत जाणारे इतर अनेक विषयांचे अंतरंग, हे त्याचंच एक उदाहरण.

आरण्यानी, मृणालिनी मुखर्जी १९९६

फ्लोरा, मृणालिनी मुखर्जी २०००

पीटर नॅगी यांनी क्युरेट केलेले 'रूपांतरण' (Transfigurations) हे मृणालिनी यांच्या आयुष्यभराच्या कलाकृतींचा आढावा घेणारे प्रदर्शन राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात जानेवारी पासून सुरु झाले. दुर्दैवाची गोष्ट अशी की प्रदर्शन सुरु होण्याच्या आदल्याच रात्री मृणालिनी मुखर्जी यांना इस्पितळात दाखल करावे लागले आणि इतक्या कष्टानी उभ्या  केलेल्या या प्रदर्शनाला मिळणारा कलाप्रेमींचा प्रतिसाद कसा आहे ते मात्र त्या पाहू शकल्या नाहीत. बिनोद बिहारी मुखर्जी आणि लीला मुखर्जी या कलाकार जोडप्याची मृणालिनी ही एकुलती एक मुलगी. बडोद्याच्या कला महाविद्यालयात त्यांनी सुरुवातीचं चित्रकलेचं आणि मग भित्तिचित्रकलेचं शिक्षण घेतलं. मात्र त्यांची कलानिर्मिती ही मुख्यत: शिल्पकलेच्या क्षेत्रातच झालेली दिसते. १९७० च्या दशकात त्यांनी नैसर्गिक धाग्यांचा त्यांच्या कामात वापर सुरु केला. तागाचे हे दोर पिळून रंगवून त्यापासून विविध शिल्पाकार तयार करणं हे त्या काळात फारच नाविन्यपूर्ण आणि अनोखं होतं. ही भव्य आकाराची अवकाश भरून टाकणारी शिल्पं बनवायला त्यांना महिनोंमहिने लागायचे. अतिशय परिश्रमपूर्वक, चिकाटीने आणि बारकाईने या धाग्यांच्या गुंतागुंतीच्या रचना त्या हाताने तयार करीत असत. यातून निर्माण होणारे आकृतिबंध हे निसर्गातील आकार, फुले, वनस्पती त्याचप्रमाणे आदिवासी देवदेवता, मुखवटे यांची आठवण करून देतात. एकाच प्रकारात अडकून न पडलेल्या आणि नविनतेचा शोध घेणाऱ्या मुखर्जी यांची शिल्पे आपल्या ऐंद्रिय जाणीवा जागृत करतात. या स्पर्श-संवेद्य कलाकृती त्यातील वक्रारेषा, आच्छादने, मुडपलेले पदर या आधारे गूढता, वैषयिक भावना यांना हात घालतात. निसर्गातील नवनिर्मितीची प्रक्रिया, त्यातून त्याचं धार्मिक चिन्हं किंवा प्रतिमा यात होणारं रुपांतर, त्यातील सौंदर्य आणि कठोरपणा अशा विविध गोष्टींचा वेध ही कलारूपे घेत राहतात. त्यांच्या कला व्यवहारातून त्यांनी अर्थातच कला आणि हस्तकला यातल्या सीमारेषाही पुसट बनवल्या. मुखर्जी यांनी आयुष्यभर त्यांच्या कला व्यवहारातून विविध माध्यमे आणि आकृतिबंध यांचा शोध घेत, प्रयोग करीत, आपली कला अधिकाधिक वृद्धिंगत केली. अत्यंत उर्जा आणि ताकदीने भरलेली मुखर्जी यांची कला भाषा ही प्रयोगशील होती. खरंतर त्यांचं माध्यम हीच त्यांची कलाभाषा बनलेली दिसते. १९९० च्या दशकात ब्रिटीश कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळाल्यावर त्यांनी सिरामिक या माध्यमात काम सुरु केले. आणि अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ब्राँझ मध्ये शिल्पं बनवायला सुरुवात केली होती. यात उमलणाऱ्या कळ्या, विविध पुष्प-लतांचे आकार, लिंग प्रतिमा, दैवी प्रतिमांचा विकास यासारखे विषय हे नवीन माध्यमे आणि त्यानुरूप तयार होणारे आकृतिबंध यातून निर्माण होतात. त्यांच्या कला व्यवहाराचे बदलते टप्पे, बदलत जाणारे आकृतिबंध आणि त्यातून उलगडत जाणाऱ्या त्यांच्या कलाकृती यांचं एकत्रितरीत्या दर्शन NGMA मध्ये आपल्याला होतं. त्यांच्या शिल्पातील संवेदनशीलता आणि त्याचबरोबरीने असणारा जोमदारपणा बघणाऱ्याला भारावून टाकतो.  मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं आणि तणाव मुखर्जी यांच्या या मूर्त-अमूर्तात घडत जाणाऱ्या कलाकृतीतून आपल्याला दिसत राहतात.


'You who are my love and my life's enemy too'
इम्रान कुरेशी २०१५


'All is grey when the black is washed away'
आयेशा खालीद २०१५

दुसरीकडे याच प्रयोगशील आणि संवेदनशील कला व्यवहारातून मानव आणि समाज यातील नातेसंबंध यावर आयेशा खालीद आणि इम्रान क़ुरेशी हे पाकिस्तानातील कलाकार जोडपे भाष्य करते. आजपर्यंत केवळ इंटरनेट आणि छायाचित्रांमधून पाहिलेल्या या दोन कलाकारांच्या कलाकृती प्रत्यक्ष दिल्लीत पाहायला मिळणं ही सहज चालून आलेली संधी होती. लाहोरच्या नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स या कला महाविद्यालयातील लघुचित्रकलेच्या विभागात या दोघांनी कलाशिक्षण घेतलं. लघुचित्रकलेपासून सुरु झालेला हा प्रवास नंतरच्या काळात अधिक व्यापक होत गेला. पाकिस्तानातील नव-लघुचित्रकारांपैकी असलेले हे दोघे त्यांच्या कला व्यवहारातून त्यांच्या इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांना भिडतात, यातूनच त्यांची कलाभाषा घडताना दिसते. या प्रदर्शनातील या दोघांच्या कलाकृती पाकिस्तानच्या सध्याच्या अत्यवस्थ राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. जैव अनुभूतीतून येणाऱ्या प्रतिमा, रूपे आणि आशय एकीकडे त्यातील सौंदर्य दर्शवितात तर त्याचबरोबर दुसरीकडे त्यांच्या भवतालातून उद्भवणारी उद्विग्नता दर्शवितात. लघुचित्राच्या परंपरेतून येणारी बारकाईने केलेली सजावट इथे दिसते पण तीच रूपे दुसरीकडे गोंधळ आणि अराजकता दाखवण्याचा देखील प्रयत्न करतात.

'In two forms and with two faces - with one soul, Thou and I'
आयेशा खालीद २०१५

 एका मांडणी शिल्पात आयेशा खालीद यांनी दोन गालिचे टांगलेले दिसतात. हे दोन्ही गालिच्यांवर लघुचित्रातील विविध आकार चंदेरी आणि सोनेरी भरतकामाने भरलेले दिसतात. पण अधिक निरखून पाहिल्यावर लक्षात येतं की हे भरतकाम धाग्यांनी केलेलं नसून टाचण्या वापरून केलेलं आहे. गालिच्याच्या मागच्या बाजूला या हजारो टाचण्या त्यांच्या टोकदार टोकांनी त्याच प्रतिमा विरुद्ध दिशेनी तयार करतात. खालीद म्हणतात त्याप्रमाणे 'हे गालिचे बदलत्या काळाचे प्रतिक आहे. सौंदर्य, चमकदार रंग, चित्रं या सगळ्याचेच अर्थ आजूबाजूला पसरलेल्या हिंसेमुळे बदलत जाताहेत…' त्यांच्या इतर चित्रांमध्ये टुलीप फुलाची प्रतिमा सतत येत राहते. पण ते फूल कुठेच पूर्ण उमललेले दिसत नाही. एका बाजूनी खुडलेले, कापले गेलेले हे फूल काही कलाकृतींमध्ये करड्या काळ्या रंगात उमटलेले दिसते. २०१४ मध्ये पेशावरमधल्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेदना आणि शोक यातून प्रकट होत राहतो. वसली या लघुचित्राकरिता वापरण्यात येणाऱ्या कागदावर खालीद यांनी एक बुरखा घातलेली प्रतिमा रेखाटली आहे. पूर्ण पांढऱ्या असलेल्या या प्रतिमेवर सोन्याच्या मुलाम्यानी रंगवलेल्या  बुरख्याच्या घड्या उठून दिसतात, जणू काही त्या बुरखाधारी स्त्रीला बाहेर येण्यापासून रोखताहेत. ते पाहून असा प्रश्न पडतो की खालीद यातून पाकिस्तानातील स्त्रियांवच्या दडपशाहीवर भाष्य करू इच्छितात की पाश्चात्य देशात प्रचारकी थाटात वापरल्या जाणाऱ्या मुस्लिम स्त्रियांच्या प्रतीमेवरती? आयेशा खालीद यांच्या या कलाकृती सौंदर्य, सांतता आणि वेदना, क्रोर्य यांचं एकाच वेळी असणारं अस्तित्व आणि त्या दोहोतील तणाव दाखवत राहतात.

'This leprous brightness'
इम्रान क़ुरेशी २०१५

खालीद यांच्या कलाकृती अंतर्वर्ती आहेत तर इम्रान क़ुरेशी यांच्या कलाकृती अधिक उघडपणे हिंसेवरती भाष्य करतात. क़ुरेशी यांच्या भव्य कॅनव्हास वरचे काळपट लाल रंगाचे शिंतोडे त्यांनी अनुभवलेल्या २०१० सालच्या लाहोरच्या एका मोठ्या बाजारपेठेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसाद उमटवताना दिसतात. आयेशा खालीद यांच्या कलाकृतींप्रमाणेच त्यांच्या आजूबाजूची अस्वस्थता आणि हिंसा या चित्रातील काहीशा अमूर्त भासणाऱ्या रंगांच्या फटकाऱ्यातून प्रतिबिंबित होते. अधिक जवळून पाहिल्यानंतर त्यात रेखाटलेल्या पाकळ्यांचे आकार स्पष्ट होत जातात. सोनेरी मुलाम्याच्या थरावर या पाकळ्यांमधून लाल भडक सूर्याचा गोळा उगवताना दिसतो. सोनेरी मुलामा आणि त्यात अतिशय काळजीपूर्वक रेखाटलेले हे पानाफुलांचे आकार ही खरंतर मुघल लघुचित्रांची देन. रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या या नाजूक पाकळ्यांनी क़ुरेशी त्याचा मूळ अर्थच उलथून टाकतात. पण ही चित्रे केवळ उद्विग्नता आणि निराशा प्रकट करत नाहीत तर अशा हिंसेच्या प्रसंगी लोकांच्या बदलत्या प्रतिक्रिया आणि त्यातून निर्माण होणारा आशावादही प्रतीत करतात. हा लाल रंग, सोनेरी वर्ख आणि पांढऱ्या डेलिया फुलाच्या पाकळ्या यांच्या अत्यंत परिश्रमपूर्वक रेखाटलेल्या विविध आकारातून क़ुरेशी यांचे कॅनव्हास भरलेले दिसतात. कलादालनाच्या एका कोपऱ्यात खाली जाणाऱ्या पायऱ्यांच्या वरती एक लहान कॅनव्हास टांगलेला आहे. त्यावर त्याच लाल रंगाचा एक आकार दिसतो आणि त्याचा एक मोठा ओघळ खाली येऊन पायऱ्यांवर झिरपताना दिसतो. मोझेक फरशीवरून हा ओघळ खाली जात राहतो आणि त्या फरशीवरच्या कपच्यांचा आकार आणि पोत यातून नाजूक फुलांचे आकार निर्माण करत जातो. यातून पुन्हा एकदा त्यांचा आशावादच दिसतो आणि सर्व प्रकारच्या अवघड परिस्थितीतून मार्ग काढायची तयारी असलेली माणसाची चिकाटी. क़ुरेशी यांच्या चित्रांतील लाल किरमिजी रंग एकीकडे क्रौर्य आणि अशांतता यांचं प्रतिक बनतो तसाच दुसरीकडे नवनिर्मिती आणि जिवंत असण्याचं - जगण्याचंही प्रतिक बनतो. अतिशय भावनापूर्ण आणि काव्यात्मक शैली असलेली क़ुरेशी यांची चित्रे ही  ते म्हणतात त्याप्रमाणे एक प्रकारे फैज अहमद फैज यांच्या कवितांशी संवाद साधतात किंवा त्यातील आशयच चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करतात.




छायाचित्र सौजन्य: नेचर मॉर्ट आणि राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली.

No comments:

Post a Comment