अर्काईव्ह नावाची गुहा

छायाचित्र: नूपुर देसाई 

लक्ष्मी रस्त्यावरची गोखले स्मारक मंदिरची जुनी इमारत, तिथलं तळ मजल्यावर भरणारं फर्निचरचं कायमस्वरूपी प्रदर्शन, सर्व्हन्ट्स ऑफ इंडियाची कलंडलेली पाटी ही खरंतर रोजच्या रस्त्यावरची, नेहेमीच्या पाहण्यातली ठिकाणं. १९३४ साली उभारलेल्या या इमारतीचं वासाहतिक स्थापत्य, उंच छत, पुढल्या भागातला व्हरांडा, त्यातला द्वारमंडप, सगळंच नजरेत भरणारं. गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या स्मृती जगवणाऱ्या या सभागृहाचा वापर आज मात्र फर्निचरची आणि सजावटीच्या वस्तूंची प्रदर्शनं भरविण्यासाठी केला जातोय. पहिल्या मजल्याचं गोदामात रुपांतर झालंय तर दुसऱ्या मजल्यावरती मात्र महाराष्ट्र शासनानी त्यांच्या शासकीय विभागीय ग्रंथालयाची उभारणी केलीय. विश्रामबागवाडा ग्रंथालयाचा नियतकालिक विभाग इथं गेली अनेक वर्षं आपली ऐतिहासिक कामगिरी बजावत आहे.

गेल्या ६-८ महिन्यात माझ्या अभ्यास प्रकल्पाच्या निमित्तानी मी तिथं नियमितपणे जात राहीले आणि त्या जागेकडे एका वेगळ्याच नजरेने  पाहायला लागले.  पहिल्यांदा गेले ते थोड्या साशंकतेनीच. मला नियतकालिकातील कलेविषयक लेख पाहायचे होते. इथं मिळतील का, जुनी नियतकालिकं असतील का, असतील तर काय अवस्थेत असतील असा विचार करतच गेले. सुरुवातीला पत्र वगैरे आणा, परवानगी घ्या असल्या औपचारिक गोष्टी पार पडल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी मात्र मदत केली. अर्थात तिथली एकून अवस्था बघण्यालायकच आहे. वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे ढीग, सगळीकडे धुळीचे थर, पिवळी पडलेली पाने, अतिशय हळुवारपणे हाताळावी लागतील अशा अवस्थेतील पुस्तके, बांधणी सुटलेली, वाळवी लागायला सुरुवात झालेली मासिके, काही फाटलेली पाने, सूचीमधल्या चुका, निरसपणे काम करणारे कर्मचारी या सगळ्यावर मात करत हवे ते अंक शोधायचे म्हणजे सुरुवातीला मला दिव्य वाटलं होतं.  पण मग अर्थातच ते सवयीचं होऊन गेलं. ती जुनं लाकडी फर्निचर असलेली, फारसा उजेड नसलेली, जाळ्या-जळमटं असलेली ही थंड आणि शांत गुहा मला आपलीशी वाटायला लागली. चिकाटीनी मी तिथं जाऊन बसायला लागले, हळूहळू एक-दोन कर्मचारी आपुलकीनी बोलायला लागले, सुरुवातीला अंक शोधायला कुरकुरणारे ते मग मला ग्रंथालयात आत ही जाऊ देऊ लागले. भिंतीवरच्या कपाटामधले अंक शोधून काढायला मात्र थोडी टाळाटाळ व्हायची. थोडा आग्रह केला की मग 'या २-४ दिवसांनी, काढून ठेवतो' असा दिलासाही दिला जायचा. हे सगळं असलं तरी इथला संग्रह अफाट आहे. मराठी मधली बहुतेक सगळी नियतकालिकं अगदी २०व्या शतकाच्या सुरुवातीपासूनची इथं पाहायला मिळतात. छायाप्रत काढायची सोय नसली तरी आपण कॅमेरा घेऊन जाऊन हव्या त्या पानांचे फोटो काढू शकतो, ही सर्वात उत्तम सोय देखील आहे. आणि त्याहून ही महत्वाचं म्हणजे या सगळ्याचं digitization करायचं काम लवकरच सुरु होणार आहे, असंही दिसतंय.

 
छायाचित्र: नूपुर देसाई

छायाचित्र: नूपुर देसाई 

याच अभ्यासाचा भाग म्हणून मी गाठलेली अशीच दुसरी जागा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. विभागीय ग्रंथालयाचा खाक्या पूर्णपणे सरकारी असेल तर इथला अस्सल पुणेरी कडक शिस्तीचा! आणि नियम पाळण्यात अति काटेकोर. त्यांच्या पुणेरी, कोरड्या वागण्यामुळे तिथं आलेल्या अनेकांचे तिथल्या कर्मचाऱ्यांशी वादही व्हायचे. पण एकदाच का होईना मला तिथं सुखद धक्का मिळाला. मी कलाविषयक प्रकल्पावर काम करतेय हे कळल्यानंतर तिथं काम करणाऱ्या एका बाईंनी मला अगदी मनापासून मदत केली. सूची दाखवल्या, पुस्तकांचे क्रमांक शोधून दिले आणि स्वत:हून उठून पुस्तकं शोधायला मदत केली. मागाहून मला कळलं की त्यांचा नवराही चित्रकार आहे. तसंही तिथे फारसे अंक उपलब्ध नव्हतेच, थोडेसे सत्यकथा आणि मनोहर सोडलं तर. ते दरवर्षी जुने अंक रद्दीत घालतात, त्यामुळे ते असायची शक्यताही नव्हती. तिथे मला वाचायला मिळाली ती मराठी साहित्य आणि कलाविश्वाबद्दलची पुस्तकं, कोश आणि काही संदर्भ ग्रंथ. ते काही असो, मसापच्या दिशेनी पुन्हा पुन्हा मी जात राहिले पण विभागीय ग्रंथालयासारखं त्या वास्तू नी मला गुंगवलं मात्र नाही, हेही तितकंच खरं . 

सौजन्य: विश्रामबागवाडा शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे

सौजन्य: विश्रामबागवाडा शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे


मराठी मध्ये, खास करून नियतकालिकांमध्ये, दृक कलेविषयी फारसं काही लिखाण झालेलं नसावं हा माझा विचार मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये साफ खोटा ठरला. वाङमयीन नियतकालिकांमध्ये दृक कलेला एक खास स्थान देण्यात आलेलं दिसतं. कला समीक्षा, सौंदर्यशास्त्र विषयक चर्चा, प्रदर्शनांची परीक्षणे, कला आणि गौण कला यावरची मांडणी, चित्रकार आणि शिल्पाकारांबद्दल चरित्रात्मक टीपणे, भारतात कलकत्ता, दिल्ली, मद्रास इथे घडणाऱ्या कलाविषयक घडामोडी, कला चळवळी यांचा आढावा, पश्चिमेकडील कला-विचार, दृक कला आणि साहित्य यांना सांधणारे दुवे, कलाक्षेत्रात घडणारे नवे बदल, त्याबद्दल एकीकडे असणारी अनास्था आणि दुसरीकडे विविध सामाजिक सांस्कृतिक कारणांमुळे असणारा विरोध असे अनेकविध विषय हाताळलेले दिसून येतात. यात साहित्यिक आणि समीक्षकांनी तर लिखाण केलंच आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर चित्रकार आणि शिल्पकारांनीही यात मोलाची भर घातलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय पातळीवर कलेच्या क्षेत्रात साधारण काय विचार मांडले याची मला कल्पना होती, पण या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात कलाविषयक मांडणी काय होती, कुठे मुद्दे उचलून धरले गेले, कुठले वाद या काळात महत्वाचे ठरले आणि हे सगळं ज्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर घडत होतं, ते जवळून अभ्यासायला मिळालं. कला-तंत्र आणि कारागिरी यावरचा सुरुवातीचा भर, कलेतील बदलते विषय-आशय आणि बदलती कला-भाषा यांचा बदलत्या सामाजिक संदर्भात विचार कसा करायचा, आकृतीबंधात केलेले नवे प्रयोग, वसाहतवादाच्या काळात उदयाला आलेल्या कला चळवळी आणि संस्था यांचा कलानिर्मितीवर झालेला परिणाम, ब्रिटीश कलाशिक्षणाचा झालेला परिणाम, त्याला राष्ट्रवादी भूमिकेतून केलेला विरोध,  भारतीय कला इतिहासाचा धार्मिक आधारावर ठरलेला कालानुक्रम यासारख्या अनेक मुद्यांना या लेखकांनी हात घातलेला दिसतो.


साधारणत: स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या साहित्य आणि इतर ललित कलांमध्ये उमटलेला आधुनिक विचार  हा या प्रकल्पाचा गाभा. या अर्काईव्हच्या गुहेतून हाताला लागलेले हे लेखांचे काही नमुने. विविध सामाजिक आणि साहित्यिक चळवळींच्या पार्श्वभूमीवर उगवलेल्या नव्या जाणिवा, नवे आकृतिबंध, विचार आणि बदलते कल, मूल्ये आणि या सगळ्याचं एकमेकाशी असलेलं गुंतागुंतीचं नातं याचा मी आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. सौंदर्यशास्त्र, कलेचा आस्वादव्यापार, कलाव्यवहार, ललित कलांचे बदलते घाट याकडे नव्या आधुनिकतेच्या चष्म्यातून कसं पाहायचं? या काळात आलेल्या 'नवते'च्या अनुभूती आणि आचार-विचाराला कसं भिडायचं? आधुनिकतेच्या विविध प्रवृत्ती आणि कशा स्वरुपात आपल्याला इथं दिसतात? आणि कला समीक्षा आणि साहित्य समीक्षा यांची संकल्पनात्मक मांडणी प्रादेशिक आधुनिकतेच्या चौकटीत त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर उमटणाऱ्या नव्या कल्पनांच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे करायची, या सारख्या काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न हा प्रकल्प करतो. त्यात मग कलेसाठी कला की समाजासाठी कला, निसर्गवादी चित्रकला योग्य की अमूर्तवादाचा पुरस्कार करणारी हे नेहेमीचे वाद, रूपवाद आणि रचनावादाची मांडणी आणि कलाविष्काराची रूपं यासारखे विषय असतील, नाहीतर श्लील-अश्लील वाद, सेन्सॉरशिप सारखे मुद्दे असतील, मराठीमधली नियतकालिकातून हे नवं गतिशील चर्चाविश्व घडताना दिसतं. या वादांचे पडसाद या मासिकांमधील लेखांमधून वारंवार उमटताना दिसतात. आणि हे सगळं जिवंतपणे आपल्यासमोर उभं राहतं ते या अडगळ असलेल्या, अंधाऱ्या, धूळ माखल्या ग्रंथागारातून आणि ही त्याची पोचपावती…   




3 comments:

  1. It would be interesting to know the nature of discussion happening through these periodicals. We are always under the impression that our ancestors were highly ignorant about contemporary art movements and it bore little relevance to their aesthetic values. Good to know that the impression would be broken through your blogs in near future. Look forward.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, निखिल! इतक्यात तसं लिहिण्याची परवानगी नाही. पण लवकरच लिहिन म्हणते...बघूया कसं जमतंय ते :)

    ReplyDelete
  3. नुपूर खुप छान ! तुझ्या कडून अधिक वाचायला आवडेल.

    ReplyDelete